पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे विविध उपक्रम होत असतात. त्यात सहभागी  झालेल्या काही कार्यकर्त्यांना उपक्रम आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती, तसेच कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. याचा पहिला भाग आपण ४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/761395.html

४. श्री. दीपक आगावणे, पुणे

श्री. दीपक आगावणे

४ अ. धर्मशिक्षण वर्गातील एका धर्मप्रेमी आधुनिक वैद्यांना आधी कधीही न पाहिलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वप्नात दर्शन होणे : ‘वाघाळवाडी (पुणे) येथील धर्मशिक्षण वर्गातील एक धर्मप्रेमी आधुनिक वैद्य आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘मी आजपर्यंत कोणत्या इतर देवतांचा नामजप कधीच केला नाही. केवळ ‘ॐ नमः शिवाय ।’, असाच नामजप माझ्या मुखात असतो. दुसर्‍या कोणत्याही देवतेचा नामजप करत असतांना काही क्षणांतच परत आपोआप ‘ॐ नमः शिवाय ।’, हाच नामजप चालू होतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि रात्री झोपतांना भ्रमणभाषवर ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वर ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप लावायला आरंभ केला. रात्री झोप लागल्यानंतर काही घंट्यांनी माझ्या छातीतून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकू येत होता. त्यानंतर मला स्वप्नात गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले. गुरुदेव माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. सकाळी उठल्यानंतर मला पुष्कळ आनंदी आणि उत्साही वाटत होते. ही अनुभूती मला सकाळी जाग येईपर्यंत येत होती.’’ धर्मशिक्षण वर्गामध्ये मी ब्रह्मोत्सवाचा साप्ताहिक विशेषांक दाखवला, तेव्हा त्यातील गुरुदेवांचे छायाचित्र पाहून त्यांनी लगेच सांगितले, ‘‘हेच माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि माझ्याशी बोलत होते.’’ बोलतांना त्यांचा भाव जागृत झाला होता. त्यांची ही अनुभूती ऐकून वर्गातील सर्वांचा भाव जागृत झाला. त्यांनी कधीच गुरुदेवांना बघितलेही नव्हते, तरी त्यांना गुरुदेवांचे दर्शन झाले. ‘गुरुमाऊली त्यांच्या दैवी अस्तित्वाची अनुभूती सर्वांनाच देऊन सर्वांवर कृपेचा वर्षाव करत आहेत’, यासाठी गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘गुरुदेवांचे दैवी गुरुतत्त्व मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडात कार्यरत आहे’, याची अनुभूती आम्हाला सेवा करतांना सतत येत आहे. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४ आ. एका धर्मप्रेमी महिलेने धर्मशिक्षण वर्गाला येऊ लागल्यापासून त्यांच्या व्यावहारिक अडचणी दूर झाल्याने ब्रह्मोत्सवाचा विशेषांक देवघरात ठेवून त्याची प्रतिदिन पूजा करण्याविषयी विचारणे : त्यानंतर आम्ही ४ धर्मप्रेमी महिलांना ब्रह्मोत्सवाचे साप्ताहिक विशेषांक दिले. तेव्हा सर्वांनी त्या साप्ताहिकातील गुरुदेवांचे छायाचित्र बघून ते मस्तकी लावले आणि आम्हाला म्हणाल्या, ‘‘हा अंक आम्ही देवघरात ठेवून त्याची प्रतिदिन पूजा करू का ? जेव्हापासून आम्ही या धर्मशिक्षण वर्गात येत आहोत, तेव्हापासून आमच्या व्यावहारिक अडचणी दूर होत आहेत आणि घरातील कामेही पटपट होत आहेत.’’ हे ऐकून मला गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भावजागृतीही झाली.

४ इ. धर्मशिक्षण वर्गातील एका महिलेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यापासून तिच्या यजमानांचे अयोग्य वागणे पूर्णपणे थांबणे : ‘परिंचे’ (जिल्हा पुणे) या गावातील धर्मशिक्षण वर्गात सहभागी होणार्‍या एका धर्मप्रेमी महिलेने सांगितले, ‘‘मागील काही वर्षांपासून माझे यजमान दारु पिऊन मला मारहाण करायचे. धर्मशिक्षण वर्गात सांगितल्याप्रमाणे मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण करून नामजप केल्यामुळे मला मागील १५ दिवसांपासून माझ्या पतीने हात उगारणे, तर दूरच मला शिवीही दिलेली नाही. कितीतरी वर्षे मी मार खात असून केवळ गुरुमाऊलींच्या कृपेने माझा त्रास संपला आहे. गुरुदेवांची माझ्यावर अखंड कृपा आहे. गुरुदेवांनीच मला इतक्या वर्षांच्या त्रासातून मुक्त केले आहे.’’ हे सांगत असतांना त्या धर्मप्रेमी महिलेची पुष्कळ भावजागृती होत होती.’

५. श्री. मनीष चाळके (वय २५ वर्षे), पुणे

श्री मनीष चाळके

५ अ. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदेव आणि संत यांचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय ठेवणे : ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि संत यांच्या कृपेमुळे मला चिंचवड येथील गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची संधी मिळाली. सेवेला आरंभ करण्यापूर्वी माझ्या मनामध्ये गुरुदेवांनी एक विचार घातला, ‘या वर्षी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची संधी मला गुरुकृपेने मिळाली आहे. येणार्‍या आपत्काळात पुन्हा संधी मिळेल कि नाही, हे मला ठाऊक नाही. या संधीचा लाभ करून घेऊन गुरुदेव आणि संत यांचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करूया.’ हे ध्येय ठेवण्याविषयी गुरुदेवांच्या कृपेमुळे मला सुचले.

५ आ. ‘स्वतःच्या कोणत्याही कृतीमुळे कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये’, याची जाणीव ठेवून सेवा केल्याने कुणालाही न दुखावता सेवा झाल्याने सेवेतून आनंद मिळणे : सेवेला आरंभ करतांना ‘कार्यकर्त्यांची तळमळ आणि त्यांना अडचणी असूनही कार्यकर्ते मन लावून संघभावाने सेवा करत आहेत’, हे पाहूनच माझी भावजागृती होत होती. सर्वांची सेवा आणि तळमळ बघून ‘कार्यकर्तांना माझ्या बोलण्याने, माझ्या चुकीच्या कृतीने त्रास व्हायला नको. मला त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी जवळीक करून आणि प्रेमभावाने सेवा करायची आहे’, असा विचार आला. गुरुदेवांनी दिलेला हा विचार घेऊन सेवेला आरंभ केल्यावर सेवेत आनंद अनुभवता आला. तसेच रात्री झोपतांना ‘आज दिवसभरात मी कुठल्या कार्यकर्त्याला दुखावले आहे का ? कुणाबद्दल मनात प्रतिक्रिया आली का ? कुणाकडून अपेक्षा झाली का ? कुणाची चिडचिड झाली का ?’, असे चिंतन होत होते. माझ्याकडून यातील कोणताही विचार आणि कृती झाली नसल्याने मला पुष्कळ आनंद होत होता.

५ इ. प्रसारसेवेत साधारण ३० ते ३५ कार्यकर्ते असायचे; परंतु माझ्या मनात कुणाविषयी अपेक्षा, प्रतिक्रिया आल्या नाहीत. ‘दिवसभराची सेवा परिपूर्ण झाली, ती गुरुदेवांपर्यंत पोचली’, याविषयी कृतज्ञता वाटत होती.

५ ई. या प्रक्रियेमुळे स्वतःतील प्रेमभाव वाढवणे, कार्यकर्त्यांना समजून घेणे आणि न्यूनपणा घेऊन सर्व काही स्वीकारणे इत्यादी गुण वाढल्याचे जाणवले.

संतांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या सेवेची संधी दिली, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता वाटली.’ (समाप्त)

(सर्व लिखाणांचा दिनांक २१.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक