‘२२.१.२०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजता अभिजित मुहूर्तावर अयोध्या येथे श्री रामललाचा (बालक-रूपातील श्रीरामाच्या मूर्तीचा) प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. भारतातील, तसेच विश्वभरातील हिंदूंसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असेल. २२.१.२०२४ या दिवशी दुपारी १२.३० वाजता आकाशात असणार्या ग्रहस्थितीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. पूर्वक्षितिजावर मेष रास उदित असल्याने भाविकांना तेज आणि चैतन्य यांचा लाभ होणे
श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी अयोध्येच्या पूर्वक्षितिजावर (टीप) मेष रास उदित (उगवलेली) असणार आहे. मेष रास ही पूर्व दिशेची, अग्नितत्त्वाची, क्षत्रिय वर्णाची आणि रजोगुणी रास आहे. ही रास राजा, स्वामी, अधिपती आदींशी संबंधित आहे. प्रभु श्रीराम हे आदर्श राजा आणि प्रजापालक असल्याने प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी पूर्वक्षितिजावर (टीप) मेष रास उदित असणे, हे शुभ आहे. त्यामुळे श्रीरामकृपेने भाविकांना तेज आणि चैतन्य यांचा लाभ होईल.
टीप – पृथ्वीवरून पहातांना जिथे आकाश भूमीला टेकल्याचा भास होतो, त्या काल्पनिक रेषेला ‘क्षितिज’ म्हणतात.
२. गुरु ग्रहामुळे रामराज्यासाठी कार्य करणार्यांना धर्मतेजाचा लाभ होणे
श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी गुरु ग्रहसुद्धा पूर्वक्षितिजावर उदित असेल. गुरु ग्रह सत्त्वगुणी असल्यामुळे धर्मतेज दर्शवतो. त्यामुळे रामराज्यासाठी कार्य करणार्यांना धर्मतेजाचा लाभ होईल; म्हणजे त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य वाढेल. श्रीराममंदिराच्या स्थापनेमुळे हिंदूंमध्ये नवचेतना जागृत होऊन त्यांच्यातील धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान वृद्धींगत होतील.
३. सूर्यामुळे रामराज्यासाठी कार्य करणार्यांना क्षात्रतेजाचा लाभ होणार असणे
श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठापना ‘अभिजित’ मुहूर्तावर होणार आहे. दुपारी सूर्य डोक्याच्या अगदी वर असतांना सुमारे ४८ मिनिटांचा अभिजित मुहूर्त असतो. सूर्य हा ग्रहमालेचा स्वामी आहे. सूर्य सत्त्व-रजोगुणी असल्यामुळे क्षात्रतेज देतो. श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठापना माध्यान्हकाळी अभिजित मुहूर्तावर होणार असल्यामुळे रामराज्यासाठी कार्य करणार्यांना क्षात्रतेजाचा लाभ होईल; म्हणजे त्यांच्यात धैर्य, शौर्य आणि बळ यांची वृद्धी होईल.
४. भारताची रामराज्याकडे गतीने वाटचाल होणे
श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी गुरु आणि मंगळ या ग्रहांचा ‘नवपंचमयोग’ (शुभयोग) असणार आहे. गुरु आणि मंगळ यांचा शुभयोग कोणत्याही कार्याला भव्य आणि मूर्त रूप देतो. श्रीराममंदिराची स्थापना हे रामराज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही दृष्टीकोनांतून श्रीराममंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे भारताची रामराज्याकडे म्हणजे सुराज्याकडे गतीने वाटचाल होईल.
५. ‘श्रीराममंदिराची पुनर्स्थापना होणे’, हे ईश्वरी नियोजन होय !
श्रीराममंदिर हे चैतन्याचे स्रोत आहे; परंतु इस्लामी आक्रमकांनी राममंदिराचा विध्वंस केल्यामुळे हिंदु समाज सुमारे ५०० वर्षे या चैतन्यापासून वंचित राहिला; मात्र आता काळ पालटत आहे. हा परिवर्तनाचा काळ आहे. हा काळ भारताला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्याचा काळ आहे. त्यामुळे आता ‘श्रीराममंदिराची पुनर्स्थापना होणे’, हे ईश्वरी नियोजन होय !’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.१.२०२४)