अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
अहिल्यानगर – २२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भानस हिवरे या गावात नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की, आता घराघरातील हिंदूंनी एकमेकांना भेटल्यावर ‘जय श्रीराम’ म्हणूया, तसेच वाढदिवस धर्मशास्त्राप्रमाणे औक्षण करून करूया.
घराघरात शौर्य निर्माण झाले, तर रामराज्याला वेळ लागणार नाही ! – प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती
या वेळेस उपस्थितांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरगावकर म्हणाल्या की, मुली आणि महिला यांवर होणारे आघात रोखायचे असतील, तर प्रत्येकीत शौर्य जागृत होण्याची आवश्यकता आहे. घराघरांतून शक्ती आणि भक्ती या दोन्हींची उपासना करायला हवी.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची यशोगाथा श्री. रामेश्वर भूकन यांनी या वेळेस सांगितली. कु. श्रुती शिरसाट यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. स्थानिक ग्रामस्थ श्री. भगवान आरले यांनी केलेल्या शंखनादाने सभेचा आरंभ झाला. गावातील युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सभेला ९०० हून अधिक उपस्थिती होती
क्षणचित्रे
१. सभेला महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती. महिलांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
२. सभास्थळी प्रभु श्रीरामांच्या ८ फुटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
३. श्री रामराज्याच्या प्रतिज्ञेनी सभेची सांगता झाली.