Rajeev Dhavan : आपण हळूहळू हिंदु राष्ट्राच्या दिशेने जात आहोत ! – मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता राजीव धवन

श्रीरामजन्मभूमी प्रकरणात मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता राजीव धवन यांचे हिंदुद्वेषी विधान !

अधिवक्ता राजीव धवन

नवी देहली – श्रीरामजन्मभूमीच्या न्यायालयीन खटल्यात सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतर मुसलमान गट यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ता राजीव धवन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली. ते म्हणाले की, कुणीही मंदिराच्या विरोधात नाही; पण त्याच्या राजकीयीकरणाला आमचा विरोध आहे. आपण हळूहळू हिंदु राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

हे राज्यघटनेच्या विरुद्ध असून राजकीयीकरण विविधतेकडेच दुर्लक्ष करते ! – धवन

धवन पुढे म्हणाले की, हे आपल्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. आपण विविधता असणारा देश आहोत; पण या प्रकारचे राजकीयीकरण या विविधतेकडेच दुर्लक्ष करते. सरकारने मंदिराच्या कामात आर्थिक साहाय्य केले. नृपेंद्र मिश्रा हे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना श्रीराममंदिर बांधकामाचे प्रमुख बनवण्यात आले.

संपादकीय भूमिका

वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात काँग्रेसने राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसवला. हे राज्यघटनेच्या विरोधात होते. याचा विरोध धवन का करत नाहीत ?

‘जय श्रीराम’ या घोषणेचा शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप !

धवन पुढे म्हणाले की, ‘जय श्रीराम’ या घोषणेचा शस्त्र म्हणून वापर का केला जात आहे ? मी जेव्हा युक्तीवादासाठी न्यायालयात प्रवेश करायचो, तेव्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जायच्या. माझ्यावर न्यायालयात झालेल्या आक्रमणातून सुरक्षा कर्मचार्‍यांनी मला वाचवले. मला तेच पुन्हा उगाळायचे नाही. ‘जय श्रीराम’ म्हणण्यावर कुणाचा काहीच आक्षेप नाही; पण त्याचा शस्त्र म्हणून वापर का करायचा ? (‘जय श्रीराम’ या माध्यमातून हिंदू त्यांच्यातील स्वाभाविक धर्माभिमान व्यक्त करतात. ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणत जगभर हिंसाचार करणार्‍यांची बाजू मांडणार्‍या अधिवक्त्याने अशा प्रकारे हिंदूंवर आरोप करणे त्यांची वैचारिक पत काय आहे, हे दर्शवते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?
  • प्रभु श्रीरामांच्या कृपेने धवन यांचे बोल लवकरच सत्यात उतरतील !