अकोला – तळमळीने धर्मकार्य करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले येथील हिंदुत्वनिष्ठ, तसेच उद्योगपती श्री. संजय ठाकूर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत. ही आनंदवार्ता सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी १० जानेवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योगपती यांच्या घेतलेल्या सत्संगात सांगितली. या वेळी श्री. ठाकूर यांची भावजागृती झाली. उपस्थित सर्वच जण भारावून गेले. सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. ठाकूर यांचा सनातन-निर्मित श्री गणेशाची प्रतिमा आणि प्रसाद देऊन सत्कार केला.
आध्यात्मिक पातळीची दिलेली प्रसादरूपी भेट म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली कृपाच ! – संजय ठाकूर
मनोगत व्यक्त करतांना श्री. संजय ठाकूर म्हणाले, ‘‘आध्यात्मिक पातळी म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला दिलेला प्रसाद आहे. जन्म-मृत्यूच्या चक्रातून त्यांनी मला मुक्त केले, ही त्यांनी माझ्यावर केलेली अपार कृपा आहे. मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. कोणतेही धर्मकार्य करतांना ते माझ्या समवेत सूक्ष्मातून असतात. त्यामुळेच मी निर्भीडपणे ते कार्य साधना म्हणून करू शकतो. मला प्रत्येक धर्मप्रेमीत त्यांचे दर्शन होते. त्यामुळे मला धर्मकार्य करतांना अधिक बळ मिळते. मी त्यांच्या सूक्ष्मातील मार्गदर्शनानुसार साधनामार्गावर वाटचाल करतो. मी रामनाथी (गोवा) येथे असलेल्या सनातनच्या आश्रमाकडे चुंबकासारखा खेचला जातो. तेथून परततांना मी तेथील चैतन्य समवेत आणतो.’’
धर्मप्रेमींनी श्री. संजय ठाकूर यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !१. धर्मप्रेमी श्री. कोपेकर : श्री. संजय ठाकूर हे मितभाषी आहेत. कोणत्याही धर्मकार्यात ते झोकून देऊन सहभागी होतात. २. श्री. भट : श्री. संजय ठाकूर उच्चविद्याविभूषित असूनही त्यांच्यात अहं अतिशय अल्प आहे. हिंदूंच्या संघटनाचे कार्यच नव्हे, तर साधनाही ते मन लावून करतात. त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचार्यांकडूनही ते साधना करवून घेतात. या वेळी अन्य उपस्थितांनीही श्री. ठाकूर यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. |
|