स्वपुत्राची हत्या !

सूचना सेठ

स्वतःच्या मुलाची हत्या करण्यासारख्या घटना घडणे, हे गंभीर आहे. बेंगळूरू येथील सूचना सेठ यांनी स्वतःचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) क्षेत्रातील आस्थापन स्थापन केले आहे, एवढी त्यांची बुद्धीमत्ता आणि प्रगल्भता आहे. असे असतांना त्यांनी ‘स्वतःच्या मुलाची हत्या का करावी ?’, हा प्रश्न सर्वांनाच स्तंभित करणारा आणि चिंता करायला लावणारा आहे. पूर्वीच्या युगात हिरण्यकश्यपू या राक्षसकुळात जन्मलेल्या बापाने स्वतःच्या मुलाला, भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला होता; पण तो देवाच्या कृपेने यशस्वी झाला नाही. सध्याच्या काळात मुलासह आत्महत्या केल्याच्या घटनाही पहायला मिळतात; पण क्वचित् मुलांची हत्या केल्याच्याही ! कलियुगात सध्याचा माणूस कधी राक्षस होईल, हे सांगता येत नाही. सूचना सेठ यांच्याकडून झालेली मुलाची हत्या त्यांच्यात एक प्रकारची राक्षसी वृत्ती निर्माण झाल्यामुळेच घडलेली आहे. कुणाचीही किंवा जवळच्या नातेवाईकाची हत्या करणे, हे सर्वसामान्य विवेक जागृत असलेल्या माणसाला पटकन शक्य होणार नाही; पण हत्या करणार्‍यांना ते जमते; याचाच अर्थ त्या व्यक्तीचे अस्तित्व अल्प राहून ती कृती करून घेणार्‍या विशिष्ट शक्तीचे प्राबल्य वाढून ती तिच्या हातातील बाहुले बनलेली असते. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने विद्यालय किंवा महाविद्यालय येथे अध्यात्मशास्त्राचा विषय शिकवणे बंधनकारक केले पाहिजे.

‘पाप म्हणजे काय ? पापाचे परिणाम काय होतात ?’ हे शिकवल्याविना आजच्या पिढीला कसे लक्षात येईल ? अध्यात्मशास्त्र हे महान शास्त्र आहे. ते विद्यालयात शिकवण्यास आतापर्यंत कुणीच प्रयत्न केले नसल्यामुळेच कमी-अधिक प्रमाणात वाईट वृत्ती माणसात निर्माण होतांना दिसते. सरकार आणि समाज यांनी यावर गांभीर्याने विचार करून त्वरित कृती केली पाहिजे. अध्यात्मशास्त्र किंवा साधना शिकवल्याविना पर्यायच उरलेला नाही, हे वरील उदाहरणातून लक्षात येते. अशा घटना पाहिल्या की, सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी सर्वांच्या मनात प्रश्न उभे रहातात. इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन आपण काय मिळवतो ? चांगली पदवी ही चांगल्या नोकरीसाठी, चांगली नोकरी ही अधिक पैसे मिळवण्यासाठी हेच आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे का ? ‘मानवजन्माच्या आयुष्याचे ध्येय काय असले पाहिजे ?’, हे जर प्रत्येक शाळेत शिकवले गेले, तर त्याचा उपयोग मानवाचे आयुष्य सुखी करण्यासाठी होऊ शकतो. वरील प्रश्नाचे उत्तर हे अध्यात्मातच मिळते; म्हणून केवळ कारकुनी शिकवणारे पुस्तकी शिक्षण नको, तर देवदुर्लभ अशा मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी अंतर्मुख करणारे शिक्षण लहानपणापासून मिळणे आवश्यक आहे. मानवी जीवनाचे ध्येय लक्षात आले, तर केवळ पैसा हे ध्येय न रहाता त्याची अंतर्मुखता

सतत टिकून राहील.

– श्री. श्रीराम खेडेकर, गोवा.