बनावट जिर्‍याची विक्री करणार्‍या दोघांना भिवंडी पोलिसांकडून अटक !

लाकडी भुसा आणि रासायनिक पावडर वापरून जिरे बनवले

भिवंडी पोलिसांकडून सापळा रचून दोघांना अटक

ठाणे, २८ जानेवारी (वार्ता.) – शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जण बनावट जिर्‍याची विक्री करण्यासाठी टेंपो घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तेथे आलेल्या शादाब इस्लाम खान (वय ३३ वर्षे) आणि चेतन रमेशभाई गांधी (वय ३४ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. ते पालघर जिल्ह्यातील एका कारखान्यात बडीशेपचा टाकाऊ भाग, लाकडी भुसा आणि रासायनिक पावडर वापरून जिरे बनवत असल्याचे भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे. पोलिसांनी २ सहस्र ३९९ किलो वजनाचा ७ लाख १९ सहस्र ७०० रुपयांच्या जिर्‍याच्या साठ्यासह ४ लाख रुपयांचा टेंपो जप्त केला आहे.