‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत मनातील प्रत्येक इच्छा पोचते आणि ते ती पूर्णही करतात’, याची आलेली प्रचीती

सौ. प्राची मसुरकर

१. वाराणसी आश्रम हा रामनाथी आश्रमासारखा वाटणे

‘वाराणसी आश्रमाचे नूतनीकरण झाल्यानंतर मला तेथे रामनाथी आश्रमासारखेच वाटू लागले आहे. मला आश्रमातून कुठे बाहेर जावेसेच वाटत नाही. मी केवळ अधिकोष आणि वैद्यकीय उपचारापुरतेच बाहेर जाते.

२. बरीच वर्षे कुठेही बाहेर न गेल्यामुळे कुठेतरी बाहेरगावी जाण्याचा विचार मनात येणे आणि त्याविषयी सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांना त्यांना अपेक्षित असे होण्यासाठी सांगणे

मी चार वर्षांपासून कुठेही बाहेर गेले नव्हते. काही दिवसांपूर्वी ‘पालट म्हणून कुठेतरी जाऊन यावे’, असे वाटत होते; पण ‘कुठे जावे ?’, हे लक्षात येत नव्हते; म्हणून मी मनातून प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) म्हटले, ‘तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे कराल.’ नंतर मी माझ्या सेवेमध्ये व्यस्त झाले आणि ‘मला पालट म्हणून बाहेर जायचे होते’, हा विचार माझ्या मनातून पूर्णतः निघून गेला.

३. आश्रमातूनच रामनाथी आश्रमात जाण्याविषयी विचारणा झाल्यावर वरील प्रसंगाची आठवण होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

काही दिवसांनी एका साधिकेने अचानकपणे मला ‘‘तुम्ही गोव्यातील रामनाथी आश्रमात जाणार का ?’’, असे विचारले. तेव्हा मी ‘‘हो’’ म्हटले; नंतर माझ्या लक्षात आले की, ‘काही दिवसांपूर्वी मी प.पू. डॉक्टरांना मला पालट म्हणून कुठे जाणे आवश्यक आहे का आणि असल्यास कुठे जायचे ?’, हे ठरवायला सांगितले होते. त्यानुसार हे नियोजन झाले आहे.’ तेव्हा  ‘प.पू. डॉक्टरांंचे माझ्यावर किती बारीक लक्ष असते ! मनातील प्रत्येक इच्छा ओळखून ते ती पूर्णही करतात’, हे माझ्या लक्षात येऊन मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ प्रत्यक्षातही मी रामनाथी आश्रमात गेले.

– सौ. प्राची मसुरकर (वय ६२ वर्षे), वाराणसी (२.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक