प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ति अमृत महोत्सव’ !

प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज

पुणे, १४ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष अन् श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष असलेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षी ‘गीताभक्ति दिवस’ म्हणून साजरा केला जातो. वर्ष २०२४ मध्ये पूज्य स्वामीजी आपल्या दिव्य जीवनाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने (७५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी) आळंदी येथे त्यांचा जन्मोत्सव ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘गीताभक्ति अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

८ दिवस चालणार्‍या या महोत्सवात अनेक संत आणि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अनेक संस्मरणीय वैदिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम येथे सादर केले जातील. पूज्य स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण धर्माच्या रक्षणासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केला, ते आदि शंकराचार्यांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंतच्या संतपरंपरेचे उज्ज्वल प्रतीक आहेत. पूज्य स्वामीजींचा जन्मोत्सव हा कोणा एका संताची उपासना करण्याचा प्रसंग नसून भारताच्या दैवी संतपरंपरेचा आहे, अशी आपली सर्वांची ठाम श्रद्धा आहे. आपण सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधि, गीता परिवार, संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी आदींच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.