भारतीय नौदलाचे नौकेवर लक्ष !
नवी देहली – हेरगिरी करणारी चिनी नौका ‘जियांग यांग हाँग ०३’ इंडोनेशियाच्या जवळील हिंदी महासागरात दाखल झाली आणि आता ती मालदीवच्या दिशेने निघाली आहे. ती मालदीवला जात आहे; कारण श्रीलंकेने तिला तिच्या कोणत्याही बंदरावर थांबू दिले नाही. ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मालदीवची राजधानी माले बंदरात पोचू शकते, अशी माहिती भारतीय नौदलाच्या एका अधिकार्याने दिली आहे. चीनच्या या नौकेवर भारतीय नौदल लक्ष ठेवून आहे.
चीनची ही नौका यापूर्वी वर्ष २०१९ आणि वर्ष २०२० मध्ये माले बंदरावर काही दिवस थांबली होती. तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनने ही नौका भारताच्या मुख्य नौदल तळ आणि अणू प्रकल्प यांची हेरगिरी करण्यासाठी पाठवली आहे. ही नौका अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. याद्वारे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेले भारतीय नौदल तळ या नौकेच्या हेरगिरीच्या कक्षेत येतात. ओडिशातील चांदीपूरमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्राचीही हेरगिरी केली जाऊ शकते. चीनकडे अनेक हेरगिरी नौका आहेत. ती संपूर्ण प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागरांत कार्य करण्यास सक्षम आहेत. त्या नौका सर्व माहिती बीजिंगमधील केंद्राला पाठवतात. भारत किंवा इतर कोणताही देश क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत असतांना या नौका त्यांच्या हालचाल चालू करतात.