‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.
१. ही श्री रामललाची मूर्ती खूपच अप्रतिम आणि देखणी झालेली आहे.
२. श्रीरामाचे बालरूप आपल्याला आकर्षित करून घेत असणे
श्री रामललाची मूर्ती आपल्याला तिच्याकडे लगेच आकर्षित करून घेते. ‘प्रभु श्रीरामाचे ते बालरूप असल्याने तसे होते’, असे लक्षात आले. मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांचा हा आविष्कार आहे. त्यांनी श्रीरामाचे बालरूप अगदी तंतोतंत घडवले आहे. श्रीराम ही देवता आहे आणि त्यातून बालरूप म्हणजे निरागस अन् निर्मळ असते. त्यामुळे ते आपल्याला आकर्षित करून घेते.
३. श्री रामललाच्या मुखाकडे बघून आनंद होणे, तर चरणांकडे पाहून शरणागतभाव जागृत होणे
श्री रामललाच्या मुखावर गोड हास्य आहे. त्यामुळे त्याच्या मुखाकडे बघून आपल्याला पुष्कळ आनंद होतो, तर त्याच्या चरणांकडे पाहून आपला शरणागतभाव जागृत होतो. हेही मूर्तीकाराचे वैशिष्ट्य आहे. श्री रामललाचे मुख पाहिले, तर त्याकडेच आपली दृष्टी खिळून रहाते, तसेच त्याच्या चरणांकडे पाहिले, तरीही आपली दृष्टी तेथे खिळून रहाते. इतका त्या दोन्हींमध्ये जिवंतपणा आणि देवत्व आले आहे. ‘हे मूर्तीकार श्री. योगीराज यांचा रामाप्रतीचा भाव आणि त्यांची साधना यांमुळे त्यांना साध्य झाले आहे’, असे जाणवले.
४. श्री रामललाची मूर्ती अगदी बांधेसूद आणि सुबक आहे.
५. प्राणप्रतिष्ठा झालेली नसतांनाही मूर्तीमध्ये रामतत्त्व २५ टक्के असल्याचे आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यावर ते ३५ टक्के झाल्याचे जाणवणे
२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी सकाळी तिच्यामध्ये रामतत्त्व २५ टक्के असल्याचे जाणवले. हे मूर्तीकाराचे कौशल्य, भाव, व्रताचरण इत्यादी गुणांमुळे घडले आहे. श्री रामललाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यावर तिच्यातील रामतत्त्व ३५ टक्के झाले.
६. मूर्तीमध्ये तारक स्पंदने ९० टक्के आणि मारक स्पंदने १० टक्के जाणवणे
श्रीरामाची मूर्ती बालरूपातील असल्याने तिच्यामध्ये तारक तत्त्व अधिक आहे.
७. मूर्तीकडे पाहिल्यावर मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवणे, तसेच सूर्यनाडी कार्यरत होणे
प्रभु श्रीराम हा सूर्यवंशी आहे. मणिपूरचक्र आणि सूर्यनाडी तेजतत्त्वाशी संबंधित आहेत. त्यामुळे श्री रामललाच्या मूर्तीकडे पाहून तेजतत्त्व जाणवले. मूर्तीकार श्री. योगीराज यांनी श्री रामललाच्या मूर्तीमध्ये ही सूक्ष्मातील स्पंदनेही आणली आहेत. यातून त्यांची योग्यता लक्षात येते.
८. मूर्तीकडे थोडे अधिक वेळ पाहिल्यावर प्रथम स्वत:चे मूलाधारचक्र जागृत होणे आणि त्यानंतर सहस्रारचक्र जागृत होणे
मूर्तीकडे २ – ३ मिनिटे पाहिल्यावर प्रथम माझे मूलाधारचक्र जागृत झाले आणि त्यानंतर सहस्रारचक्र जागृत झाले. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. त्यामुळे या मूर्तीमध्ये मूलाधारचक्र आणि सहस्रारचक्र जागृत करण्याचे सामर्थ्यही असल्याचे लक्षात आले. हा मूर्तीमधील देवत्वाचा परिणाम असल्याचे लक्षात येते. त्यामुळे मूर्तीकाराने प्रत्यक्ष देवत्व मूर्तीमध्ये आणले आहे, हे समजते.
९. मूर्तीमधील विविध स्पंदनांचे प्रमाण
वरील सारणीवरून श्री रामललाच्या मूर्तीमध्ये आनंदाची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात आहेत, हे लक्षात येते आणि मूर्तीकडे पाहून तसे जाणवतेही.
१०. विश्वभर रामराज्य आणणारी मूर्ती !
‘प्रभु श्रीरामाची मूर्ती प्रतिस्थापित झाल्यामुळे विश्वभरात रामराज्य येण्याच्या प्रक्रियेला आरंभ होईल’, असे वाटले. प्रभु श्रीराम देहशुद्धी आणि वातावरणशुद्धी यांचे कार्य एकाच वेळी आरंभ करील. देहशुद्धी म्हणजे सध्या मनुष्यामध्ये अनीती, अधर्माचरण, दुराचरण, स्वार्थ अशा रज-तमात्मक प्रवृत्ती वाढल्या आहेत, त्यांचा नाश करणे. आधी देहशुद्धीचे कार्य पूर्ण होईल आणि मग वातावरणशुद्धी पूर्ण होईल. अशा प्रकारे शुद्धीकरणाचे कार्य पूर्ण झाल्यावर सत्त्वगुणी रामराज्याला आरंभ होईल !
श्रीरामललाच्या मूर्तीच्या दर्शनामुळे हे सर्व शिकायला मिळाले. यासाठी प्रभु श्रीराम आणि मला प्रेरणा देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१.२०२४)
|
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |