सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती अपार कृतज्ञताभाव असलेले ठाणे येथील श्री. ओंकार अशोक नातू !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरात सहभागी झालो असतांना माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकाकडून साधनेसाठी उपयोग असणार्‍या गोष्टी लहानपणापासून करून घेतल्या आहेत’, असे लक्षात येणे

‘माझ्या लहानपणापासून आतापर्यंतच्या आयुष्याची कमान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्यांच्या हातात घेतली आहे. मी आतापर्यंत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सेवेत उपयोग होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. मी शाळेत शिकत असतांना शाळेत वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा होत असत. तेव्हा आई मला त्यात सहभागी व्हायला सांगत असे आणि माझी त्यासाठी सिद्धताही करून घेत असे. त्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला शब्दांचा योग्य उच्चार करणे आणि सादरीकरण या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे माझ्यात निर्भीडपणा आला. त्या गोष्टींचा मला सूत्रसंचालन करणे आणि अन्य सेवांमध्ये उपयोग होतो.

श्री. ओंकार नातू

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने ‘प्रत्येक गोष्टीचा साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायचा ?’, हे शिकता येणे

माझे पुढील शिक्षण संगणक अभियांत्रिकी शाखेत (कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमध्ये) झाले. त्याचा मला तांत्रिक गोष्टींच्या सेवांमध्ये उपयोग होतो. गुरुदेवांनी सर्वकाही आधीच शिकवून सेवेच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आणि ‘त्यातून प्रत्येक गोष्टीचा साधनेच्या दृष्टीने कसा विचार करायचा ?’, हेसुद्धा मला शिकवले.

३. सूत्रसंचालन करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सर्व करून घेत आहेत’, असे जाणवणे

माझ्या मनात सूत्रसंचालन करण्याआधी थोडी भीती असते की, ‘माझ्याकडून सेवा नीट होईल ना ? काही चूक तर होणार नाही ना ?’ जेव्हा सूत्रसंचालन करण्यासाठी मी व्यासपिठावर पाऊल ठेवतो, तेव्हा ‘माझे नियंत्रण जणू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडे आहे’, असे मला जाणवते. तेच माझी सेवा पूर्ण करून घेतात.

श्री गुरूंच्या सुगंधाने बहरे पुष्पलता ।
रात्र होई दूर गुरुसूर्य उगवता ।
गुरुकृपेने शुद्ध होई देह, मन अन् बुद्धी ।
गुरुदर्शनाने चित्त म्हणे ।
कृतज्ञता, कृतज्ञता अन् कृतज्ञता !!!

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्याकडून सर्वकाही करून घेत आहेत आणि यापुढेही तेच माझ्याकडून सेवा करून घेणार आहेत. ‘त्यांच्या मनात काय आहे ?’, हे ओळखण्याची पात्रता माझ्यात यावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. ओंकार अशोक नातू , ठाणे, महाराष्ट्र. (७.८.२०२२)


किती आळवू तुला रामराया ।

किती आळवू तुला विष्णुराया ।
लोचने उघडली तुलाच पहाया ।
भक्तीरंगी रंगूनी रहाया ।
जोडले हे कर श्रीरंग पुजाया ।। १ ।।

चित्ताचिये ठायी तुझी भक्तीमाया ।
कणास्वरूपा (टीप) आभाळाची छाया ।
आशीर्वादरूपी हात मस्तकी धराया ।
घालितो दंडवत मन, बुद्धी अन् काया ।। २ ।।

किती आळवू तुला रामराया ।
वाणीतील शब्द तुलाच भजाया ।
कर्ता-करविता तूच, ‘मी’पणा व्यर्थ वाया ।
तूच लिहिल्यास या ओळी माझे मन शुद्ध कराया ।। ३ ।।

(कवितेतील विष्णुराया, श्रीरंग आणि रामराया हे शब्द गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) उद्देशून आहेत.

टीप : ‘साधक गुरुदेवांच्या चरणांखालील धूलीकण आहे ’, असा त्याचा भाव आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याबद्दल सुचलेल्या पंक्ती मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.’

– श्री. ओंकार अशोक नातू , ठाणे, महाराष्ट्र. (७.८.२०२२)

या लेखात आणि कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक