अमेरिकेची इराणच्या विरोधात हवाई आक्रमणे, सीरियात १८ आतंकवादी ठार !

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

तेहरान (इराण) – इराणपुरस्कृत आतंकवादी संघटनेने अमेरिकेच्या जॉर्डन येथील सैनिकी केंद्रावर आक्रमण करून ३ अमेरिकी सैनिकांना ठार केले होते. यानंतर ४ दिवसांतच अमेरिकेने इराणला प्रत्युत्तर देत इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ आणि आतंकवाद्यांशी संबंधित असलेल्या इराक आणि सीरिया येथील ८५ हून अधिक ठिकाणी हवाई आक्रमणे केली. या प्रत्युत्तरात सीरियामध्ये १८ आतंकवादी ठार झाल्याचे समजते. अमेरिकी सैन्याने आतंकवाद्यांशी संबंधित मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट, शस्त्रास्त्रे साठवण्याची ठिकाणे आदी ७ ठिकाणी आक्रमणे केली. अमेरिकेतील ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ने दिलेल्याच्या माहितीनुसार या आक्रमणात लांब पल्ल्याचा ‘बी-१ बाँबर’ वापरण्यात आला.

इराणच्या विरोधात आमचे प्रत्युत्तर आजपासून चालू झाले ! – बायडेन

या आक्रमणावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, आमचे प्रत्युत्तर आजपासून चालू झाले आहे. हे प्रत्युत्तर आमच्या निवडणुकीच्या वेळीही चालू राहील. अमेरिकेला मध्य पूर्व किंवा जगात कुठेही संघर्ष नको; परंतु जे आमची हानी करू इच्छितात, त्यांना हे कळू द्या की, जर तुम्ही एखाद्या अमेरिकी नागरिकाला त्रास द्याल, तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.

इराणी सैन्याकडून निषेध !

इराणी सैन्याने या आक्रमणांचा निषेध केला असून ‘यामुळे प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ शकते’, असा इशारा दिला आहे. ही हवाई आक्रमणे इराकी सार्वभौमत्वाचे उल्लंघन करतात, इराकी सरकारच्या प्रयत्नांना खीळ घालतात, असेही इराणी सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. यावर अमेरिकी सैन्याने सांगितले की, आम्ही इराणच्या सरकारला आक्रमणाची माहिती आक्रमण करण्याआधीच दिली होती.