‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !

२२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…

भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि विश्वगुरु करण्यासाठी भगवान प्रभु श्रीरामाचे आगमन होत आहे !

‘रामायण’ उलगडण्यासाठी मॅसेच्युसेट्स, अमेरिका येथील श्री. नीलेश ओक यांनी केलेले अभूतपूर्व संशोधन !

स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके प्रदीर्घ, इतके तणावपूर्ण, इतके हिंसात्मक आंदोलन झाले; पण न्यायालयाच्या माध्यमातून लढा देऊन आता त्यावर प्रचंड विजय मिळवण्यात आला. त्यानंतरसुद्धा अतिशय शांतपणे आणि सुजाणपणे याचा आनंद साजरा केला गेला. असे हे रामजन्मभूमीचे आंदोलन ! त्या काळात या आंदोलनाची वादळी हवा अत्यंत उष्ण, अगदी अग्नीकुंडासारखी धगधगती होती. भारताच्या कानाकोपर्‍यांतून सहस्रो नव्हे, तर लाखो तरुण-तरुणींनी कारसेवेत भाग घेतला. अनेकांचे व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक आयुष्य उलथापालथींनी भरून गेले. नेत्यांची नावे सर्वतोमुखी झाली; पण शिलेदारांची नावे ‘अनाम’ अशीच राहिली. खरे तर त्यांच्या योगदानाविना हा लढा यशस्वी होऊ शकला नसता. अशा अनेक अनामविरांचे स्वप्न आपणा सर्वांनाच रोमांचित करणार्‍या श्रीराममंदिर उद्घाटनामुळे यशस्वी होत आहे. त्यांच्या त्या लढवय्यांच्या वेद‌नांना ‘अश्रूंची झाली फुले’ असेच म्हणायला हवे.

श्री. नीलेश ओक

१. श्रीरामाच्या पुनरागमनाचा आनंद आणि प्रत्यक्ष श्रीरामाच्या काळातील आनंदकल्लोळ !

रामराज्य होऊन आज अनेक शतके-सहस्रके उलटून गेली असूनही आमच्या मनात श्रीरामाविषयी श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यामुळेच अयोध्येच्या त्याच्या मंदिरात होणार्‍या पुनरागमनाचा आनंद ओसंडून वहात आहे. आम्ही कुणीही रामाला प्रत्यक्ष पाहिले नाही. त्याच्या अस्तित्वाचा आनंद प्रत्यक्ष मिळाला नाही, त्याचे राज्यकारभाराचे निष्पक्ष रूप अनुभवले नाही, त्याचा पराक्रम आणि जनतेविषयीचे त्याचे प्रेम प्रत्यक्ष अनुभवले नाही, तरी आज संपूर्ण देशभर जे आनंद, उत्साह आणि उल्हास यांचे वातावरण निर्माण झाले आहे, तर मग जेव्‍हा श्रीराम प्रत्यक्ष रूपात, रावणाचा वध करून, सीता आणि लक्ष्मण, हनुमान-सुग्रीव-बिभीषण या मित्रगणांसह लंकेहून अयोध्येला परतला असेल, त्या वेळी जनतेत, मित्र परिवारात आणि राजवाड्यात किती आनंदकल्लोळ झाला असेल !

२. रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ !

श्रीमती अलका गोडबोले

अशा प्रकारे कल्पनाचित्र रंगवता रंगवता माझे मन थेट वाल्मीकींच्या रामायण काव्यरचनेपर्यंत पोचले. वाल्मीकींसारख्या एका ऋषिवर्यालाही शोकाकुल करणार्‍या प्रसंगातून रामायणाची निर्मिती झाली. तमसा नदीच्या काठावर अत्यंत प्रसन्न चित्ताने फिरत असतांना क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील एक पक्षी निषादाच्या (पारद्याच्या) बाणाने घायाळ होऊन पडतो आणि वाल्मीकींच्या तोंडून उद्गार निघतात,

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौञ्चमिथुनादेकम् अवधीः काममोहितम् ।।
– वाल्मीकि रामायण, कांड १, सर्ग २, श्लोक १५

अर्थ : हे निषादा (पारध्या) ! तुला नित्य निरंतर शांती कधीही मिळणार नाही; कारण तू या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीमधील कामाने मोहित झालेल्या अशा एकाची, त्याचा काहीही अपराध नसतांना हत्या केली आहेस.

भावनोदिप्त होऊन उद्गार बाहेर पडले खरे; पण त्या उद्गारांचे कोणतेही औचित्य नव्हते, हे लक्षात येऊन वाल्मीकि दुःखी होतात. मग ब्रह्मदेवांच्या सांत्वनपर वचनातून या श्लोकाच्याच ‘अनुष्टुभ’ छंदात संपूर्ण रामायणाची रचना होते.

३. श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची !

शब्दवेधी बाणामु‌ळे दशरथाच्या हातून झालेली श्रावणबाळाची हत्या, त्याला मिळालेला शाप, ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञामुळे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा झालेला जन्म, रामाच्या राज्याभिषेकाच्याच दिवशी त्याला झालेला वनवास, मग श्रीरामाने लक्ष्मण आणि सीता यांसह केलेले वनवास वास्तव्य, शूर्पणखा मानभंग, रावणाचे सीताहरण, रामाचे लंकेला जाण्याआधी हनुमानाचे लंकेला जाणे-परत येणे, रामसेतू निर्मिती, राम-रावण युद्ध, रावणाचा वध करून रामाने अयोध्येला पुनरागमन करणे, ही स्थूल रूपातील रामकथा सर्वांना परिचित आहे.

४. रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम !

ही महाकाव्य रूपातील कथा ऐकून मनात प्रश्न येतो की, हे केवळ महाकाव्य नसून हा भारतवर्षाचा प्राचीन इतिहास असेल, तर मग हे केव्हा घडले ? याचे शतक-सहस्रक काही तरी निश्चितच शोधले पाहिजे. याच विचारातून रामायणाची कालनिश्चती करण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी उत्तम तर्कशुद्ध विचार मांडत उत्तम संशोधन करत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा-संगणकाचा उपयोग करत हा कालखंड शोधून काढला आहे. त्यांनीच शोधून तो निश्चित केला. ‘रामायण हे महाभारत कालापूर्वी घडले’, म्हणजेच ते सर्वमान्य कालखंड पूर्व (इ.स. पूर्व) ५५६१ च्या आधी घडले’, असे त्यांनी गृहित धरले आहे. त्यांचे पहिले पुस्तक आहे, ‘When did The Mahabharata war happen ?’ (महाभारताचे युद्ध केव्हा झाले ?)

श्री. ओक यांनी ‘वाल्मीकि रामायण’ संहितेचाच वापर केला आहे. खगोलशास्त्राची स्थिती रामायणात वर्णन केल्याप्रमाणे आहे. वाल्मीकि रामायणातील २२५ हून अधिक वर्णने आणि उपमा निश्चित केल्या अन् आपण स्वतः गृहित धरलेल्या कालखंडाचे त्या समर्थन करतात का ? हेही त्यांनी पडताळून पाहिले.

५. श्री. ओक यांना सापडली स्वर्गीय सुई !

नीलेश ओक म्हणतात, ‘‘मी जवळजवळ ६ सहस्र वर्षांच्या गवताच्या गंजीत (एखाद्या वर्षाच्या घटनेचा अथवा एखाद्या घटनेच्या सुईचा) शोध घेत होतो, जो मला रामायणातील एखाद्या विशिष्ट घटनेची निश्चिती करण्याची अनुमती देईल आणि मला एक स्वर्गीय सुई सापडली !’’ ही सुई म्हणजे राम-लक्ष्मण आणि हनुमानासहित वानरसेना लंकेकडे निघाली असता लक्ष्मण ‘मूळ’ नक्षत्राला त्रास देणार्‍या ‘धूमकेतू’चा संदर्भ देतो.

नैर्ऋतं नैर्ऋतानां च नक्षत्रमतिपीड्यते ।
मूलो मूलवता स्पृष्टो धूप्यते धूमकेतुना ।।
– वाल्मीकि रामायण, युद्धकांड, सर्ग ४, श्लोक ५१

अर्थ : राक्षसांचे नक्षत्र मूळ, ज्याची देवता निर्ऋति आहे, अत्यंत पीडित होत आहे. त्या मूळाच्या नियामक धूमकेतुने आक्रांत होऊन ते संतापाचे भागी होत आहे.

५ अ. लक्ष्मण हा मानवतेचा दस्तावेज (कागदपत्रे) झालेल्या इतिहासातील पहिला मानव असल्याचे श्री. ओक यांचे मत ! : अनेकानेक दिवस पालट करत त्यांनी आकाशस्थितीची प्रतिरूपे बनवली आणि या ‘व्हायेजर’ (प्रवासी) प्रतिरूपातून त्यांना सर्वमान्य कालखंड पूर्व सप्टेंबर १२२०९ मध्ये ‘मूळ’ नक्षत्रावर दिसणारा धूमकेतू दिसला. तो पाया मानून त्यांनी पुढील सर्व परीक्षण केले. ते म्हणतात, ‘या धूमकेतूचे निरीक्षण करणारा, त्याची नोंद घेणारा, रामाचा सद्गुणी भाऊ लक्ष्मण हा मानवतेचा दस्तावेज झालेल्या इतिहासातील पहिला मानव आहे. त्यामुळे या धूमकेतूला ‘लक्ष्मण धूमकेतू’ म्हणणे उचित आहे’, असे मला वाटते.’’

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्रीमती अलका गोडबोले, मुंबई (१२.१.२०२४)
(श्री. नीलेश ओक यांच्या ‘ऐतिहासिक राम’ या पुस्तकातून साभार)

राष्ट्राला पुन्हा अशा दुरवस्थेला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रयत्नशील राहूया !

‘ऐतिहासिक राम’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

राम-रावण युद्धाचा पहिला दिवस, युद्ध समाप्तीचा दिवस, राम अयोध्येला परतण्याचा दिवस या सर्व घटनांची कालनिश्चिती करण्याचे काम श्री. नीलेश ओक यांनी (श्री. ओक हे डार्टमाऊथ विश्वविद्यालयात कार्यरत आहेत.) ‘The Historic Rama’ या इंग्रजी पुस्तकात ग्रंथित केले आहे. या पुस्तकाचा मराठी वाचकांना लाभ होण्यासाठी त्याचा अनुवाद श्रीमती अलका गोडबोले यांनी ‘ऐतिहासिक राम’ या नावाने केले असून ‘परममित्र प्रकाशन’ने ते पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

वाल्मीकि रामायणातील श्रीरामाला केवळ १४ वर्षांचा वनवास घडला; पण भारतातील रामजन्मभूमी मंदिराला ५५० वर्षे दुरवस्था प्राप्त होऊन एकप्रकारे वनवासातच रहावे लागले. आज त्या दुरवस्थेतून बाहेर येऊन अयोध्येमध्ये रामललाची त्याच्या वैभवशाली मंदिरात २२ जानेवारी या दिवशी पुनर्स्थापना होणार आहे. केवळ यावरच समाधानी न रहाता रामराज्याच्या सुरक्षिततेची, समृद्धीची, न्यायाची आश्वासक खात्री सर्व जनतेला होती, तशीच आश्वासकता आजच्या काळातही मिळेल आणि ती मिळण्यासाठी लागणारे कष्ट, त्याग करण्याची सिद्धता ठेवून आपले योगदान, राष्ट्रकार्य उभारणीसाठी देण्याची मनोमनी प्रतिज्ञा करूया !

आयुष्यात एकदाच अनुभवाला येणार्‍या या सुवर्णसंधीला सामोरे जाऊया. ही संधी आज जीवित असणार्‍या आपणा सर्वांना लाभली आहे, तिचा भरभरून आनंद घेऊया आणि पुन्हा कधीही आमच्या राष्ट्राला अशा दुरवस्थेला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रयत्नशील राहूया !

– श्रीमती अलका गोडबोले, मुंबई (१२.१.२०२४)