रेल्वेमंत्र्यांनी केले स्विस रेल्वेचे कौतुक !
दावोस (स्वित्झर्लंड) – भारताचे रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव येथे ‘वर्ल्ड इकॉनोमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी शहरात पोचले आहेत. त्यांनी येथे एका मुलाखतीत सांगितले, ‘स्वित्झर्लंडच्या रेल्वे व्यवस्थेकडून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडच्या रेल्वे अधिकार्यांशी आणि धोरणे बनवणार्या अधिकार्यांशी चर्चा झाली आहे.’ यावरून भारतीय रेल्वे आणि स्वित्झर्लंड रेल्वे हे एकत्र काम करू शकतात, असे म्हटले जात आहे.
रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्विस रेल्वेकडे बोगदे बनवण्याचे तंत्रज्ञान उत्कृष्ट आहे. त्यांना या संदर्भात अनुभवही आहे. राजधानी झुरिचमध्ये रेल्वेच्या जाळ्याचे केंद्र आहे. येथून अनेक ठिकाणी रेल्वेगाड्या धावतात. याचा लाभ एखाद्याला दुसरी रेल्वेगाडी पकडायची असेल, तर सोपे जाते. अशा प्रकारची ६ केंद्रे या देशात आहेत. भारतात एकदा प्रवास चालू केला, तर थेट शेवटच्या स्थानकाप्रमाणे जाता येते; मात्र एखाद्याला मार्ग पालटण्यासाठी अन्य रेल्वेगाडी पकडायची असेल, तर कठीण जाते. या अनुषंगाने आम्ही एकत्र काम करण्यासाठी करार करण्याविषयी विचार करत आहोत. जेणेकरून भारतातही रेल्वेच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करता येतील.