फ्रान्समध्येही भारतीय ‘युपीआय’ला (ऑनलाईन’ व्यवहाराला)  प्रारंभ !

पॅरिसमधील आयफेल टॉवर

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील भारतीय दूतावासाने २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (युपीआय) औपचारिकपणे उद्घाटन केले. आता लोक याद्वारे आयफेल टॉवरचे तिकीट काढू शकतील. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे पाहून अतिशय छान वाटले. युपीआय जागतिक बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे डिजिटल पेमेंटला (ऑनलाईनला) चालना मिळेल.

भारतीय दूतावासाने येथे प्रजासत्ताकदिनाच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. याच काळात युपीआयचे औपचारिक उद्घाटन झाले. या वेळी भारत आणि फ्रान्स यांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीनंतर फ्रान्समध्ये युपीआयचे उद्घाटन करण्यात आले आहे. मॅक्रॉन २५ जानेवारीला जयपूरला पोचले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना युपीआयविषयी माहिती दिली होती. या वेळी दोन्ही नेत्यांनी चहा प्यायला होता आणि त्याचे पैसे मॅक्रॉन यांनी ऑनलाईन भरले होते.

काय आहे युपीआय ?

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयला वर्ष २०१६ मध्ये पहिल्यांदा भारताने प्रारंभ केले. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या आस्थापनाने याची निर्मिती केली आहे. यामध्ये थेट बँक खात्यात सुलभ पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.