मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

५५० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा कृतीशील संकल्प !

अमरावती, २३ जानेवारी (वार्ता.) : महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री देवस्थान सेवा समिती विदर्भ, श्री पिंगळादेवी संस्थान, श्री नागेश्वर महादेव संस्थान, श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महेशभवन, अमरावती येथे आयोजित ‘महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशना’ला (अमरावती-विदर्भ प्रांत) ५५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ झाला.

दीप्रज्वलन करतांना डावीकडून पू. अशोक पात्रीकर, पिठाधिश्वर १००८ श्री शक्तीजी महाराज, उपाध्य आम्नाय महंत आचार्य श्री यक्षदेवबाबा शास्त्री, श्री. सुनील घनवट, अधिवक्ता श्री. सुरेश कौदरे, अधिवक्ता श्री. आर्.बी. अटल

श्री महाकाली शक्तीपीठाचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज, सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, तसेच मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, रिद्धपूर येथील यक्ष देव मठाचे अध्यक्ष उपाध्याय आम्नाय महंत आचार्य श्री यक्षदेव बाबा शास्त्री, श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थानचे सचिव अधिवक्ता श्री. सुरेश कौदरे, व्यंकटेश बालाजी ट्रस्टचे सचिव अधिवक्ता आर्.बी. अटल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनास प्रारंभ झाला. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा श्री. सुनील घनवट यांनी मांडला.

मंदिरांमधून मिळणारे धर्मशिक्षण बंद झाल्याने हिंदूंची अवस्था बिकट ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. देवळात गेल्यावर काय करायला पाहिजे ? देवाकडे काय मागावे ? दर्शन कसे घ्यावे ? देवाला काय अर्पण करावे ? हे ठाऊक नाही. सनातन संस्थेच्या माध्यमातून वर्ष २००५ मध्ये मंदिरांविषयी धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला. समितीच्या माध्यमातून भारतभरामध्ये ५२७ धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !

पुरातत्व आणि वन विभाग यांच्याशी समन्वय ठेवून मंदिरांच्या अडचणी सोडवणे आवश्यक ! – अधिवक्ता सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर ज्योतीर्लिंग देवस्थान

अनेक मंदिरांना पुरातत्व खात्याकडून तसेच वन विभागाकडून मंदिर विश्वस्तांच्या पाठपुराव्या अभावी आणि कायदेशीर अडचणी वेळोवेळी न सोडवल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आम्ही भिमाशंकर देवस्थानसाठी पाठपुरावा करून अडचणी सोडवल्या.

प्रामाणिकपणे कार्य केल्यास देव कधीच न्यून पडू देणार नाही ! – डिगंबर महाले, अध्यक्ष, मंगळग्रह मंदिर, अमळनेर

‘मंदिरांतील पैसा अत्यंत पवित्र असतो. या पवित्र पैशाला धक्का लावल्यास त्याला आणि त्याच्या पिढ्यांना ते पापकर्म भोगावे लागते. तुम्ही प्रामाणिकपणे कार्य केल्यास देव तुम्हाला कधीच न्यून पडू देणार नाही’, असेही ते म्हणाले.

संघटित प्रयत्नांतून कूळ कायद्यात अडकलेल्या मंदिरांच्या भूमी परत मिळवून देण्यात यश ! – अधिवक्ता अनुप जयस्वाल, पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पुरातन मंदिरांना वेळोवेळी दानशूर व्यक्तींनी भूमी दान दिल्या होत्या; मात्र कुळ कायदा अस्तित्वात आला. या भूमी कायद्यात अडकल्या, अनेक मंदिरांचे उत्पन्न बंद झाले. वर्ष २०१३ मध्ये ‘देवस्थान सेवा समिती विदर्भ’ याची स्थापना केली. त्या माध्यमातून मंदिरांच्या समस्या सोडवण्यास प्रारंभ झाला. अनेक मंदिरांना त्यांच्या भूमी परत मिळवून देण्यात ईश्वरकृपेने यश मिळाले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करू.

मंदिरे सरकारमुक्त होऊन भक्तांच्या कह्यात येईपर्यंत लढा शेवटपर्यंत चालू राहणार ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

एखाद्या मंदिराची समस्या निर्माण झाल्यानंतर ते एकच मंदिर याआधी लढायचे. अन्य मंदिरे त्यात सहभागी होत नव्हती; परंतु वर्ष २०१७ मध्ये मंदिरे, पुरोहित आणि पुजारी यांचे संघटन करण्याचा संकल्प करण्यात आला. वर्ष २०१३ पर्यंत २ सहस्र ५०० हून अधिक मंदिरे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून संघटित झाली आहेत. मंदिरे ही सनातन धर्मप्रचाराचे केंद्र असली पाहिजेत. एकही मंदिर सरकारच्या कह्यात न रहाता सरकारमुक्त होऊन भक्तांच्या कह्यात येईपर्यंत आपला हा लढा शेवटपर्यंत चालू राहील.


महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशन अमरावती (विदर्भ – प्रांत)

अधिवेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा


धर्मप्रचाराची केंद्रे बनवतांना त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक ! – अनिल अग्रवाल, संपादक, दैनिक ‘मंडल’, अमरावती

मंदिरे हिंदु धर्माच्या प्रचाराची केंद्रे बनवतांना त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मंदिराने आपले कार्य किमान वर्षातून एकदा पत्रकार परिषद घेऊन समाजासमोर पोचवावे. प्रत्येक मंदिराचा एक प्रवक्ता असावा. त्याने देवस्थानाचे सर्व कार्य विविध माध्यामांतून समाजासमोर मांडणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. मुंबई विद्यापिठात चालू करण्यात आलेल्या ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयावरील अभ्यासक्रमाचा लाभ घ्या !

पुरातत्व विभाग, वनविभाग यांच्‍याकडून येणार्‍या अडचणी अन् त्‍या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्‍थानचे सचिव अधिवक्ता श्री. सुरेश कौदरे यांनी मार्गदर्शन केले. समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम विशद केले.

लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडचे श्री. अशोक पावडे यांनी मंदिरात विविध उपक्रमांचे नियोजन कसे करावे, उदा. निर्माल्य, तसेच गोशाळेतील विविध गोधनापासून सुगंधी धूप, तसेच अन्य उत्पादने बनवून वाया जाणार्‍या वस्तूंचा योग्य विनियोग करून देवस्थानचे उत्पन्न कसे वाढवू शकतो, याविषयी माहिती दिली.

मंदिर आणि मूर्ती विषयक अभ्यासक श्री. वसंत सोनपराते यांनी मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती बसवतांना घ्यायची काळजी, मंदिर निर्माण करतांना होणार्‍या चुका कशा टाळाव्यात, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मंदिरांना प्रशासकीय आणि न्यायालयीन अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी मंदिरांनी योग्य ते ‘रेकॉर्ड किपिंग’ (नोंदी) ठेवणे आवश्यक आहे, याविषयी सविस्तर माहिती श्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. आर्.बी. अटल यांनी दिली.

अधिवेशनाला उपस्थित विश्वस्त आणि मान्यवर

उपस्थित मान्यवर

लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडचे श्री. अशोक पावडे, मंदिर आणि मूर्ती विषयक अभ्यासक श्री. वसंत सोनपराते, श्री नागेश्वर महादेव संस्थानचे श्री. कैलाश पनपालिया, पिंगळा देवी संस्थानचे श्री. आशिष मारूडकर आणि विनीत पाखो