अंमळनेर येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ !
अंमळनेर (जिल्हा जळगाव) – शिक्षणक्षेत्रात आता आपल्याला काहीही करायचे नाही, असे ठरवून सरकारने या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे सहस्रो उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत वयस्कर झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली असून हे पुष्कळ धोकादायक आहे, असे वक्तव्य ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. (साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी भाषा साहित्य आणि त्या संदर्भातील धोरणे यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकणे अपेक्षित आहे ! ‘राजकारण्यांनी काय केले ?’, यापेक्षा ‘साहित्यिकांनी मराठीसाठी काय केले ?’, यावरही ते बोलले असते, तर अधिक उचित झाले असते ! – संपादक) ते संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डॉ. शोभणे पुढे म्हणाले, ‘‘तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात ?निरुद्दोगीपणाचा प्रश्न पुष्कळच गंभीर झाला आहे. निरुद्योगाच्या याच विवंचनेतून शेतकर्यांप्रमाणे उद्या तरुणही जीवन संपवू लागले, तर ते खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे ? तरुणांची ऊर्जा वहात्या पाण्यासारखी असते. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते.’’ (पूर्वीची शिक्षणप्रणाली ही गुरुकुलावर आधारित असल्याने त्यातून बाहेर पडणारे विद्यार्थी परिपूर्ण होऊन बाहेर पडत असत. आताची शिक्षणपद्धत ही इंग्रजाळलेली असल्याने ती केवळ ‘पोटार्थी’ विद्यार्थी घडवते. साहित्यात या समस्येचे पडसाद किती उमटले ? याविषयी डॉ. शोभणे यांनी सांगितले असते, तर बरे झाले असते ! – संपादक)
प्राचीन काळी धर्म हाच सर्वांत श्रेष्ठ होता !
प्राचीन काळी धर्म हाच सर्वांत श्रेष्ठ होता. त्या वेळी असलेली राज्ये ही धर्मसत्ताक होती. नंतर काही कालावधीनंतर राजसत्तेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देऊन धर्मसत्तेला त्यांच्या अंकीत ठेवले. नंतरच्या कालावधीत राजा हाच सर्वोच्च समजाला जाऊ लागला. धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. इतिहासाची हीच चक्रे आता पुन्हा नव्याने फिरू लागली आहेत, असेही डॉ. शोभणे या प्रसंगी म्हणाले.
या प्रसंगी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या महामंडळाचे सर्व पदाधिकारी आणि आयोजक उपस्थित होते.