मनमोकळेपणा, तत्त्वनिष्ठता आणि अध्यात्माची आवड असणारे सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील (कै.) मोहन पेंढारकर (वय ७८ वर्षे) !

२१.१.२०२४ (पौष शुक्ल एकादशी) या दिवशी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील मोहन पेंढारकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. ५.२.२०२४ (पौष कृष्ण दशमी) या दिवशी त्यांचा उदकशांत विधी आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) मोहन पेंढारकर

१. श्री. गणेश पेंढारकर ((कै.) मोहन पेंढारकर यांचे धाकटे बंधू, वय ६७ वर्षे), सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

१ अ. शिक्षण आणि नोकरी : ‘आम्ही ४ भाऊ आणि २ बहिणी, अशी ६ भावंडे आहोत. मोहन दत्ताराम पेंढारकर (वय ७८ वर्षे) हा आमचा सगळ्यांत मोठा बंधू होता. मोहनदादा अविवाहित होता. उच्च शिक्षणाची अत्यंत आवड असल्याने मुंबईत निवासव्यवस्था नसतांनाही त्याने खडतर परिस्थितीत एम्.एस्सी. सारखे शिक्षण माटुंगा (यु.डी.सी.टी., मुंबई) येथे पूर्ण केले. त्याने ठाणे, मुंबई आणि महड (जिल्हा रायगड) येथे प्राध्यापक म्हणून तळमळीने सेवा केली.

१ आ. तत्त्वनिष्ठता : ठाणे येथील महाविद्यालयात शिकवत असतांना अनुत्तीर्ण झालेल्या काही ठराविक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे सूत्र व्यवस्थापनातील व्यक्तींकडून दादाकडे आले. ‘आपण त्यांना उत्तीर्ण करूया’, या सूत्रावरून व्यवस्थापन आणि मोहनदादा यांच्यामध्ये वाद झाला. शेवटी प्रकरण Tribunal मध्ये (विशेष प्रकारच्या तक्रारीविषयीचे कामकाज चालवणार्‍या न्यायालयात) गेले. तेथे न्यायालयीन लढा चालू झाला. त्यात हा खटला जिंकणे तसे दुरापास्त होते; पण सत्यासाठी मोहनदादाने जिवाचे रान केले आणि तो खटला गुरुकृपेने जिंकला. यात त्याची काही वर्षे गेली. त्याला बरीच आर्थिक हानीही सोसावी लागली.

१ इ. स्वतःच्या बोलक्या स्वभावामुळे त्याला माणसे जोडण्याची कला अवगत होती.

१ ई. अध्यात्माची आवड : मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनातही मनःशांती आणि साधना यांसाठी दादा रामकृष्ण मठात कांदिवली येथून खार येथे जात असे. स्वामी विवेकानंद, श्री रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या पत्नी पूज्य सारदामाता यांच्याबद्दल दादाच्या मनात अत्यंत आदरभाव होता.

१ उ. मृत्यूपूर्वी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्या भेटीची दादाची इच्छा गुरुकृपेने पूर्ण होणे : १४.१.२०२४ या दिवशी पानवळ (बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) माई मोहनदादाला भेटायला घरी आले होते. दादाला त्यांचा सत्संग मिळाला. दोघांनीही दादाला ‘काही काळजी करू नका. सर्व चांगले आहे. आनंदी रहा’, असा आशीर्वाद दिला. दादाच्या मनातही प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्या भेटीची सुप्त इच्छा होती. गुरुकृपेने ती पूर्ण झाली. त्यानंतर दादाही शांत आणि स्वस्थ झालेला दिसला. त्यानंतर आठवडाभरातच दादाला देवाज्ञा झाली.

१ ऊ. दादाच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. मृत्यूनंतर त्याचा चेहरा शांत झोपल्यासारखा वाटत होता.

२. घरात कोणताही दाब जाणवत नव्हता.

३. अंत्यविधीच्या वेळी कोणतेही अडथळे न येता सर्व विधी शांततेत पार पडले.’

२. श्रीमती हेमांगी पुराणिक ((कै.) मोहन पेंढारकर यांची थोरली बहीण, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६४ वर्षे), सांगली आणि सौ. मीरा कात्रे (धाकटी बहीण, वय ६० वर्षे), कोल्हापूर

२ अ. कलागुण अवगत असणे : ‘दादाचे हस्ताक्षर सुरेख होते, तसेच त्याच्यात ‘उत्तम चित्रे आणि रांगोळ्या काढणे, उत्तम गाणे म्हणणे, तसेच पोहणे’, असे अनेकविध कलागुण होते.

२ आ. आहार, विहार आणि व्यायाम इत्यादींविषयी जागरूक असणे : दादाला औषधांची पुष्कळ माहिती होती. त्यामुळे तो आम्हाला नेहमी औषधे, व्यायाम, खाण्याचे पौष्टिक पदार्थ इत्यादींविषयी सांगत असे. या विषयांतील त्याचा अभ्यास चांगला होता. तो स्वतःही पौष्टिक पदार्थ खाण्याविषयी आग्रही असायचा. स्वतःचा आहार, विहार आणि व्यायाम इत्यादींविषयी तो जागरूक असायचा.

२ इ. मानसिक स्थिती खालावलेली असूनही देवावर दृढ श्रद्धा असणे : दादाच्या आयुष्यात काही कटू प्रसंग घडल्याने त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. त्यामुळे ‘पुष्कळ वेळ बोलणे, एकांतात बोलणे’, असे त्याच्याकडून होत असे; परंतु शेवटपर्यंत त्याची देवावरील श्रद्धा होती, तसेच ‘नामस्मरण करणे, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आमचा पाठपुरावा घेणे’ इत्यादी करत असे.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : दादा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गोव्याला आला होता. त्या वेळी त्याची भावजागृती झाली. कार्यक्रमाला यायला मिळाल्याने तो पुष्कळ आनंदी, समाधानी आणि कृतज्ञताभावात होता.’

३. श्री. प्रसाद पेंढारकर ((कै.) मोहन पेंढारकर यांचा पुतण्या), ठाणे

३ अ. ‘मोहनकाकांना आम्ही ‘दादाकाका’ म्हणायचो. आम्ही सावंतवाडीला गेल्यावर ते आमची आपुलकीने विचारपूस करत असत.

३ आ. सनातनच्या कार्याला पाठिंबा देणे : माझे वडील (कै.) डॉ. रमेश पेंढारकर करत असलेल्या सनातनच्या कार्याबद्दल त्यांना पुष्कळ आदर होता. त्यांचा सनातनच्या कार्याला नेहमी पाठिंबा असे. तो त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी व्यक्त करत असत. ते नेहमी बाबांचे भरभरून कौतुक करत असत.

४. श्री. गौरीश पुराणिक ((कै.) मोहन पेंढारकर यांचा भाचा), पुणे

४ अ. विरक्त : ‘मोहनमामा विरक्त होता. त्याला व्यावहारिक गोष्टी आणि वस्तू यांची आसक्ती नव्हती. ‘अल्प साहित्य, कपडे आणि आवश्यक तितकेच खाणे-पिणे’, यांत आपण समाधानी राहू शकतो’, हे त्याच्या जीवनशैलीतून शिकायला मिळत असे.

४ आ. आध्यात्मिक सूत्रे सांगतांना संतांच्या चरित्रातील समर्पक उदाहरणे देणे : तो नेहमी सांगत असे, ‘‘आपले ज्ञान वाढवणे महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक ज्ञान वाढले की, जीवनातील मायेचे महत्त्व आपोआप अल्प वाटू लागते.’’ अशी आध्यात्मिक सूत्रे सांगताना तो मला संतांच्या चरित्रातील समर्पक उदाहरणे देत असे. ‘तरुण असतांना महर्षि व्यासरचित ग्रंथ वाचून माझ्यात भाव निर्माण झाला’, असे तो म्हणत असे.

४ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीचा भाव : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील एकेक शब्द महत्त्वाचा आहे’, असा त्याचा भाव होता. तो दैनिक शांतपणे वाचत असे. ‘दैनिक वाचायला घेतल्यावर ‘ते खाली ठेवूच नये’, असे वाटते’, असे तो सांगत असे.’

५. श्री. मनोज कात्रे ((कै.) मोहन पेंढारकर यांचा भाचा), पुणे

५ अ. शारीरिक त्रासांतही आनंदी आणि सकारात्मक असणे : ‘मामा रुग्णालयात असतांना आणि त्या आधीही या २ वर्षांत त्याची प्रकृती पुष्कळ खालावलेली असतांनाही त्याने कधीच गार्‍हाणे केले नाही. त्याला त्रास होत असतांनासुद्धा तो पुष्कळ आनंदी आणि सकारात्मक होता.

६. सौ. इंद्राणी कुलकर्णी ((कै.) मोहन पेंढारकर यांची भाची), पुणे

६ अ. वाचनाची आवड : ‘मोहनमामाला वाचनाची पुष्कळ आवड होती. एखादे वाचनालय होईल, इतका विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह त्याने केला होता. ही सर्व पुस्तके त्याने वाचलेली होती.

६ आ. मनमोकळा स्वभाव : आम्ही मुले मामाशी कोणत्याही विषयावर अगदी मोकळेपणाने बोलत असू. त्याचे आमच्याशी मित्रत्वाचे नाते होते. आम्ही त्याला त्याचे गुण किंवा त्याच्या चुकाही सहज सांगू शकत होतो.

६ इ. ‘उत्तम निरीक्षणक्षमता, प्रेमभाव, कुशाग्र बुद्धीमत्ता’, असे अनेक गुण त्याच्यात होते.

६ ई. भाचीला साधना करण्यास प्रोत्साहन देणे : मी पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना किंवा नंतरही मामाचा दूरभाष आल्यास तो मला नेहमी साधनेतील नव्या सूत्रांविषयी विचारत असे. तो माझे कौतुक करून मला साधनेसाठी प्रोत्साहन देत असे. त्याच्याशी बोलल्यानंतर माझे मन सकारात्मक होत असे.

६ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितल्याने त्याला त्यांच्याविषयी पुष्कळ आदर अन् प्रेम वाटायचे.

६ ऊ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मोहनमामाची सेवा करत असल्याबद्दल घरातील सर्वांचे कौतुक करणे : मोहनमामाची मानसिक स्थिती बिघडल्याने आणि त्याला आध्यात्मिक त्रास असल्याने पूर्वी घरी काही कटू प्रसंग घडले होते; परंतु तरीही सर्व विसरून घरातील प्रत्येकानेच मोहनमामासाठी जे जमेल ते केले. याविषयी प्रत्यक्षात काही सांगितले नसतांनाही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भ्रमणभाषवर बोलतांना गणेशमामाला (धाकट्या मामाला) म्हणाल्या, ‘‘तुम्ही सर्व जण एकत्र येऊन करत आहात’, हे कौतुकास्पद आहे.’’ ‘सर्वांनी मोहनमामासाठी आपल्या परीने निःस्वार्थीपणे जे केले, त्यामागील प्रेरणा आणि ऊर्जा ही श्री गुरूंनीच दिली होती’, याचीच ही प्रचीती आहे. ‘देव प्रत्येकासाठी पुष्कळ करतो आणि आपण केलेल्या लहान कृतीचीही नोंद ठेवतो’, असे मला जाणवले.

‘मोहनमामाच्या सहवासातून आम्ही जे शिकलो आणि अनुभवले, ते आत्मसात् होण्यासाठी आम्हा सर्वांकडून प्रयत्न करून घ्यावेत’, हीच सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. मोहनमामासारख्या सात्त्विक जिवाचा सहवास आम्हा सर्वांना दिल्याबद्दल भगवान श्रीकृष्ण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी आम्ही सर्व कुटुंबीय कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.१.२०२४)