मुंबई – कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र यांसह देशातील प्रमुख संग्रहालये बाँबने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल प्राप्त झाले आहेत.
आसाममधील १२ वर्षांच्या मुलाच्या भ्रमणभाषवरून हे मेल आले आहेत. कुणीतरी त्या मुलाला फसवून त्याच्याकडून भ्रमणभाष घेऊन हा मेल सिद्ध केल्याचे प्राथमिक चौकशीत लक्षात येत आहे. ‘डिस्कॉर्ट’ या व्हिडिओ गेम खेळणार्यांमध्ये प्रचलित असलेल्या ‘प्लॅटफॉर्म’वरून आरोपी आणि मुलगा एकमेकांच्या संपर्कात होते. त्या व्यक्तीने त्या मुलाकडून हा ई-मेल पत्ता सिद्ध करून घेतल्याचे समजते.
मुंबईतील संग्रहालयाचा मेल ५ जानेवारी या दिवशी आला होता. त्यानंतर पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी तपास केल्यावर काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संग्रहालयाच्या परिसरात बंदोबस्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सायबर विभाग मेल पाठवणार्याचा शोध घेत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर घातपात करण्याचा दूरभाष
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता असल्याचा दूरभाष महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. गुन्हे शाखा याविषयी अधिक तपास करत आहे.
संपादकीय भूमिकागेले काही दिवस मुंबईत अशा प्रकारच्या धमक्या वारंवार येत आहेत. त्यामुळे अशा धमक्या देणार्यांना कडक शिक्षा केल्याविना त्याचे गांभीर्य आणि यंत्रणांवर होणारे परिणाम लक्षात येणार नाहीत ! |