देशभर मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम !
मुंबई – भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ‘देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवणार आहोत’, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रसंगी समितीच्या वतीने देशभरात मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या वेळी स्वतः भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही मंदिरांची स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. यंदाही हिंदु जनजागृती समिती १५ ते २१ जानेवारी या कालावधीत देशभरातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता उपक्रम राबवणार आहे. मंदिराची स्वच्छता केल्यानंतर एकत्र जमलेले सर्व हिंदू रामराज्य आणि हिंदु राष्ट्र यांची शपथ घेतील. शेवटी श्रीरामाच्या चरणी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
.@HinduJagrutiOrg to undertake nationwide temple cleaning campaign from January 15th to 21st !
जय श्रीराम I अयोध्या I राम मंदिर प्राण प्रतिष्ठा I हर घर श्री राम #RamMandirPranPratishtha #SwachhTeerth pic.twitter.com/hNQTPjihPW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
प्रत्येक घरात दिवा आणि भगवा ध्वज !
२२ जानेवारी या दिवशी समितीचे सर्व कार्यकर्ते, तसेच समविचारी हिंदुत्वनिष्ठ आणि रामभक्त त्यांच्या निवासस्थानी प्रभु श्रीरामासाठी दिवाळीप्रमाणे दीपप्रज्वलन करतील. तसेच घराच्या अंगणात श्रीराम तत्त्वाची सात्त्विक रांगोळी काढणे, घरावर भगवा ध्वज फडकवणे, श्रीरामाची भक्तिभावाने पूजा करणे आणि रामराज्यासाठी सामूहिक प्रार्थना आदी कृती करणार आहेत. त्यासमवेतच अन्य धार्मिक संस्था आणि हिंदु संघटन यांकडून चालवल्या जाणार्या कलश यात्रा, अक्षता वितरण आदी उपक्रमांमध्ये यथाशक्ती सहभाग घेतला जाईल.