मुख्य कार्यक्रमात व्यासपिठावर केवळ २ साहित्यिक, तर १२ राजकारणी असणार !

  • अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  • ‘संमेलनात राजकीय लोकांचा भरणा नको’, या ज्येष्ठ साहित्यिकांच्या मागणीला तिलांजली !

सांगली, २७ जानेवारी (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहेत, तर १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे, असे पत्रिकेतील माहितीवरून दिसून येते. संमेलनाच्या उद्घाटनाला माजी लोकसभा अध्यक्ष, दोन्ही उपमुख्यमंत्री, तर समारोपाला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि विधान परिषदेचे उपसभापती आणि भाषामंत्री दीपक केसरकर यांना स्थान दिले आहे. ‘संमेलनात राजकीय लोकांचा भरणा नको’, अशा ज्येष्ठ साहित्यिकांची मागणी असते; परंतु तसे होणार नसल्याचे कार्यक्रम पत्रिकेवरून उघड होते.

साहित्य महामंडळाच्या अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळाने यजमानपद स्वीकारलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या दिवशी पू. सानेगुरुजी साहित्यनगरी, प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. संमेलनाला २५ ऐवजी ५० लाख रुपयांचे शासनाचे अनुदान मिळण्याविषयी चर्चा चालू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले असून साहाय्य आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे संमेलनाचे दायित्व आहे.

अन्य घडामोडी 

१. संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन करतील. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे विशेष निमंत्रित आहेत. (साहित्य संमेलनाचे उद्घाटन एखाद्या साहित्यिकाच्या हस्ते करायला हवे ! – संपादक)

२. संमेलनातील समारोपालाही ज्येष्ठ साहित्यिकांची उपस्थिती नसेल. प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे उपस्थित रहाणार आहेत.

मुख्य कार्यक्रमांसाठी आजी-माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित रहातील, तसेच पत्रिकेत नावे दिलेल्या राजकीय व्यक्ती असतील. काही नावे विचारात आहेत, तसेच त्या वेळी कुणाचा सत्कार करायचा, कुणाला मंचावर बसवायचे, हे ठरवण्यात येईल. – डॉ. अविनाश जोशी, संमेलन आयोजक

राजकीय विषयावर २ परिसंवाद ! 

संमेलनातील ‘राजकीय आणि सामाजिक प्रदूषणावर संतसाहित्य हाच उपाय’ आणि ‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ हे २ परिसंवाद राजकीय अंगाने आहेत. यामध्ये मात्र एकही राजकीय नेता आणि वक्ते यांचा सहभाग नाही. या संमेलनात ‘राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय’ हा परिसंवाद, प्रकट मुलाखतीमध्ये ‘अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ?’, ‘आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का ?’, अशा विषयांवर चर्चा आणि ‘साने गुरुजी’ या विषयावर परिसंवाद, असे विविध चांगले विषयही संमेलनात होणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • साहित्य संमेलनाचा उद्देश साध्य होण्यासाठी कुणाला बोलवायला हवे, हेही न कळणारे आयोजक !
  • मराठी साहित्य संमेलनात राजकारण्यांचा भरणा कशासाठी ? अधिकाधिक साहित्यिकांचा समावेश केल्यासच संमेलनाला दिशा मिळेल, हे आयोजकांनी लक्षात घ्यावे !