‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’कडून राज्यातील ३५० गडांवर प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण !

सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन !

पिंपरी (जिल्हा पुणे ) – ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील ३५० गडांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. या उपक्रमात सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त महाराष्ट्रात ‘शिवराज्याभिषेक वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. राज्यातील काही प्रमुख गिर्यारोहण संस्थांनी या ३५० गडांचे दायित्व वाटून घेतले असून प्रत्येक गडासाठी एक समन्वयक नेमण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पालघर, रायगड, नगर या सर्व जिल्ह्यांतून १०० हून अधिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्यासाठी अधिकाधिक शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’चे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी केले आहे.