जर मुसलमान तरुण नियंत्रणाबाहेर गेले, तर भारतात युद्धाचे वातावरण निर्माण होईल ! (Maulana Tauqeer Raza Threats)

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित झाल्यावरून मौलाना तौकीर रझा यांची दर्पोक्ती !

मौलाना तौकीर रझा

नवी देहली – सर्व मुसलमानांचे आपल्या देशावर प्रेम आहे. देशप्रेमामुळे मुसलमानांनी संयम बाळगला आहे. जर आमचे तरुण नियंत्रणाबाहेर गेले, तर भारतात युद्धाचे वातावरण निर्माण होईल. ते कुणाला घाबरत नाहीत. ज्यांनी चांगले काम केले, त्यांना भारतरत्न दिला जातो; पण अडवाणी यांनी कोणतेही चांगले काम केलेले नाही, अशी गरळओक ‘इत्तेहाद मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी केली आहे. ते म्हणाले की, अडवाणी यांना भारतरत्न देणे, यातून त्या पुरस्काराचा घोर अपमान करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्याच्या सूत्रावरून त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.

रझा पुढे म्हणाले की,

१. भारतात द्वेष, अप्रामाणिकपणा, अन्याय आणि बेरोजगारी वाढली आहे. याला अडवाणी उत्तरदायी आहेत.

२. मुसलमानांना देशात धर्मांधता आणि युद्धाचे वातावरण नको आहे. मशिदी पाडल्या जाव्यात, मुसलमानांना मारले जावे, त्यांचा अपमान व्हावा, त्यांच्या मुलींची दिशाभूल व्हावी, असे आम्हाला अपेक्षित नाही.

सरकारला द्वेषाच्या आधारे राजकारण करायचे आहे ! – जमात-ए-इस्लामी हिंद

‘जमात-ए-इस्लामी हिंद’चे सचिव मलिक मोहतसीम खान यांनीही अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यावरून विरोध केला आहे. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारकडून बाबरी ढाचा उद्ध्वस्त करणार्‍या लोकांचाच सन्मान करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. केंद्र सरकारला द्वेषाच्या आधारे राजकारण करायचे आहे. ज्यांना शांतता नको आहे, अशांनाच सध्याचे सरकार बक्षीस देईल. सध्याचे सरकार कायद्यानुसार काम करत आहे का, याचा विचार देशातील जनतेने करायला हवा.

संपादकीय भूमिका

  • भारतात अनेक तरुण नियंत्रणाबाहेर असल्यामुळेच आज लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, गोहत्या आदी समस्या ‘आ’ वाचून उभ्या आहेत. अशांवर वेसण घालण्यासाठी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आसाम आदी राज्यांत यंत्रणा कार्यरत झाल्यामुळेच अशी दर्पोक्ती दिली जात आहे !
  • लोकशाहीत एखाद्या सूत्राला विरोध करणे, यात चूक नाही; परंतु देशाच्या अखंडत्वाला आव्हान ठरणार्‍या अशा मौलानांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे !
  • भारतातील मुसलमान घाबरलेले आहेत, अशा प्रकारे भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, यांसारख्या भारतद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांना आता या वृत्तावरून भारताने जाब विचारला पाहिजे !