श्रीराममंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना !

श्रीरामललाचे प्रथम दर्शन !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहाच्या चौथर्‍यावर १८ जानेवारी या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. ४ तासांहून अधिक काळ पुरोहितांकडून मंत्रोच्चरात करण्यात आलेल्या पूजेद्वारे ही स्थापना करण्यात आली. या वेळी काही संत आणि मूर्तीकार अरुण योगीराज उपस्थित होते. या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे. गर्भगृहामध्ये कुणालाही भ्रमणभाष संच नेण्यास अनुमती देण्यात आली नव्हती. या विधीचे छायाचित्र किंवा चित्रीकरण प्रसारित करण्यात आलेले नाही. येत्या २२ जानेवारीला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून असे होत आहे अनुष्ठान !

श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष यजमान असणारे पंतप्रधान मोदी ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे त्यांनी स्वतःच घोषित केलेले आहे. हे अनुष्ठान नेमके कसे आहे, हे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी रात्री भूमीवर ब्लँकेट अंथरून झोपत आहेत. तसेच दिवसभरात केवळ नारळ पाणी पित आहेत. ते अष्टांग योगातील यम-नियमांचे पालन करत आहेत, असे सांगितले जात आहे.

यम आणि नियम

यम : अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (संग्रह न करणे).

नियम : शौच (शुद्धी), संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्‍वरप्रणिधान (ईश्‍वराला शरण जाणे)