राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या ‘दगाबाज’ या पुस्तकाचे प्रकाशन !

‘दगाबाज’च्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा वापर करून, तसेच विरोधकांशी असलेली मैत्री आणि प्रसारमाध्यमे यांचा चाणाक्षपणे वापर करून स्वतःची काळी बाजू लपवली आहे. त्यांचे खरे स्वरूप जनमानसासमोर आणण्याचा प्रयत्न मी केला आहे. शरद पवार यांची ६ दशकांतील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्टाचारी आणि दरोडेखोर वाटतात. मागील २० हून अधिक वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. सहस्रो तरुणांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची निःस्वार्थ सेवा केली आहे. वर्ष २०२० च्या कोरोना महामारीच्या काळात पक्ष नेतृत्व, पक्षाचे नेते, मोठे पदाधिकारी यांच्या सार्वजनिक कार्याची चिकित्सा मी चालू केली. त्या चिकित्सेचा परिणाम म्हणजे शरद पवार यांची काळी बाजू मांडणारे ‘दगाबाज’ हे पुस्तक आहे, असे वक्तव्य या पुस्तकाचे लेखक एम्.बी. पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक सुरिंदर अरोरा, आर्.पी. सिंग, भरत निचिते, उदय कठे उपस्थित होते.

सौजन्य मुंबई.लाईव9 

एम्.बी. पाटील पुढे म्हणाले की,

१. ‘शरद पवार यांच्या ६ दशकांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनावर अन् जनसामान्य नागरिकांना माहिती नाही’, अशी दुसरी वास्तववादी बाजू या पुस्तकात असून ‘सामान्य माणूस, मतदार, तरुण वर्ग, शेतकरी, कष्टकरी वर्गाला शरद पवार यांनी कसे फसवले ?’, हे या पुस्तकात आहे.

२. ‘राजकारण आणि देशाच्या विकासासाठी पवार यांचे नेमके योगदान काय ?’, ‘त्यांनी नेमके काय करायला पाहिजे होते ?’, याची कारणमीमांसा या पुस्तकाच्या माध्यमातून केली आहे. पवार आणि इतर पुढारी यांना विरोधाला विरोध म्हणून या पुस्तकाच्या निर्मिती मागील उद्देश नाही.

३. शरद पवार यांनी स्वतःविषयाची प्रतिमा जाणीवपूर्वक उंचावली आहे. त्यांची सर्व धोरणे, योजना आणि कार्यक्रम हे प्रथम स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश आणि किंबहुना ज्या जातीचे ते आहेत, त्यांचेही ते होऊ शकलेले नाहीत, हे वास्तव आहे.

४. ‘दगाबाज’ या पुस्तकाचा लेखक म्हणून माझे आणि ‘अदिती प्रकाशन संस्थे’चे हे पहिलेच पुस्तक आहे. आम्हाला मुंबई येथे प्रकाशक मिळाले नाहीत; म्हणून आम्ही देहली येथे हे पुस्तक प्रकाशित केले.

५. शरद पवार यांची आरक्षणासंबंधी भूमिका, ‘एन्रॉन’ प्रकरण, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकरी हत्याकांड, आदिवासी समाजाची दुर्दशा, नामांतर आंदोलन, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, गरीब मराठ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण, सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्यांवरील दरोडे, लवासा प्रकरण आणि इतर भूमी घोटाळे, सिंचन घोटाळा, मुंबई येथील भूखंड घोटाळे, शिखर बँक घोटाळा, आय.पी.एल्. घोटाळा, बनावट मुद्रांक आणि ‘टुजी स्पेक्ट्रम’ घोटाळे, डि प्लस झोन आणि एम्.आय.डी.सी.’मधील सबसिडी आणि जमीन घोटाळे, कृषी कर्जमाफ आणि अनुदान घोटाळे या विविध प्रकरणांसमवेत महाराष्ट्रातील काका-पुतण्या वादाशी थेट संबंध समवेत सार्वजनिक क्षेत्रातील रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मराठा मंदिर संस्था या आणि इतर अनेक संस्था अनधिकृतपणे आणि अनैतिक मार्गाने शरद पवार अन् त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कह्यात घेऊन बळकावल्या आहेत. यांविषयीची सर्व माहिती पुस्तकात दिली आहे.