श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मुहूर्त यांविषयी आक्षेप अन् खंडणवाराणसी (उत्तरप्रदेश) येथील आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी मांडलेले गणित आणि त्यांचा अभ्यास ! |
‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम, मंदिराची शिखर स्थापना पूर्ण झालेली नाही, तरीही श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालकरूप) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे’, यांवर आक्षेप नोंदवले आहेत, अशी चर्चा चालू आहे.
अशी चर्चा घडवून कपोलकल्पित कथा रचण्यावरून हेही लक्षात आले की, एरव्ही ज्योतिष, मुहूर्त, हिंदु धर्म या सार्यांना विरोध करणारे पुरो(अधो)गामी या गोष्टींच्या आडून विरोध करत आहेत. त्या अनुषंगाने या प्रश्नांचे निरसन व्हावे; म्हणून आळंदी देवाची (जिल्हा पुणे) येथील श्री. बबन ल. मस्के यांनी एक पत्र काशी येथील आदरणीय विद्वान आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांना पाठवले. यावर शास्त्रीजींनी जे उत्तर दिले, ते आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
प्रश्न: मंदिर शिखराचे बांधकाम पूर्ण झाले नसतांना श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही शास्त्रसंमत आहे का ?
उत्तर : देवतांच्या मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा २ पद्धतींनी होते.
अ. संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर.
आ. मंदिरांच्या बांधकामाचा काही भाग पूर्ण होणे शेष असतांना.
मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तेव्हा मंदिरावरील कळसाची स्थापना संन्यास ग्रहण केलेल्या अधिकारी संन्याशाने करावी. गृहस्थाश्रमी व्यक्तीने तसे केल्यास वंशक्षय हे त्याचे फळ सांगितले आहे. जेव्हा मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नसेल, तेव्हा देवतांच्या प्राणप्रतिष्ठापना विधीनंतर एखाद्या शुभदिनी, उत्तम मुहूर्त असतांना कळसारोहण केले जाते.
वेदमूर्ती अण्णाशास्त्री वारे यांनी रचलेल्या ‘कर्मकाण्डप्रदीप’ या ग्रंथातील ‘सर्वदेवप्रतिष्ठाप्रयोग समाप्ती’नंतर ‘अथ कलशारोपणविधिः’पासून ‘इति प्रतिष्ठासारदीपिकोक्तः कलशरोपणविधिः’ असे स्वतंत्र प्रकरण आहे. ‘पाञ्चररात्रागम्’ ग्रंथातील ‘ईश्वरसंहिता’मधील श्लोकातही स्पष्ट दिले आहे की,
प्रासादाङ्गेषु विप्रेन्द्राः क्रमान्निगदितेषु च ।
देवताधारभूतेषु यद्यदङ्गं न कल्पितम् ।।
यत्र वा तत्तदधिकं तत्रापि च समाचरेत् ।
तत्तत्स्थाने तु बुद्धया तु देवतान्यासमूहतः ।। – ईश्वरसंहिता, अध्याय ३, श्लोक १६५ आणि १६६
‘बृहन्नारदीय पुराणा’तही म्हटले आहे की, ‘अकृत्वा वास्तुपूजां यः प्रविशेन्नवमंदिरम् । रोगात्नानाविधान्क्लेशानश्नुते सर्वसंकटम् ।।
अकपाटमनाच्छन्नमदत्तबलिभोजनम् । गृहं न प्रविशेदेवं विपदामाकरं हि तत् ।।’ (नारदपुराण, पूर्वखंड, अध्याय ५६, श्लोक ६१८ आणि ६१९)
अर्थ : जो मनुष्य वास्तूपूजन न करता नव्या घरात प्रवेश करतो, त्यास विविध प्रकारचे रोग, क्लेश आणि संकटे प्राप्त होतात. ज्या घरास किवाडे (कवाड / द्वार) लावलेले नाहीत, ज्यास छताचे आच्छादन नाही, तसेच ज्या वास्तूत वास्तूपूजन आणि त्या अंतर्गत देवतांसाठी बली, ब्राह्मणांसाठी भोजन हे विधी संपन्न झाले नसतील, अशा नूतन वास्तूत कधीही प्रवेश करू नये, अन्यथा ते संकट उत्पन्न करणारे ठरते.
अर्थात् जोवर मंदिराचे प्रवेशद्वार आणि छत सिद्ध होत नाही, तोवर तेथे वास्तूशांती केली जाऊ शकत नाही. त्यानंतर देवतांसाठी यथायोग्य माषभक्तबली (अखंड उडीद), तसेच पायसबली (तांदळाची खीर) आणि वास्तूशांतीमध्ये अंगभूत असे ब्राह्मण भोजन हे विधी संपन्न होत नाहीत, तोवर मंदिरात देवतांची प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकत नाही. व्यवहारातही काही वेळा घराचे बांधकाम झाले की, गृहप्रवेश केला जातो आणि मग वर एखादा मजला अजून वाढवायचा असल्यास वाढवला जातो. मंदिर हे देवतांचे निवासस्थान असल्याने वरील नियम येथेही लागू होतो.
अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी यथाविधी वास्तूशांती, बलीदान, ब्राह्मण भोजन हे केले जात आहे. मंदिरातील दरवाजांची निर्मिती पूर्ण झाली आहे. मंदिरातील गर्भगृह पूर्णपणे शिळांनी आच्छादले गेले आहे.
त्यामुळे तेथे देवतांची प्रतिष्ठापना करण्यात काहीही दोष उत्पन्न होत नाही.
मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर ‘कर्मकाण्डप्रदीप’ ग्रंथात दिल्याप्रमाणे कलशारोहण विधी संपन्न होईलच.
श्री. बबन ल. मस्के यांनी काशी येथील आदरणीय विद्वान आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांना लिहिलेले पत्र आणि त्यावर शास्त्रीजींनी दिलेले उत्तर –
(वरील पत्र आणि त्याला दिलेली उत्तरे वाचण्यासाठी संबंधित चित्रावर क्लिक करा)
प्रश्न २. २२ जानेवारीखेरीज अन्य कोणताही मुहूर्त का घेतला गेला नाही ?
उत्तर : आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी याविषयी उत्तर देतांना म्हटले आहे की, या दिवशी पौष शुक्ल द्वादशी, सोमवार आणि मृगशीर्ष नक्षत्र असल्याने सर्वोत्तम मुहूर्त आहे.
१. २२ जानेवारी २०२४ च्या आधीच्या विजयादशमीच्या दिवशी (वर्ष २०२३) योग्य गुणांनीयुक्त असा मुहूर्त लाभेल, अशी लग्नरास नाही, त्यात गुरु वक्री असल्याने निर्बल आहे.
२. यंदाच्या वर्षी बलीप्रतिपदा मंगळवारी येत आहे. त्या दिवशी गृहप्रवेश करता येत नाही. अनुराधा नक्षत्र असून घटचक्राची शुद्धी नाही. याखेरीज त्या दिवशी अग्निबाण आहे (सूर्यसिद्धांतानुसार), त्यामुळे तेव्हा प्राणप्रतिष्ठा केल्यास अग्नीभय संभवते.
३. २५ जानेवारी २०२५ पौष पौर्णिमा या दिवशी मृत्यूबाण आहे, म्हणजे या दिवशी प्रतिष्ठापना केल्यास लोकांना मृत्यूचे भय राहील.
४. माघ फाल्गुनमध्ये कधी बाणशुद्धी नाही, तर कधी पक्षशुद्धी, तर कधी तिथीशुद्धी नाही. शुद्ध पक्षात गुरु उच्च राशीत नाही. (त्यामुळे गुरु ग्रहाचे बळ लाभत नाही.)
५. १४ मार्च २०२४ पासून उत्तर भारतात खर मास चालू होत असल्याने शुभ कार्य करता येत नाही.
६. ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपाडवा आहे; परंतु मंगळवार, वैधृति योग आणि चंद्र बलहीन असणे, हे दोष आहेत.
७. १७ एप्रिल २०२४ या दिवशी येणार्या रामनवमीच्या दिवशी मेष लग्न येत असून त्या दिवशी पापाक्रांत योग होत आहे, तसेच त्या मुहूर्तावर बुध, शुक्र हे शुभ ग्रह द्वादश स्थानी (व्यय) जात असल्याने योग्य नाही. त्या पुढील वृषभ लग्नात सूर्य असता, मुहूर्त घेतला, तर द्वादश स्थानी गुरु आणि चतुर्थ स्थानाचा अधिपती सूर्य येत आहे की, जे चांगले फळ देणार नाही. त्यानंतर निषिद्ध असे आश्लेषा नक्षत्र चालू होत आहे.
८. २४ एप्रिल २०२४, म्हणजेच वैशाख कृष्ण प्रतिपदा या दिवशी मृत्यूबाण आहे.
९. २८ एप्रिल २०२४ या दिवशी शुक्र ग्रह वृद्धावस्थेत प्रवेश करत आहे. शुक्र सुखाचा कारक असल्याने हे फलदायी नाही.
१०. ५ मे २०२४ या दिवशी गुरु ग्रह वृद्धावस्थेत प्रवेश करत आहे.
११. ७ जुलै २०२४ या दिवशी रथयात्रा असूनही रविवार असल्याने निषिद्ध आहे.
१२. १७ जुलै २०२४ या दिवशी चातुर्मास चालू होत आहे.
१३. १२ ऑक्टोबर २०२४ या दिवशी विजयादशमी असली, तरी निषिद्ध असा शनिवार आणि गुरु ग्रह वक्री आहे.
१४. २ नोव्हेंबर २०२४ या दिवशी बलिप्रतिपदा असली तरी निषिद्ध असा शनिवार आहे, गुरू ग्रहाचे वक्री भ्रमण आहे.
१५. ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत गुरु ग्रहाचे वक्री भ्रमण असल्याने गुरुबळ नाही.
१६. वर्ष २०२६ मधील माघ महिन्यात शुद्ध पक्षात शुक्रवारी बलवान आणि शुद्ध असे लग्न मिळत नाही.
१७. माघ शुक्ल त्रयोदशी, म्हणजेच १० फेब्रुवारी २०२५ या दिवशी सोमवार असूनही अग्निबाण आहे आणि पुनर्वसु नक्षत्र हे पापाक्रांत योग निर्माण करत आहे.
१८. त्यानंतर चंद्रशुद्धी नाही, कधी पक्ष शुद्धी नाही, कधी नक्षत्र बल नाही, तर कधी बाण शुद्धी नाही. कधी तिथी आणि वार योग्य येत नाहीत.
३. प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी हाच दिवस सर्वांत योग्य का ? याविषयीचे अन्य विश्लेषण :
अशा प्रकारे वर्ष २०२६ पर्यंत विविध मुहूर्तांपैकी कशात ना कशात काही उणिवा आहेत आणि तोवर शुद्ध मुहूर्त शोधण्यात वेळेचा अपव्ययही होतो. या सर्वांचा विचार करून २२ जानेवारी २०२४ हा दिवस सर्वांत जवळचा आणि योग्य म्हणून निवडला आहे. यापूर्वी अशा प्रकारे विचार न करता केवळ घाई केल्याने योग्य मुहूर्तावर मंदिरांची स्थापना न केल्याने अनेक मंदिरे काळाच्या ओघात तोडली गेली. या गोष्टींचा विचारही २२ जानेवारीच्या मुहूर्तासाठी केला गेला आहे. या दिवशी लग्नस्थ गुरु ग्रहाची दृष्टी ५ व्या, ७ व्या आणि ९ व्या स्थानी असल्याने उत्तम मुहूर्त आहे. सूर्याचे मकर संक्रमण झाले असल्याने पौष मासात निर्माण होणारा वर्ज्यत्व दोष संपत आहे.
श्री भगवंताच्या कृपेने आणि समस्त गुरुजनांच्या आशीर्वादाने सर्वोत्तम मुहूर्त मिळाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे, कोणतेही शास्त्रप्रमाण ठाऊक नसतांना उपस्थित केलेल्या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. त्यामुळे सर्वांनी या दिवशी निःशंक मनाने आदर आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने श्री रामललाचे स्वागत करूया.
संकलक : श्री. संजोग टिळक, पुणे.