अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण होतांना साधकांनी साधनावृद्धीसाठी करायचे प्रयत्न !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मोठा दिव्य सोहळा होत आहे. ही एक मोठी पर्वणी आहे. या दिवशी भारतखंडामध्ये सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येईल. त्या दिवशी ‘साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी सूत्रे येथे दिली आहेत.

१. साधक प्रभु रामचंद्राची मानसपूजा करू शकतात.

२. या पर्वणीच्या काळात श्रीरामाचा नामजप केल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन साधकांच्या साधनेची गती वाढू शकणे

‘अयोध्येत होत असलेला सोहळा निर्विघ्न पार पडावा आणि ‘त्याचा साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी साधक श्रीरामाला, म्हणजेच विष्णुतत्त्वाला प्रार्थना करू शकतात. ही महत्त्वाची पर्वणी असल्याने आणि श्रीरामामध्ये ७५ टक्के विष्णुतत्त्व असल्यामुळे साधकांनी श्रीरामाचा नामजप अधिकाधिक केल्यास त्यांच्या साधनेची गती वाढून त्यांना श्रीरामतत्त्वाचा लाभ होईल.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

३. श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विधी ५ दिवस आधीपासूनच होण्यास आरंभ होणार असल्याने साधकांनी तेव्हापासूनच श्रीरामाचा नामजप केल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार असणे

१७.१.२०२४ पासूनच श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विधी चालू होत आहेत. त्यामुळे श्रीरामाच्या नामजपाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यास आरंभ होईल. आतापासूनच साधकांनी समष्टीच्या दृष्टीने प्रार्थना करून दिवसातील काही वेळ जाता-येता श्रीरामाचा नामजप करावा, उर्वरित वेळ नियमित करत असलेला जप करावा. ‘श्रीरामतत्त्वाचा लाभ पूर्ण भारतखंडास व्हावा आणि सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी साधकांनी मधूनमधून श्रीरामाला प्रार्थना करावी.

४. श्रीराममंदिरासाठी हुतात्मा झालेल्यांना आज पुढची गती मिळणार असणे

श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी स्वतःचे बलीदान दिलेल्या दिव्य व्यक्तींना आजच्या दिवशी (२२.१.२०२४ या दिवशी) पुढची गती मिळणार आहे. साधकांनी श्रीरामाचा नामजप सातत्याने केल्यास समष्टी स्तरावर या नामजपाचा सूक्ष्मातून ७० टक्केपर्यंत लाभ होऊ शकतो.

५. ‘श्रीरामाचा नामजप कसा करावा ?’, याविषयीचे सूत्र

साधकांनी २२.१.२०२४ या दिवशी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून ‘।। श्रीराम जय राम जय जय राम ।।’ हा नामजप दिवसभर करावा.साधकांनी हा जप करताना ‘आपण श्रीरामाला हळूवारपणे हाक मारत आहोत’, असा भाव ठेवून संथ गतीने करावा.

८.१२.२०२३ या दिवशी उत्तररात्री ३ वाजून २० मिनिटे ते पहाटे ५ वाजून २० मिनिटे या कालावधीत मला वरील सर्व सूत्रे सुचली. तेव्हा मला सुचलेला नामजप येथे दिला आहे.

‘हे सर्व मला गुरुकृपेने सुचले’, यांसाठी गुरुचरणी कृतज्ञता !

– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा (८.१२.२०२३)