सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू असून ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना ! – छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

अन्‍न नागरी आणि पुरवठा मंत्री अन् राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ

नाशिक – सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू आहे; पण ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो, हे सरकार विसरले आहे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर येथे केली.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, भविष्यात दलित आणि आदिवासी यांच्यातही कुणीही घुसतील. असे करता येते का ? मला दलित आणि आदिवासी समाजाच्या नेत्यांना विचारायचे आहे. याचे पुढे काय होणार ? प्रमाणपत्र घेऊन आदिवासी होण्याचा प्रकार सोडवतांना सरकारच्या नाकी नऊ येत आहे. हा ‘ओबीसीं’वर अन्याय आहे की, मराठ्यांना फसवले जात आहे ? मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे. आमचे आरक्षण संपले. आता पुढे काय करायचे ? असा प्रश्न पडला आहे. शिक्षणासह नोकरभरतीत आपल्याला संधी मिळणार नाही, तिथे मराठे वाटेकरी असणार आहेत. ग्रामपंचायती आणि पंचायत समित्या यांमध्ये आमचे लोक निवडून येत होते, ते सर्व आता जाणार आहे.