प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन
१. धर्म आणि विद्वान यांच्यातील साहचर्य !
‘धर्म’ हा विज्ञान किंवा आजचे आधुनिक शास्त्र यांचा वैरी नाही. शास्त्र ज्या समस्या निर्माण करते, जे जंजाळ निर्मिते, त्याची पूर्तता ‘धर्म’ करतो. ‘धर्म’ हा विज्ञान किंवा आधुनिक शास्त्रांचा पूरक आहे. ‘धर्म’ विज्ञानाच्या टप्प्यापलीकडील गोष्टींचे विवेचन करतो; म्हणून विज्ञानाने धर्मसिद्धांतांना साहाय्य केले पाहिजे. धर्मानेही थेट विज्ञानाचे साहचर्य (संगत) राखावे. हिंदु धर्मातच हे साहचार्य राखले गेले आहे.
२. आजचे भोगोन्मुख म्हणूनच विध्वंसक शिक्षण !
वैदिक संस्कृतीचा पुसटसा गंधही नसलेले, श्रद्धाभक्ती यांना थारा न देणारे, भोगोन्मुख करणारे हे आजचे शिक्षण ! म्हणे प्रकृतीपासून (matter) सृष्टी होते. देवाचे अस्तित्व नाकारून भौतिकवादाला (materialism) देवाचे अस्तित्व बहाल करणारे हे शिक्षण ! भारतीय युवक लैंगिक आणि विध्वंसक (Sexual and Destructive) न झाले तरच नवल !
३. धर्माचे नियंत्रण बुद्धीमंत, चारित्र्यसंपन्न आणि गुणवान माणसांच्या हाती हवे !
वास्तविक समाजाची स्थित्यंतरे तरुण पिढीच घडवून आणते. म्हातारी माणसे बहुदा निष्ठाहीन आणि ढोंगी असतात. इकडचा डोंगर तिकडे करण्याची त्या युवकांची जिद्द ! ती पिढीच या इंग्रजी छापाच्या शिक्षकाने भोगोन्मुख, उल्लू झालेली आहे. धर्माचे नियंत्रण बुद्धीमंत, चारित्र्यसंपन्न आणि गुणवान माणसांच्या हाती हवे. प्रतिभा, चारित्र्य आणि सद्गुण (Men of talent, character and virtue) या गुणयुक्त शासकाने प्रजेकडून धर्माचरण करवून घ्यायचे आहे. असे गुणसमृद्ध शास्त्रनिष्ठेचे शासक दूरवरचा परिणाम पाहू शकतात. ते तात्कालिक परिणामांच्या आहारी जात नाहीत. क्षणाक्षणाने आम्हाला त्या प्रभुकृपेची प्रचीती येते; पण जडवादी चंगळवादी आधुनिक हे देव मानायलाच सिद्ध नाहीत. देव मानला की, सैतानी करणी इत्यादी काही करता येत नाही ना म्हणून !
४. पशू आणि मानव यांची तुलना !
आधुनिक मानव पशू झाला आहे. छे ! पशूपेक्षाही अधम ! एक साधारण पशूसुद्धा घ्राणेंद्रियांद्वारे भक्ष्य आणि अभक्ष्य यांत भेद करतो. लक्षावधी प्रयत्न करा, तो अभक्ष्याकडे वळायचाच नाही आणि मानव ! हित-अहित यांचा निर्णय घेण्यात तो पशूपेक्षाही अविवेकी, वासनाग्रस्त हीन, दीन आणि अधम झाला आहे.
५. तर्कशुद्ध युक्तीवादाची आवश्यकता
एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे गुरुदेव वाणी आणि लेखणी वापरतात. शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही बाजूंनी ते शत्रूवर तुटून पडतात. प्रतिपक्षाची दर्शने, तत्त्वज्ञान, त्या प्रणाली यांचे ते तुकडे तुकडे उडवतात. तर्कशुद्ध युक्तीवादाने आपले ‘दर्शन’ असे मंडित करतात की, बोलणार्याचे तोंडच बंद व्हावे.
त्यांची वाणी ऐकायला मी आतुर होतो; म्हणून एकदम मुद्यालाच मी हात घातला.
६. धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय !
मानवी जीवन आणि जन्म धर्माकरता आहे. धर्म मानवाच्या अभिरूचीप्रमाणे हवा तसा वाकवता यायचा नाही. तेथे तडजोड (Compromise) नाही. सवलत नाही (No concessions). आमची भारतीय धारणाच मुळात ती आहे. धर्माकरताच भगवंताने आम्हाला भूतलावर पाठवले आहे. धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय (Life mission.) आहे. अदृश्य सूक्ष्म सृष्टी आहे. ती या दृश्य सृष्टीहून वेगळी आहे. या सृष्टीचा नियामक नियंत्रक (controller) आहे. दोन्ही सृष्टीत संभाषण (communication) आहे. दळणवळण आहे. या दोन्ही सृष्टींवर मानवी जीवन आणि विकास अवलंबून आहे. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ (चर्पटपञ्जरिकास्तोत्र, श्लोक २१) म्हणजे ‘पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू’ हे चक्र फिरते आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत अटळ अपरिहार्य आहे.
७. धर्मस्थापना ही नीतीस्थापनाच आहे !
‘मंत्रशास्त्र’ आणि ‘योगशास्त्र’ ही दोन्ही सृष्टीशी संपर्क साधणारी शास्त्रे आहेत. निसर्गाचे नियम मानव निर्माण करत नाही. त्याला नियमांचा साक्षात्कार करून घेऊन व्यष्टी-समष्टीच्या कल्याणाकरता त्याचा उपयोग करून घेतो. धर्म आणि नीती वेगळी नाही. धर्मस्थापना ही नीतीस्थापनाच आहे. ‘धर्मासीं नीतीशीं । शेंज भरीं ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ५३) याचा अर्थ ‘धर्म हीच नीती आहे.’ धर्मस्थापना हीच नीतीस्थापना आहे. ‘स्वाध्यायोऽध्येतव्य:।’ (शतपथब्राह्मण, काण्ड ११, अध्याय ५, ब्राह्मण ६, खण्ड ३), म्हणजे ‘वेदांचे अध्ययन केले पाहिजे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)
संपादकीय भूमिकाधर्माचे नियंत्रण भ्रष्टांच्या नव्हे, तर चारित्र्यसंपन्न आणि गुणवान माणसांच्या हाती हवे ! |