नागपूर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाच्या सेवांचा श्री गणेशाच्या चरणी निमंत्रण पत्रिका अर्पण करून शुभारंभ !

श्री गणेशाच्या चरणी निमंत्रण पत्रिका अर्पण करतांना

नागपूर, १९ जानेवारी (वार्ता.) – ४ फेब्रुवारी या दिवशी येथील रामनगरमधील श्रीराम सभागृह येथे होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ची निमंत्रण पत्रिका श्री गणेश मंदिर टेकडी येथील श्री गणेशाच्या चरणी अर्पण करून अधिवेशनाच्या सेवांचा शुभारंभ १८ जानेवारी या दिवशी करण्यात आला.

श्री गणेश मंदिर टेकडी; श्रीराम मंदिर रामनगर; संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी; श्री गुरु बृहस्पति मंदिर; महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये सहभागी होणारे सहआयोजक, मंदिरांचे विश्वस्त या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाच्या सेवांचा शुभारंभ करतांना उपस्थित मंदिरांचे विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ

अधिवेशनाच्या संदर्भात समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी माहिती दिली, तसेच पुढील नियोजन सांगून आयोजक मंदिर देवस्थानांना सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अधिवेशन निर्विघ्नपणे व्हावे आणि रामराज्याची स्थापना व्हावी, यासाठी श्री गणेशचरणी प्रार्थना केली.

या वेळी श्री गणेश मंदिर टेकडीचे सचिव श्री. श्रीराम कुलकर्णी, विश्वस्त श्री. अरुण कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष श्री. शहाकार, पुरातन शिवमंदिर मानकापूरचे विश्वस्त अधिवक्ता श्री. ललित सगदेव, श्री सद्गुरु सिद्धरूढ शिव मंदिराचे विश्वस्त श्री. हेमंत जगदंबे आणि श्री. प्रकाश तपस्वी, चित्पावन ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. उमाकांत रानडे, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. पराते यांच्यासह सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या अधिवेशनात सहभागी होण्याची इच्छा असेल, त्यांनी नाव नोंदणीसाठी ९०११०८४४५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन या वेळी करण्यात आले.