सोलापूर – ९०० वर्षांची परंपरा असलेल्या शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेस नंदीध्वज मिरवणुकीने प्रारंभ झाला. ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर’, ‘श्री सिद्धेश्वर महाराज की जय’ या जयघोषात हिरेहब्बू वाड्यातून महायात्रेतील मानाचे ७ नंदीध्वज सिद्धरामेश्वरांच्या पालखी सोहळ्यासह पारंपरिक मार्गावरून मार्गस्थ झाले. या वेळी सोलापूरवासियांनी नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तसेच अनेकांनी नंदीध्वजांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या मिरवणुकीत बाराबंदी घातलेले अनेक युवक नंदीध्वजासमवेत ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सहभागी झाले होते.