मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

‘भारतीय संस्कृतीने हिंदु सण आणि ऋतुमान यांची सुंदर गुंफण केली आहे. पौष मासात येणारी संक्रांत ही भौगोलिक प्रक्रिया आहे. १२ राशींमध्ये वर्षभर फिरणारा सूर्य पौष मासात मकर राशीत प्रवेश करतो. यालाच ‘मकरसंक्रमण’ म्हणतात. यानंतर सूर्य उत्तरेकडे कर्क राशीकडे मार्गक्रमण करू लागतो. सूर्याच्या गतीचे हे परिवर्तन, म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ ! रात्र न्यून (कमी) होऊन तिळातिळाने दिवस मोठा होतो, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे होणारी वाटचाल ! निराशेतून आशेकडे, अशुभाकडून शुभाकडे नेणारा हा काळ म्हणजे ‘पर्वकाळ’, ‘पुण्यकाळ’ मानला जातो. या पर्वकाळी काही धार्मिक रूढी किंवा परंपरांचे आपण पालन करतो, जसे दान देणे, सूर्योपासना, हळदी-कुंकू, तीळगूळ समारंभ !

१. दान देणे

याविषयी प.पू. जनार्दन स्वामीजींनी प्रकट केलेले विचार फार उद्बोधक आहेत. दान म्हणजे मनुष्य जीवनातील नैसर्गिक लोभवृत्तीला हटवून जिवाची प्रगती करून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. शास्त्रवचनावर विश्‍वास ठेवून ‘दान देणे, हे माझे कर्तव्य’, अशा श्रद्धेने दान द्यावे. दान योग्य व्यक्तींना, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य प्रकारे, योग्य अशा वस्तूचे द्यावे. असे दान दिल्याने ईश्‍वर संतुष्ट होतो आणि त्यामुळे दान देणार्‍याचे कल्याण होते.

अ. संक्रांतीला पर्वकाळी ५ सुगड इतके वायन दान, धान्य किंवा एखादी वस्तू दान म्हणून देतात. ‘माझ्याजवळ जे आहे त्यात सर्वांचा वाटा आहे’, अशा भावनेने ते दुसर्‍याला देणे, हे खरे दान होय. दान म्हणजे केवळ वस्तूचे दान, आर्थिक दान नसून अन्नदान, ज्ञानदान हे श्रेष्ठ प्रकारचे दान होय.

आ. दान कसे असावे ? उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला कळू नये. कोणत्याही धनाची, मानाची, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता दिलेले दान उन्नतीकारक होते.

इ. दान देण्याची सवय लागल्याने अपरिग्रह वृत्ती जोपासली जाते. शरीर रक्षणासाठी लागणार्‍या आवश्यक साधनांपेक्षा पुष्कळ अधिक अशा साधनांचा आपण संग्रह करत असतो. अशा अतिरिक्त वस्तूंच्या संग्रहाने चित्तात आसक्ती उत्पन्न होते. हे टाळण्यासाठी दानाची सवय लागली पाहिजे.

ई. ‘दानामुळे काही प्रमाणात आर्थिक समता निर्माण होऊन समाजस्वास्थ्य लाभेल’, असे स्वामीजींनी सांगितले आहे. ‘विधीयुक्त दान देण्याची सवय मनुष्यमात्रांनी आपल्याला लावून घ्यावी’, असे प.पू. स्वामीजी आपल्याला सांगतात. ज्या शरिरावर आपली अत्यंत ममता असते, तो देह शेवटी मृत्यूला दान करावा लागतो. दान करायची सवय लागली, तर या शरिराचे दान देण्यासाठी मनुष्य थांबणार नाही.

उ. समर्थ रामदासस्वामींनी मनाच्या श्‍लोकात ‘विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ।’ (मनाचे श्‍लोक, श्‍लोक १२) हा जो जिवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे, तोच स्वामीजींनी विधीयुक्त दानाविषयी सांगितला आहे. प्रभुविषयी प्रेम वाटणे, हा सर्व संतांचा सहजधर्म आहे. आध्यात्मिक विचाराचे दान देणारे संत हे सर्वश्रेष्ठ दाते आहेत.

२. सूर्योपासना

सूर्यदेवतेच्या तेजासमोर नतमस्तक होऊन ऋषीमुनींनी वेदांमध्ये अनेक ऋचा रचल्या. ऋग्वेदातील सौरसूक्त, यजुर्वेदातील गायत्रीमंत्र अनेकांच्या परिचयाचे असून त्याची नित्य उपासना केली जाते. ओज, तेज, बल, आरोग्य देणार्‍या सूर्यनारायणाची महती आपण जाणतो. संक्रांतीच्या पर्वावर, विशेषतः रथसप्तमी या दिवशी ठिकठिकाणी सामूहिक सूर्यनमस्काराची प्रथा उत्साहात साजरी केली जाते. ‘सूर्यनमस्कार’ या नियमित व्यायामाने शरिराला आरोग्य प्राप्त होते. सूर्याच्या प्रार्थनेने बुद्धी तेजस्वी होते. योगाभ्यासात सूर्याच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे.

३. वैज्ञानिक दृष्टीकोन 

सूर्योपासना करतांना ज्ञान आणि विज्ञान दोन्ही प्रकारे जाणणे, हे आपल्या सर्वांसाठी विशेषतः नवीन पिढीसाठी आवश्यक आहे.

अ. सूर्याचे पृथ्वीवर येणारे प्रकाशकिरण तरंगाच्या रूपात येतात. प्रत्येक तरंगात असणार्‍या विशिष्ट प्रमाणातील ऊर्जेमुळे पृथ्वीतलावर नवीन निर्मिती होते. उदा. वनस्पतीमधील हरितद्रव्याची (‘क्लोरोफिल’ची) निर्मिती कार्बनडायऑक्साइड + पाणी + ऊर्जा यांमुळे होते.

आ. पृथ्वीवर असणार्‍या ऊर्जेचे प्रमाण हे नेहमी स्थिर असते. हे प्रमाण स्थिर रहाण्यासाठी सूर्यापासून मिळणारी ऊर्जा हीच कारणीभूत असते. (थर्मोडायनॅमिक्स सिद्धांत)

इ. सौरऊर्जेचा उपयोग भारतासारख्या उष्ण कटिबंधात रहाणार्‍या लोकांना अनेक प्रकारे करता येतो. सूर्यचूल, सौरऊर्जेमुळे गरम पाण्याचा पुरवठा, पथदिवे इत्यादी सर्व प्रकारे ऊर्जेचा साठा करून विजेची बचत करता येते.

ई. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीकोनातून सूर्यकिरणातील ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे बळकट होतात. सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे नवजात शिशूंमधील काविळीला प्रतिबंध होतो.

उ. सूर्यनमस्काराच्या नियमित व्यायामामुळे शरिरातील रुधिराभिसरण, स्नायूसंस्था, पचनसंस्था, श्‍वसनसंस्था इत्यादी विविध संस्थांना लाभ होतो.

४. हळदी-कुंकू आणि तीळगूळ समारंभ

असे समारंभ आपण साजरे करतो; कारण त्यातून आपापसांतील स्नेहभाव वृद्धींगत होतो, माणसे जोडली जातात, वैचारिक देवाण-घेवाण होते. अनेकांशी मैत्रीचे नाते जोडले जाऊन संघटन सिद्ध होते. चांगल्या विचारातून एकत्र येऊन जी संघशक्ती सिद्ध होते, ती सामाजिक परिवर्तनासाठी पुष्कळ आवश्यक आहे. सज्जनांनी एकत्र येणे, हे समाजाच्या हिताचे आहे.

– सौ. जयश्री जोशी (साभार : मासिक ‘योगप्रकाश’, जानेवारी २०१५)

‘तीळगूळ देतांना ‘गोड बोला’, असे म्हणण्याची पद्धत आहे. त्याचा थोडा विचार करू. तिळातील स्निग्धता आणि स्नेहभाव मनात असेल, तर आपल्या वाणीत गुळाची गोडी येईल, मग आपण दुसर्‍याला ‘गोड बोला’, असे सांगू शकतो. आता बोलण्याचा संबंध आपल्या वाचेशी आहे. वाचा ही मानवाला मिळालेली देणगी आहे. तिचा उपयोग अत्यंत विचारपूर्वक व्हायला हवा. वाचेचे तप याला योगाभ्यासात अत्यंत महत्त्व आहे. अष्टांगयोगातील पहिले अंग म्हणजे यम ! यमाचे एक उपांग आहे अहिंसा. समाजाच्या स्वास्थ्यासाठी यमाचे पालन त्याच्या उपांगासहित आवश्यक आहे, हे आपण सर्वजण जाणता.’

– सौ. जयश्री जोशी
(साभार : मासिक ‘योगप्रकाश’)

‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ म्हणतांना आपल्या वाणीला अमृतत्त्वाचा स्पर्श व्हावा !

वाचिक अहिंसा, म्हणजे

कर्मणा मनसा वाचा सर्वभूतेषु सर्वदा ।
अक्लेशजननं प्रोक्ता त्वहिंसा परमर्षिभिः ॥
– कूर्मपुराण, भाग २, अध्याय ११, श्‍लोक १४

अर्थ : कर्माने, मनाने आणि वाणीने सर्व प्राणिमात्रांना क्लेश न देणे, याला महर्षींनी ‘अहिंसा’ म्हटले आहे.

मन, वाणी आणि कर्म या त्रयीने सर्व भूतांच्या ठिकाणी सर्वकाळ कुणाला क्लेश होणार नाहीत, अशा रितीने वागणे याला ‘अहिंसा’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अहिंसा ही कायिक, वाचिक आणि मानसिक अशी ३ प्रकारची आहे.

‘स्वतःच्या बोलण्याने इतरांच्या अंतःकरणाला दुःख होईल’, असे कडक, कठोर, निंदास्पद आणि मर्मभेदी न बोलणे ही वाचिक अहिंसा झाली.

संतवचनातून वाणीचा महिमा

सर्व संतांनी वाणीचा महिमा जाणून वाणीचे पावित्र्य का जपले पाहिजे ? याचा विचार सोप्या आणि प्रभावी भाषेत सांगितला आहे.

१. समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोध’ ग्रंथातील विचार

बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें ॥
आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥
– दासबोध, दशक १२, समास १०, ओवी २२

अर्थ : चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते, हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच; म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानत जावे. बरे बोलण्याने आपल्याला सुख वाटते, हे तर प्रत्यक्ष कळते; म्हणून आपल्या प्रमाणेच अन्य लोक मानून सुखी करावे.

पेरिलें ते उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।
तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥
– दासबोध, दशक १२, समास १०, ओवी २६

अर्थ : जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोलू, तसेच उत्तर आपल्याला मिळते. मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे ?

समर्थ भगवद्गीतेतील असुराच्या लक्षणात कठोर वचन आहे –

दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥
– दासबोध, दशक १२, समास १०, ओवी २८

अर्थ : दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत, असे भगवद्गीतेत म्हटले आहे.

वाणी मधुर आणि नम्र का असावी; कारण विनयशील अन् मधुर वाणीने समुदाय जोडता येतो, संघटना वाढते. जगात शत्रू किंवा मित्र निर्माण करणे, हे आपल्याच हातात असते.

‘जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।’ (दासबोध, दशक १९, समास २, ओवी १९) म्हणजे ‘जगात सर्वांशी मैत्री करायची असेल, तर त्याचे सूत्र आपल्या जिव्हेपाशी (वाणीमध्ये) आहे.’

२. संत तुकाराम महाराज यांनी एका अभंगात पांडुरंगाला मागितलेले मागणे

पापाची वासना नको दावू डोळां । त्याहूनी आंधळा बराच मी ॥
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करोनी ठेवी देवा ॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी ॥

अर्थ : हे देवा, माझ्या डोळ्यांना पापाची वासना दाखवू नको. त्यापेक्षा मला आंधळा कर. माझ्या कानी कुणाची निंदा पडू देऊ नको. निंदा कानी येणार असेल, तर मला बहिरा कर. अपवित्र बोलणे माझ्या मुखी नको. त्यापेक्षा मला मुका बनव.

आपल्या वाणीचे पावित्र्य किती मौल्यवान आहे, हे वरील अभंगातून दिसून येते. ‘अपवित्र वाणीपेक्षा मी मुका असलेला बरा’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात.

३. प.पू. जनार्दनस्वामींनी चित्तशांतीसाठी वाणीचे तप सांगितले आहे. ते म्हणाले, ‘‘सामान्यपणे मनुष्य बोलतो फार ! जे कुणी विचारले नाही, ते आपणहून सांगतो. दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित बोलतो. हे असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते. चित्तशांतीचा हा अभ्यास वाटतो, तितका सोपा नाही. तो करून पहा, म्हणजे त्यातील कठीणपण लक्षात येईल.’’

अनावश्यक कठोर बोलणे टाकावे; मग ते कसे असावे ?

४. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज सांगतात

तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥
– ज्ञानेश्‍वरी, अध्याय १३, ओवी २७०

अर्थ : त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे बोलणे खरे (यथार्थ) आणि कोमल (कुणास न खुपणारे), मोजके आणि रसाळ, जणू अमृताच्या लाटांप्रमाणे वाटते.

आपली वाणी सत्य, मृदु, नेमकी आणि रसाळ असावी. अशी वाणी म्हणजे जणू अमृताचे कल्लोळ ! संतवचनातील वाणीचा महिमा वाचून आपल्याला एक वैचारिक दिशा मिळते. ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’, असे म्हणतांना आपल्या वाणीला असा अमृतत्त्वाचा स्पर्श व्हावा, ही सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करूया.’

– सौ. जयश्री जोशी
(साभार : मासिक ‘योगप्रकाश’)