गोवा येथून नवी देहली येथे जाणार्या ‘इंडिगो’ आस्थापनाच्या विमानाला उत्तर भारतातील धुक्यामुळे १३ घंटे विलंब झाला. परिणामी या विमानातून प्रवास करणार्या एका प्रवाशाने वैमानिकाला चिडून ठोसा लगावला. ‘समोरचा कितीही चुकत असला, तरी संयमाने वागणे महत्त्वाचे’, ही शिकवण आपल्याला दिली आहे. त्यामुळे प्रवाशाच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही; मात्र ‘प्रवाशाचा उद्रेक का झाला ?’, याचे उत्तर ‘इंडिगो’ने शोधायचे आहेच, त्यासह भारतीय व्यवस्थेनेही शोधायचे आहे. असे झाले, तरच भविष्यात असले प्रकार घडणार नाहीत. प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी विमान प्रवासाचा पर्याय नागरिक स्वीकारतात; मात्र त्या प्रवासालाच अनेक घंटे विलंब झाल्यास कुणाचाही संताप अनावर होऊ शकतो. या प्रवासासाठी नागरिकांनी अधिक पैसे मोजलेले असतात. त्यामुळे साहजिकच चांगल्या आणि सुविधायुक्त प्रवासाची नागरिक अपेक्षा करतात; मात्र विमान आस्थापने या अपेक्षा धुळीला मिळवत आहेत. मुंबई विमानतळावरील आणखी एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवरच बस्तान मांडून प्रवासी चक्क जेवण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हेसुद्धा ‘इंडिगो’ आस्थापनाचेच विमान होते. या विमानाला विलंब होत असल्याने आणि मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाने त्यांना विमानतळ कार्यालयाच्या ठिकाणी जेवण करण्यास अनुमती नाकारल्याने प्रवाशांनी धावपट्टीवरच जेवण केले. या प्रकाराची गंभीर नोंद स्वत: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली. त्यांनी विमान आस्थापन आणि मुंबई विमानतळ प्रशासन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुंबई विमानतळ आणि इंडिगो आस्थापन यांना या प्रकाराविषयी जाब विचारला आहे. प्रवाशांना जेवणासाठी धावपट्टीवरच बसावे लागणे, हीसुद्धा प्रवाशांप्रती तीव्र अनास्था आणि असंवेदनशीलताच आहे.
नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक अडचणी यांमुळे काही समस्या विमान उड्डाणामध्ये असू शकतात. अशा वेळी प्रवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करून देणे, हे खरेतर आस्थापनांचे दायित्व आहे. काही दिवसांपूर्वी विमानातील प्रवाशांना हलाल चिन्ह असलेले कॉफी आणि खाद्यपदार्थ देण्यात आले. काही प्रवाशांनी शाकाहारी जेवण विचारल्यावर त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आले. अशा अनेक अपप्रकारांना विमानसेवेत प्रवाशांना सामोरे जावे लागते; मात्र उघड होणारे केवळ काही प्रकार बातम्यांमधूनच लोकांच्या लक्षात येतात. ते अधिक प्रमाणात असू शकतात. विमान आस्थापने त्यांच्याच विमानातून लोकांनी प्रवास करावा, यासाठी मोठी विज्ञापने करतात. प्रवाशांना विमानांच्या तिकिटांमध्ये सवलतीची ‘पॅकेज’ देतात; मात्र सेवा देण्यात अडचणी असतात. ‘एअर इंडिया’ या सरकारी क्षेत्रातील आस्थापनाच्या सुमार कारभारामुळे दिवाळे निघाले आणि ते अंततः टाटा आस्थापनाला विकावे लागले. सरकार या आस्थापनाला तोट्यात जाण्यापासून रोखू शकले नाही. भारतातील सरकारी क्षेत्रातील चांगली आस्थापने नियोजनशून्यतेमुळे डबघाईला आली किंवा काहींच्या मते आणण्यात आली, जेणेकरून खासगी आस्थापनांना त्यांची जागा घेता येऊन बक्कळ पैसा कमावता येईल. आता ही खासगी आस्थापनेच डोईजड होत आहेत. ही आस्थापने विमान प्रवासाची घोषणा करतात, काही वर्षे चालतात आणि नंतर हानी झाल्यावर काढता पाय घेतात. नागरिकांना सेवा देण्यात अनेक चुका झाल्यावर नागरिकांचा मात्र सरकारवरील विश्वास उडतो.
जपान येथे एका क्षेत्रातील रेल्वे केवळ एका विद्यार्थिनीसाठी चालू ठेवण्यात आली होती. तिचे महाविद्यालय गावापासून दूर असल्याने आणि अन्य कुठली नियमित जाण्याची सुविधा नसल्याने ही रेल्वे काही वर्षे चालू होती. आता तिचे शिक्षण पूर्ण झाल्याने ती बंद करण्यात आली आहे. केवळ एका नागरिकासाठी रेल्वेसेवा चालू ठेवणे, ही जपान सरकारची नागरिकांप्रती संवेदनशीलताच आहे. भारतीय विमान आस्थापने अशी संवेदनशीलता दाखवणार का ?
विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ? |