उत्तरप्रदेशातील अयोध्येत राममंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण होत आले आहे. मंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतील राममंदिरात १०८ घंटा बसवण्यात येणार असून तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील ‘श्री अंदल मोल्डिंग वर्क्स’ला त्या घंटा बनवण्याची सूचना देण्यात आली होती. या मंदिरासाठी लागणार्या एकूण ४८ घंटा नमक्कलमध्ये गेल्या मासभरात बनवण्यात आल्या आहेत. या घंटांविषयी ‘श्री अंदल मोल्डिंग वर्क्स’चे श्री. के. राजेंद्रन् यांनी सांगितलेली माहिती येथे देत आहोत.
श्री. राजेंद्रन् हे बेंगळुरू (कर्नाटक) येथील व्यापारी असून त्यांच्या गेल्या ७ पिढ्या या मंदिरांसाठी घंटा बनवण्याचे काम करत आहेत. श्री. राजेंद्रन् यांनी केलेल्या घंटा संपूर्ण भारतभरासह मलेशिया, सिंगापूर आणि यु.के. यांसह अन्य देशांमध्येही पाठवल्या जातात.
घंटेमध्ये वापरण्यात आलेले धातू
श्री. के. राजेंद्रन् यांनी सांगितले, ‘‘आम्हाला ७० किलो वजनाच्या ५ घंटा, ६० किलो वजनाच्या ६ घंटा आणि २५ किलो वजनाची १ घंटा, अशा एकूण १२ घंटा आणि ३६ छोट्या घंटा बनवण्याची मागणी एका मासापूर्वी मिळाली. नोव्हेंबर २०२३ मध्ये आम्हाला घंटा बनवण्याविषयी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर आम्हाला वरील मागणी मिळाली. आतापर्यंत ज्या घंटा बनवण्यात आल्या, त्यासाठी २५ जणांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहेत. घंटा बनवण्यासाठी तांबे, चांदी आणि जस्त या धातूंचा वापर करण्यात आला आहे. या घंटांमध्ये आम्ही इरोम धातूचा वापर केला नाही. आमच्याकडे न्यूनतम वेळेत घंटा बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.’’
घंटा बनवून त्या वेळेत पाठवल्या जाणे, हे पुष्कळ आनंददायी !
श्रीराममंदिरासाठीच्या सर्व घंटा आम्ही नमक्कल जिल्ह्यात सर्वांत मोठे मंदिर असलेल्या श्री हनुमान मंदिरात बनवत आहोत. या घंटा बनवल्यानंतर त्या अंजनेयार मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर तेथून त्या घंटांची मिरवणूक काढून ट्रकद्वारे त्या बेंगळुरूमार्गे अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत. आम्हाला श्रीराममंदिरासाठी घंटा बनवण्यासाठी मिळणे आणि त्या वेळेत पाठवल्या जाणे, हे आमच्यासाठी पुष्कळ आनंद देणारे आहे’’, असेही श्री. के. राजेंद्रन् म्हणाले.