सांगलीच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

सांगलीच्या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करतांना विविध मान्यवर

सांगली – महाराष्ट्रातील सर्व कारागृहांत ६ जानेवारीपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी’ साजरी होत आहे. त्या अंतर्गत सांगली येथील कारागृहात ८ जानेवारी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सावरकरप्रेमी श्री. दयानंद बंडगर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याविषयी त्यांचे विचार व्यक्त केले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सिद्ध करण्यात आलेला ‘समाज क्रांतीकारकाची यशोगाथा (रत्नागिरी पर्व)’ हा ५५ मिनिटांचा लघुपट कारागृहातील कर्मचारी आणि बंदीवान यांना दाखवण्यात आला. ‘वन्दे मातरम्’च्या गायनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सावरकरांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आणि कारागृहातील बंदीवानांना तात्यारावांच्या जीवनाचा परिचय होऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक पालट व्हावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू श्री. सात्यकी अशोक सावरकर (पुणे), सांगली जिल्हा कारागृह तुरुंगाधिकारी श्री. सचिन पाटील, सर्वश्री उमेश सुभाष ढलपे, शुभम पत्की, सार्थक गोसावी उपस्थित होते.