आमच्यातील काही लोक सरकार फोडणार ! – मनोज जरांगे

मनोज जरांगे

जालना – माझ्यावर (सापळा) ‘ट्रॅप’ लावला असून सरकार मोठे षड्यंत्र रचत आहे. आमच्यातील काही लोक फोडले जाणार आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलनकर्ते मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारवर बरेच आरोप केले.

मनोज जरांगे म्हणाले की, मी सरकारला ‘मॅनेज’ होत नाही आणि फुटतही नाही. मराठा समाजाच्या जिवावर राजकारण करणारे, मोठे झालेले, ज्यांच्या दुकानदार्‍या बंद पडल्या आहेत, अशांचा असंतोष असून त्यांना मी आतून खपत नाही. मी आरक्षणाचे सूत्र संपवायला निघाल्याने या लोकांना पुष्कळ वाईट वाटत आहे. या लोकांना मराठा आरक्षणाचा विषय संपू द्यायचा नव्हता.

मनोज जरांगे यांनी मांडलेली सूत्रे

१. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे, असे नियोजन असल्याची शंका आहे. ही माहिती मला सरकारी अधिकार्‍यांकडूनच मिळाली. आम्ही स्वयंसेवकांना सतर्क रहाण्याचा सल्ला दिला आहे.

२. सरकारने कितीही षड्यंत्र केले, गोळ्या घातल्या, तरी मी मागे हटणार नाही. सरकारला आमची कत्तल करावी लागेल. मराठा समाजाच्या आंदोलनाचे इतके दडपण सरकारने का घेतले आहे ? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जितक्या बैठका घेतल्या, त्यापेक्षा अधिक बैठका आंदोलन चिरडण्यासाठी केल्या जात आहेत.

३. मी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. माझ्या मागणीला सहा कोटी मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. पण सरकारने पाच-पन्नास मराठा नेत्यांना हाताशी धरून षड्यंत्र रचण्याचा डाव रचला आहे.