पुणे येथे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये राडारोडा टाकणार्‍यांवर कारवाई !

७ वाहने जप्त; ६५ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

इंद्रायणी नदी

पिंपरी (पुणे) – पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये जलप्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. या नद्यांचे पाणी स्वच्छ करावे, प्रदूषण टाळावे याकरता अनेकजण उपोषणही करत आहेत. त्यात या नद्यांच्या पात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार शहरांमध्ये होतांना दिसून येतात. त्यामुळे नदीचे पात्रही रुंद होत आहे. राडारोडा टाकणारे ६ ट्रक आणि टेंपो महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने जप्त केले. त्यांच्याकडून ६५ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (केवळ दंड वसूल करून उपयोग नाही. राडारोडा टाकणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)

शहरांतून वहाणार्‍या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते. तेथे विनाअनुमती बांधकाम किंवा पत्राशेड बांधून ते भाड्याने देणे किंवा विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नदीकाठी राडारोडा टाकण्याचे प्रकार सर्वत्र वाढले आहेत. या लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांना निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ? – संपादक)