‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता. हिंदुस्थानचे हे वैभव पाशवी वृत्तीच्या इस्लामी आणि ख्रिस्ती परकीय आक्रमकांना सहन झाले नाही. त्यांनी हिंदुस्थानवर असंख्य स्वार्या करून आर्थिक लूट केली. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घातले. हिंदुस्थानमधील विविध मंदिरांचे अवशेष आजही परकीय आक्रमकांच्या पाशवी वृत्तीची साक्ष देत आहेत. हिंदुस्थान गरीब, मागास, रानटी, असंस्कृत देश असल्याचे परकीय आक्रमकांनी त्यांच्या पुस्तकांत नोंदवले आणि हिंदुस्थानला कलंकित करण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला. आजही हा प्रयत्न वैश्विक पातळीवर विसावलेला नाही. इस्लामी आक्रमकांनी वायव्य भागाकडून हिंदुस्थानवर अनंत स्वार्या केल्या. बाबर हा त्यापैकी एक होय. त्याने प्रभु श्रीरामाच्या जन्मभूमीवर आक्रमण करून त्यांचे मंदिर भुईसपाट केले. या मागचा त्याचा प्रमुख हेतू हिंदुस्थानाची श्रद्धास्थाने नष्ट करणे, हा होता. श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, तसेच श्रीराम हे राजे होते. ‘हिंदूंना प्रेरणा देणारे श्रीराम नष्ट केल्याविना हिंदुस्थानवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही’, हे ओळखूनच बाबराने श्रीरामाचे मंदिर उद्ध्वस्त करून तिथे त्याच्या धर्माची साक्ष देणारी मशीद उभी केली. बाबराचे हे कृत्य आपण नेमकेपणाने जाणून घेतले पाहिजे.
प्रभु श्रीरामाचे वैशिष्ट्यश्रीराम उत्तम रणनीती तज्ञ होते. अपराजित योद्धा म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांची रणनीती अनाकलनीय आहे. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येत नाही. युद्ध करण्यापूर्वी शत्रूचे एकदाच मानसिक परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे शत्रूला सुधारण्याची एकदाच संधी दिली. शत्रूला सभ्यतेची सामोपचाराची भाषा जेव्हा कळत नाही, तेव्हा शस्त्राच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नसतो,हे श्रीरामचंद्रांनी आपल्या कृतीने सांगितले आहे. |
१. शत्रूचा प्रतिशोध घेऊन राष्ट्रभक्ती प्रकट करणे, हा अपराध नव्हे !
रामजन्मभूमीवर मशीद उभी करून बाबर आपल्या देशी निघून गेला. शत्रूच्या भूमीवर शत्रूची श्रद्धास्थाने नष्ट करून त्या ठिकाणी स्वतःच्या श्रद्धास्थानाचे स्मारक उभे करण्यात तो यशस्वी झाला. बाबराने रामजन्मभूमीवर उभी केलेली मशीद, म्हणजे बाबराचे ‘विजयाचे स्मारक’ आहे. बाबर हिंदूंचा शत्रू असल्यामुळे ते शत्रूच्या विजयाचे स्मारक हिंदूंच्या लेखी पराभवाचे स्मारक ठरते. अशी पराभवाची स्मारके राष्ट्र आणि संस्कृती यांचा अभिमान जोपासण्यासाठी त्या राष्ट्राभिमानी जनतेने भुईसपाट करायची असतात अन् तसे करणे, हे प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राच्या नागरिकाचे कर्तव्य आहे. हिंदुस्थानच्या नागरिकांनी बाबराचे विजयाचे स्मारक नष्ट करून राष्ट्रीय पराक्रम गाजवला आहे. शत्रूचा प्रतिशोध घेण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःचे श्रद्धास्थान अत्यंत आदराने पुनश्च निर्माण करणे, हे हिंदूंच्या स्वाभिमानाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारे राष्ट्रभक्ती प्रकट करणे, हा अपराध ठरत नाही.
पुरातत्व खात्याने उत्खनन करून हिंदु मंदिराचे ऐतिहासिक पुरावे सादर केले. बाबराने ज्या ठिकाणी मशीद उभी केली त्याखाली अवशेष सापडले. यातून सिद्ध होणारी गोष्ट, म्हणजे मशीद ही अवैध आहे. असे अवैध बांधकाम नष्ट करून न्याय प्रस्थापित केला, तर कुणालाही तो अन्याय वाटता कामा नये. एवढा प्रामाणिकपणा स्वतःला सुसंस्कृत म्हणणार्या लोकांनी दाखवणे अपेक्षित आहे.
२. आदर्श राज्यकर्ते प्रभु श्रीराम !
प्रभु श्रीराम हे राज्यकर्ते आहेत. राज्यकारभार कसा करावा ? याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यांच्या गुणांचे वर्णन करतांना महर्षि वाल्मीकि यांची लेखणीही थकून गेली. ‘आदर्श राम’, ‘पुरुषोत्तम राम’ ही रामांसाठी योजलेली विशेषणे सुद्धा तोकडी पडतात. न्याय, नीती आणि सत्य या मार्गांनी वाटचाल करून ‘आदर्श राज्यकर्ता’ म्हणून प्रभु श्रीरामाचा लौकिक आहे. ‘वाल्मीकि रामायण’ हा एक अद्भुत ग्रंथ आहे. जेव्हा जेव्हा अधःपतनाची वेळ आली, तेव्हा तेव्हा द्रष्ट्यांनी राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी रामायणाचा उपयोग करून घेतला. यवनी सत्तेच्या मगरमिठीत सापडलेल्या महाराष्ट्राचे अध:पतन होऊ लागले, त्या वेळी संत एकनाथ महाराजांनी वाल्मीकि रामायणाचा आधार घेऊन पुनरुत्थानासाठी भावार्थ रामायण लिहिले.
३. आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण म्हणजे रामराज्य !
राजकीय सत्तेसाठी सख्खी भावंडे परस्परांच्या जिवावर उठतात. रामायणातील भाऊ ‘आदर्श’ आहेत. त्यांचा परस्परांविषयीचा निरपेक्ष भाव, स्नेह, आपुलकी, आपलेपणा, त्यांना परस्परांचा वाटणारा जिव्हाळा हे त्यांच्या वर्तनातून सहजतेने आढळून येते. प्रभु श्रीरामांचा राज्याभिषेक होणार होता; पण त्याऐवजी त्यांना १४ वर्षे वनवासात पाठवण्यात आले. त्यांनी राजवस्त्रे सहज त्यागून यतीवेश (संन्यासी वस्त्रे) धारण केला आणि वनवासात निघून गेले. भरताला अयोध्येचे राज्य सहजतेने देण्यासाठी श्रीराम सिद्ध झाले. त्यांनी वनवासाचा मार्ग आनंदाने स्वीकारला. तथापि भरताने श्रीरामांच्या अधिकारावर स्वतःचा हक्क आणि अधिकार न सांगता त्यांच्या पादुका अयोध्येच्या राजसिंहासनावर स्थापन केल्या. यानंतर ‘प्रभु श्रीरामाचा प्रतिनिधी’ म्हणून अयोध्येचा राज्यकारभार १४ वर्षे संन्यस्त वृत्तीने केला. वनवासातून परत आल्यानंतर भरत श्रीरामाला राज्य पुन्हा सुपुर्द करून मोकळा झाला. असे उदाहरण आपल्याला जगाच्या इतिहासात अन्यत्र आढळत नाही. वाल्मीकि रामायण, म्हणजे हिंदुस्थानचा ‘कौस्तुभमणी’ आहे. त्याचे तेज पाहून राष्ट्रीय पुनरुत्थान व्हावे; म्हणून रशियन भाषेतही त्याचे भाषांतर करण्यात आले आहे. श्रीरामाचे राज्य याचा अर्थ न्यायाने आणि नीतीने चालवले जाणारे राज्य. ‘राष्ट्रीय कर्तव्य बजावतांना व्यक्तीगत स्वार्थ बाजूला सारण्याचे संस्कार प्राणापलीकडे जतन केले जातात’, असे राज्य होय. राज्यातील प्रत्येक नागरिक राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि कर्तव्य यांची निष्ठा जतन करून सन्मानाने स्वतः जगतो अन् इतरांनाही सन्मानाची वागणूक देतो असा आदर्श समाज म्हणजे रामराज्य ! ‘मानवी समाजात ज्या वेळी नैतिकतेचा सूर्य उगवून विकृतीचा अंधार नाहीसा होतो आणि संस्कृतीचा प्रकाश पडतो, त्या वेळी रामराज्य भूतलावर अवतीर्ण होते’, असे जाणकार सांगतात.
४. न्यायमूर्ती रानडे यांनी रामराज्याविषयी केलेले भाष्य
प्रभु श्रीरामाचे राज्य कसे होते ? याविषयीची माहिती आपल्याला रामायणाच्या युद्धकांडातील १२८ व्या सर्गात वाचायला मिळते. रामराज्याविषयी न्यायमूर्ती राम केशव रानडे यांनी केलेले भाष्य येथे उद्धृत करणे नितांत आवश्यक आहे. ‘रामराज्य याचा अर्थ शासक सदाचारी आहेत आणि लोक त्यांचे अनुकरण करत आहेत. अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार हा शासनात सदाचार मानला जातो, तेव्हा तसे राज्य कदापि रामराज्य होणार नाही. आपण राममय होणे म्हणजे सदाचारी, नीतीमान होणे, भ्रांत आणि श्रांत समाजाला दिलासा देणारी पथ्यकारक, पुष्टीकारक मात्रा जर कोणती असेल, तर ती राममात्रा आहे. आज माणूस स्वस्त झाला आहे आणि माणुसकी महाग झाली आहे. वसंत ऋतू आल्यावर झाडाझुडपांवर सृष्टीदेवीच्या सौंदर्याचे भांडार उघडते, त्याप्रमाणे रामराज्य चालू झाल्यानंतर संपूर्ण राज्याला मनोवेधक सौंदर्य प्राप्त होते. हे सौंदर्य पाहून आपल्याला आनंद आणि परमानंद होतो.’
५. प्रभु श्रीरामाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथात केलेला गौरव
श्रीरामाने रावणाचा पराभव करून स्वतःचा दरारा निर्माण केला. त्यांनी आपला अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडल्यानंतर कोणत्याही राजाने तो अडवण्याचा प्रयत्न केला नाही. श्रीराम केवळ पराक्रमी शूर राजे नव्हते, तर ते दानवीर आणि मानवतेची मूर्ती होते. खर्या अर्थाने ‘जगमित्र राजा’ म्हणून श्रीरामांचा लौकिक होता; म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथात श्रीरामाचा गौरव करतांना लिहिले….
‘अयोध्येच्या महाप्रतापी राजा रामचंद्राने जेव्हा लंकेत स्वतःचे विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एक छत्री सत्तेखाली आणली, त्याच दिवशी स्वराष्ट्र, स्वदेश निर्मितीचे जे महान कार्य सिंधूंनी अंगीकृत केले होते, त्या कार्याची परिपूर्ती झाली. भौगोलिक मर्यादेच्या दृष्टीने त्यांनी अंतिम सीमा हस्तगत केली. ज्या दिवशी अश्वमेधाचा विजयी घोडा कुठेही प्रतिरोध न होता अजिंक्य असाच अयोध्येला परत आला, त्या दिवशी त्या अप्रमेय अशा प्रभु रामचंद्रांच्या त्या ‘लोकाभिराम रामभद्रा’च्या साम्राज्य सिंहासनावर सम्राटाच्या चक्रवर्तीत्वाचे निदर्शक असे भव्य श्वेत छत्र धरले गेले. ज्या दिवशी आर्य म्हणणार्या नृपश्रेष्ठांनीच नव्हे, तर भक्तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनीही त्या सिंहासनाला स्वतःची भक्तीपूर्वक राजनिष्ठा सादर केली, तोच दिवस आपल्या खर्याखुर्या हिंदु राष्ट्राचा आणि हिंदु जातीचा जन्मदिवस ठरला. तोच खरा आपला राष्ट्रीय दिन ! याचे कारण आर्य आणि अनार्य यांनी एकमेकांत पूर्णपणे मिसळून एका नवीन अशा संघटित राष्ट्राला त्या दिवशी जन्म दिला. या दिवशी पूर्वीच्या सर्व पिढ्यांचे प्रयत्न फळाला येऊन त्यावर राजकीयदृष्ट्या यशाचा कळसच चढवला. त्यानंतरच्या सर्व पिढ्या ज्याकरता बुद्धीपुरस्सर किंवा अबुद्धीपुरस्सर झुंजल्या आणि झुंजता झुंजता प्रसंगी पडल्या, त्या समान ध्येय, ध्वज अन् समान कार्य यांचा वारसा तेव्हापासून हिंदु जातीकडे परंपरेने चालत आला.’ (संदर्भ : ‘हिंदुत्व’, लेखक : स्वातंत्र्यवीर सावरकर)
म्हणून सावरकर म्हणतात, ‘हिंदू ज्या दिवशी श्रीरामांना विसरतील, त्या दिवशी हिंदूंना ‘राम’ म्हणावे लागेल.’ याचा अर्थ श्रीरामांविना हिंदु समाजाचा उत्कर्ष होणे शक्य नाही. श्रीराम हिंदु समाजाचा प्रेरणास्रोत आहे. आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांपर्यंत सर्वांचेच प्रेरणास्थान प्रभु रामचंद्र आहेत.
६. प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारले जाणे, ही त्याचीच कृपा !
परकीय आक्रमकांनी प्रभु श्रीरामाला त्यांच्याच जन्मभूमीतून घालवून देण्याचा घाट घातला; पण हिंदुस्थानच्या जनतेने न्यायालयात दाद मागून न्याय संपादन केला. श्रीरामाच्या मंदिराचे दाखले पुरातत्व विभागाने सादर केले. ५ शतकांपेक्षाही अधिक काळ सातत्याने दिलेल्या लढ्याचा विजय झाला. त्यामुळे आपण श्रीरामाच्या जन्मभूमीवर त्यांचे मंदिर दिमाखात उभारू शकलो. सोमवार, पौष शुक्ल द्वादशी शके १९४५ (२२ जानेवारी २०२४) या दिवशी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून स्वतःचा आत्मसन्मान आपण परत प्राप्त केला, तसेच आपल्या पहिल्या हिंदु सम्राटाचा सन्मान करण्याचे महान कार्य आपल्या हातून श्रीरामांच्या कृपेनेच घडले. म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम करून त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव आणि श्रद्धाभाव व्यक्त करूया.
जय श्रीराम !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.