सतत आनंदी असणारे आणि सर्वांना साहाय्य करणारे चिंचवड, पुणे येथील चि. अमोघ जोशी अन् समंजस, आनंदी आणि शिकण्याची वृत्ती असलेल्या फोंडा, गोवा येथील चि.सौ.कां. योगिनी आफळे !

पौष कृष्ण अष्टमी (३१.१.२०२४) या दिवशी चिंचवड, पुणे येथील चि. अमोघ जोशी आणि फोंडा, गोवा येथील चि.सौ.कां. योगिनी आफळे यांचा विवाह ३१.१.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि पुणे येथील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. अमोघ जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. अमोघ जोशी

१. पू. सुलभा जोशी (आजी, अमोघ यांच्या आईची आई), चिंचवड, पुणे.

अ. ‘अमोघचा स्वभाव मनमोकळा असल्याने तो सतत आनंदी असतो.

आ. तो सेवेचे नियोजन व्यवस्थित करतो.

इ. तो घरातही सर्वांना साहाय्य करतो. तो माझी काळजी घेतो.

ई. धर्माचरण आणि सेवेशी अनुसंधान असल्याने त्याचा चेहरा तेजस्वी दिसतो.’

२. सौ. अपर्णा गंगाधर जोशी आणि श्री. गंगाधर जोशी (आई आणि वडील), चिंचवड, पुणे.

२ अ. ‘गणपति आमचे कुलदैवत आहे. अमोघ याची जन्मतिथी श्री गणेशचतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) आहे. त्यामुळे ‘अमोघ हा श्री गणेशाचा प्रसाद आहे’, असे आम्हाला वाटते.

२ आ. राष्ट्रप्रेम : अमोघला इतिहासाची विशेष आवड असून त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. तो त्याच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे, महाभारतातील प्रसंग इत्यादी अधोरेखित करतो.

२ इ. सेवा आवडीने करणे : तो दैनंदिन सेवेला नेहमीच प्राधान्य देतो. इतरांच्या सेवेत काही अडचण आल्यास त्यांना साहाय्य करण्याकडे त्याचा कल असतो. तो वाचकांशी चर्चा करणे आणि त्यांना उत्पादने पोचवणे, अशा सेवा करतो. तो कोणतीही सेवा आज्ञापालन म्हणून करतो. तो सेवा तत्परतेने, विनाविकल्प अन् प्रतिक्रिया न देता पूर्ण करतो.’

३. सौ. वैदेही विनय भालेराव (चि. अमोघची मावशी), रावेत, पुणे

३ अ. प्रेमभाव : ‘पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी अमोघच्या घरी रहायला आहेत. तो पू. आजींची पुष्कळ काळजी घेतो. तो स्वतः पदार्थ ग्रहण करण्याआधी पू. आजींनी ते ग्रहण केले आहे ना, याविषयी विचारतो.

३ आ. इतरांना साहाय्य करणे : वर्ष २०२० मध्ये माझ्या मोठ्या नणंदेचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्या वेळी माझ्या नणंदेचे पती (वय ७५ वर्षे) घरी एकटेच होते. अमोघचे घर त्यांच्या घराजवळ असल्याने मी चि. अमोघला नणंदेच्या यजमानांच्या साहाय्याला जाण्यासाठी कळवले. तेव्हा तो ५ – १० मिनिटांत तिथे पोचला होता. त्यामुळे त्यांना धीर आला होता.

३ इ. अपेक्षा न करणे : मागील वर्षी आम्ही अमोघच्या विवाहाविषयी बोलत होतो. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मला साधना करणारी मुलगी हवी.’’ यावरून ‘त्याच्या कुठल्याच अपेक्षा नाहीत’, असे मला वाटले. ‘देवाला माझी काळजी आहे’, असा त्याचा भाव असतो.

३ ई. त्याला सात्त्विक किंवा घरातील पदार्थ आवडतात. बर्‍याच वेळा तो कार्यालयात जातांना घरून जेवणाचा डबा घेऊन जातो.

३ उ. त्याने साधनेला आरंभ केल्यापासून ‘तो अधिक शांत आणि स्थिर झाला आहे अन् त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला आहे’, असे मला वाटते.’

४. पुणे येथील साधिका

४ अ. सौ. पूजा विनायक मांडके

१. ‘अमोघ ३ वर्षे दैनिक वितरणाची सेवा करत आहे. वितरणासाठी दैनिकाची संख्या अधिक असली, तरीही तो कंटाळा करत नाही. एखाद्या दैनिक वितरकाला अडचण आल्यास त्याचे दैनिक वितरण करण्यास त्याची सिद्धता असते.’

४ आ. श्रीमती शांता दराडे आणि सौ. लता फरताळे (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

अ. ‘अमोघ प्रेमळ, मनमिळाऊ, सतत हसतमुख, तत्पर आणि सकारात्मक असतो.

आ. सेवेत असतांना तो मनातल्या मनात भावप्रयोग करत असतो. त्यामुळे त्याच्यासह सेवेला जातांना आनंद मिळतो.’

४ इ. श्रीमती मीनाक्षी पांडे (वय ७० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), चिंचवड, पुणे.

४ इ १. सेवाभावी वृत्ती : ‘श्री. अमोघ जोशी यांना शैक्षणिक काळात त्याचे आजोबा कै. जगन्नाथ जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचा सहवास लाभला. तेव्हा अमोघ आजोबांना सेवेत साहाय्य करत असे. तो कष्टाळू आणि सेवाभावी वृत्तीचा आहे. तो आम्हाला दूरचे संपर्क करण्यासाठी साहाय्य करतो, तसेच तो दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतो. या वर्षी त्याला त्याच्या आस्थापनाकडून चांगले काम केल्याबद्दल पारितोषिक मिळाले आहे.

४ इ २. संतांप्रती भाव : त्याला पू. (श्रीमती) सुलभा जगन्नाथ जोशीआजी यांच्या सहवासात आणि सत्संगात रहायला मिळत आहे. तो कार्यालयाला जाण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करून बाहेर पडतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ११.१.२०२४)

चि.सौ.कां. योगिनी आफळे यांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि.सौ.कां. योगिनी आफळे

१. श्री. वैभव आफळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. गौरी आफळे (वडील आणि आई), वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (आजी, योगिनीच्या आईची आई), फोंडा, गोवा.

१ अ. चि.सौ.कां. योगिनीचे संपूर्ण दायित्व देवानेच घेतलेले असणे

१ अ १. योगिनीच्या जन्मापासून देवाने तिला सतत सत्संग आणि सत्-मधेच ठेवले आहे.

१ अ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभणे : ‘योगिनी २ वर्षांची असतांना आम्ही (योगिनीचे आई-बाबा यांनी) पूर्णवेळ साधनेस आरंभ केला. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी योगिनीच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते आम्हाला म्हणाले, ‘‘हिची काळजी करू नका.’’ त्यांनी आम्हाला हे आशीर्वचन दिल्याची प्रचीती मागील २२ वर्षे आम्ही घेत आहोत.

१ आ. हट्ट न करणे आणि काटकसरीपणा : कपडे, खेळणी, शिक्षण किंवा महागड्या वस्तू यांसाठी तिने कधी हट्ट केला नाही. उलट आम्ही कधी तरी तिच्यासाठी व्यय करत असलो, तर ती आम्हाला म्हणायची, ‘‘आपण साधक आहोत. देवाचे भक्त आहोत.’’ एखादा व्यय करण्याआधी योगिनी परिस्थिती आणि आवश्यकता याचा विचार करते अन् मग आम्हाला विचारून योग्य तो निर्णय घेते.

१ इ. दोन्ही परिवारांना एकमेकांविषयी अपेक्षा नसणे : अलीकडे विवाह हा एक बाजार आणि व्यवहार झाला आहे; पण जोशी कुटुंबाने पैसा, शिक्षण आणि नोकरी यांपेक्षा साधक अन् सनातन परिवार याला महत्त्व दिले. अशा परिवाराशी देवानेच आम्हाला जोडून दिले, यासाठी कृतज्ञताभाव दाटून येतो.

१ ई. अनुभूती – तिन्ही गुरु एकच असल्याचे जाणवणे : विवाहाच्या आमंत्रणाची पहिली पत्रिका देण्यासाठी आम्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या दर्शनाच्या वेळी आम्हा कुटुंबियांना तेथे साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवले. तेव्हा तिन्ही गुरु एकच असल्याची ही अनुभूती घेतल्यावर आमची भावजागृती झाली.

१ उ. विवाह ठरल्यावर भगवंताने सुचवलेले कृतज्ञतापुष्प

आशीर्वादरूपी चैतन्याने, विवाह संस्कार निर्विघ्न व्हावा ।
आवाहन करतो देवा, आवाहन करतो ।
निमंत्रण स्वीकारूनी, आशीर्वाद आम्हा द्यावा ।। १ ।।

आवाहन करतो देवा, आवाहन करतो ।
आशीर्वादरूपी चैतन्याने, विवाह संस्कार निर्विघ्न व्हावा ।। २ ।।

आवाहन करतो देवा, आवाहन करतो ।
हा केवळ विवाह विधी नसूनी, भगवंताचा वास तिथे असावा ।। ३ ।।

आवाहन करतो देवा, आवाहन करतो ।
जाणीव ही अंतरी ठेवूनी, आमचा कृतज्ञताभाव जागृत रहावा ।। ४ ।।

१ ऊ. चि.सौ.कां. योगिनीसाठी सुचलेले कृतज्ञतापुष्प

शिकवेल व्यवहार तुला देवच आता ।
भगवंताने ठेवले तुला साधनेच्या चैतन्यमय प्रवाहात ।
तुझे मन त्यामुळे होते कृष्णमय ।। १ ।।

ठरला विवाह हा भगवंत कृपेने ।
मिळाली साधनेची साथ तुला सद्गुरु कृपेने ।। २ ।।

साधना हेच ध्येय ठेवूनी ।
आता पुढील वाट तुझी संसाराची ।। ३ ।।

शिकवेल व्यवहार तुला देवच आता ।
घेशील अनुभूती त्यात तू त्या देवाची आता ।। ४ ।।

२. (पू.) लक्ष्मण मनोहर गोरे (आजोबा, योगिनीच्या आईचे वडील)

अ. ‘योगिनी बालपणापासून शांत, संयमी, समंजस आणि सतत आनंदी आहे, तसेच ती हसतमुख चेहर्‍याची आहे. ती घरात असल्यावर वातावरण आनंददायी असते.आ. तिची ग्रहणक्षमता आणि शिकण्याची वृत्ती पुष्कळ चांगली आहे. तिला संस्कृत भाषेची विशेष आवड आहे.

इ. ती सायकल, दुचाकी, स्वयंपाक आणि संगणक हे पाहून पाहून लगेचच शिकली. त्यानंतर तिच्या आईने त्याविषयी बारकावे तिला शिकवले. तिने अल्पावधीत सतारवादनही शिकून घेतले.

ई. विवाहापूर्वी ३ ग्रहांचे शांतीविधी करायचे होते. त्यासाठी तिला ५३ सहस्र मंत्रजप करायचा होता. तो मंत्रजप तिने चिकाटीने आणि भावपूर्ण केला.

‘चि. सौ.कां. योगिनी आणि चि. अमोघ यांचे वैवाहिक जीवन साधनामय होवो आणि त्यांच्यावर गुरुकृपा अखंड राहो, ही प्रार्थना.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ३.१.२०२४)

३. श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. समाधानी वृत्ती : ‘कु. योगिनीचे बालपण देवद आश्रमात गेले. लहानपणापासून तिने कधी फारसा हट्ट केल्याचे पाहिले नाही. एखादी वस्तू वा पदार्थ ‘फार आवडतो’ किंवा ‘अजिबात आवडत नाही’, असे तिचे कधी नव्हते.

३ आ. आनंदी अन् हसरा स्वभाव : बालपणापासूनच योगिनीचा स्वभाव आनंदी आणि हसरा आहे. तिला विनोदाची चांगली जाण आहे. त्या विनोदांना ती सहज हसून दाद देते. त्यामुळे तिच्या समवेत सेवा करणार्‍या साधकाला ताण येत नाही. गौरीताईंनी (सौ. गौरी आफळे यांना) अनेक साधकांना जोडले आहे. त्या प्रेमपूर्वक साधकांसाठी काही-ना-काहीतरी करत असतात. ते करतांना बर्‍याचदा त्याची देण्या-घेण्याची सेवा कु. योगिनीला करावी लागते; मात्र ते करतांना ती अत्यंत आनंदाने करते.

३ इ. अपेक्षा नसणे

३ इ १. सुखाची अपेक्षा नसणे : कु. योगिनी अगदी ४ – ५ वर्षांची असतांना तिची आई, सौ. गौरीताई यांच्या समवेत पनवेल आश्रमात येत असे. कधीकधी गौरीताई रात्री थांबून छायाचित्र, दैनिक सनातन प्रभातसाठी मुखचित्र इत्यादींची सेवा करत असत. तेव्हा कु. योगिनी त्यांच्या मांडीवर किंवा संगणकाच्या पटलाच्या खाली किंवा शेजारच्या आसंदीतच झोपत असे. तेव्हा तिची कोणतीही मागणी नव्हती.

३ इ २. गायन, छायाचित्रणादी कौशल्याविषयी कौतुकाची अपेक्षा नसणे : योगिनीला गायन, वादन यांची आवड आहे. सूरपेटी वाजवणे, वीणा वाजवणे इत्यादी ती करते; मात्र ‘गायन आणि वादन मला येते’, किंवा ‘ते अन्यांनी ऐकावे, माझे कौतुक करावे’, अशी तिची कधीच अपेक्षा नसते. योगिनीकडे इतके सारे कौशल्य आहे, हे तिच्या जवळच्या व्यक्तींना अजूनही माहितीही नाही.

३ ई. आईच्या समवेत पहाटे सेवेला येणे : सौ. गौरीताई देवद आश्रमात अल्पाहार सेवा करायला पहाटे येत असत. तेव्हा योगिनी लहान असूनही आईसह पहाटे उठून येई. ती अल्पाहार सेवेत छोट्या-छोट्या सेवा करून साधकांना साहाय्य करत असे. आश्रमात डोसे किंवा इडली असा मोठा अल्पाहार बनवायचा असल्यास योगिनी अगदी पहाटे ४ वाजताही उठून आईसह येत असे.

३ उ. विविध प्रसंगी स्थिरपणे कर्तव्य करत रहाणे : सौ. गौरीताई यांनी पनवेल, रायगड येथून गोवा येथे येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोव्यात घर घेतले. ते पालटून पुन्हा नवीन घर घेतले. यातच पू. गोरेआजोबांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. योगिनीच्या बाबांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली. या सर्व प्रसंगांत योगिनी स्थिर राहून आवश्यक त्या गोष्टी करत होती.

कु. योगिनीलाही काही काळ अशक्तपणामुळे चालण्यासाठी त्रास होत असे; मात्र तिने आवश्यक ते सर्व शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्या सर्वांवर मात केली.

३ ऊ. उपजतच चांगली समज आणि परिपक्वता असणे

१. कु. योगिनीला लहानपणापासूनच वयापेक्षा अधिक चांगली समज आणि परिपक्वता असल्याचे लक्षात आले. साधकांशी कसे वागावे ? बाहेरच्या व्यक्तींशी कसे वागावे ? हे तिला समजवावे लागले नाही.

२. तिच्यापेक्षा मोठ्या वयाची साधिका अयोग्य वर्तन करत असेल, तर तिला ते लगेचच समजते. त्याविषयी ‘त्या साधिकेला काही सांगायला हवे; मात्र आपण लहान आहोत’, याची तिला जाण असते. त्या साधिकेचे कोणते दोष आड येतात, हे तिला लवकर समजते. साधकांच्या संदर्भातही तिचे निरीक्षण चांगले असते.

कु. योगिनी म्हणजे सनातनच्या आश्रमातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घडवलेली एक आनंदी साधिका आहे. त्यामुळे ‘ती जेथे जाईल, तेथे रामनाथी आश्रमातील चैतन्य साेबत घेऊन जावो आणि सर्वांना आनंद देवो’, ही तिच्या विवाहानिमित्त श्री गुरुचरणी प्रार्थना ! (१८.१.२०२४)

४. कलेशी संबंधित साधिका

४ अ. व्यवस्थितपणा : ‘योगिनीचे राहणीमान व्यवस्थित आणि नीटनेटके असते. तिचा खण, संगणक, वह्या यांतून तिचा व्यवस्थितपणा हा गुण प्रकर्षाने जाणवतो.

४ आ. पाककला : योगिनीला स्वयंपाकाची आवड असल्याने तिला सगळा स्वयंपाक बनवता येतो.

४ इ. निर्मळता : योगिनी मनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने सांगते आणि स्वतःच्या चुकाही प्रांजळपणे स्वीकारते. त्यामुळे तिचे मन एका लहान मुलाप्रमाणे निर्मळ वाटते. सेवा करतांना तिच्याकडून झालेल्या चुकांचे चिंतन ती चांगल्याप्रकारे करते, तसेच ते विभागातील साधकांसमोर पुष्कळ प्रामाणिकपणे मांडते.

४ ई. मन खंबीर असणे : कोणत्याही प्रसंगात ती जास्त वेळ अडकत नाही. ती त्यातून लगेच बाहेर पडते. अशा प्रसंगात ती सकारात्मक विचार करून स्वतःला स्थिर ठेवते.

४ उ. दैवी आवाज : योगिनीचा आवाज दैवी असल्याचे जाणवते. तिच्या आवाजामध्ये विलक्षण गोडवा आणि नम्रता असल्यामुळे ‘तो ऐकतच रहावा’, असे वाटते.

४ ऊ. सेवेतील गती : ‘योगिनीची ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालीमध्ये छायाचित्रांवर काम करण्याची गती अधिक आहे. ती अल्प वेळेत पुष्कळ छायाचित्रांवर काम करते. तिची ग्रहणक्षमता पुष्कळ चांगली आहे. ती कोणतीही सेवा अल्प कालावधीत शिकते.

४ ए. दायित्व घेऊन सेवा करणे : लहान वयातही योगिनी काही सेवांचे दायित्व घेऊन त्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची. कक्षातील स्वच्छता सेवा, छायाचित्रांची सेवा अशा बर्‍याच सेवांचे तिने दायित्व घेतले आहे आणि त्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न ती करत असे.

४ ऐ. उपजत परिपक्वता असणे : आम्ही कु. योगिनीला ती पुष्कळ लहान असल्यापासून पाहिले आहे. तेव्हापासूनच ‘तिच्यामध्ये परिपक्वता आहे’, असे जाणवायचे. तिच्या वयाची मुले जिथे खेळणे, दंगा करणे आणि करमणूक यांमध्ये व्यस्त असायची, तिथे योगिनी गुरुसेवा शिकून ती घंटोन्‌घंटे चिकाटीने करणे, सात्त्विक कला शिकणे, उदा. पाककला, पेटी वाजवणे, सतार वाजवणे, गायन शिकणे यांमध्ये व्यस्त असायची.

४ ओ. भाव : योगिनीमध्ये देवाप्रती पुष्कळ भाव आहे. ती लहान असतांना तिची वैयक्तिक कामे करतांना, तसेच खेळत असतांना पाहिल्यावर ‘ती देवाच्या विश्वात रमली आहे’, असे जाणवायचे. तिला कृष्णासंदर्भात सुचलेल्या पुष्कळ प्रार्थना तिने एका कागदावर लिहिल्या आहेत. त्या वाचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली.

४ औ. जाणवलेला पालट : पूर्वी योगिनीचा स्वभाव एकटे रहाण्याचा होता. ती तिच्या आईसोबतच असायची. प्रत्येक गोष्टीसाठी तिला आईचे साहाय्य लागत असे; मात्र मागील काही वर्षांत तिने स्वतःत चांगला पालट केला आहे. आता ती सर्वांसमवेत मिसळते. तिने आश्रमातील अनेक साधिकांच्या समवेत मैत्री केली आहे.’

(वरील सूत्रांचा दिनांक १८.१.२०२४)