तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा !

पुणे – तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त हेतूपुरस्सर पसरवले जात आहे; मात्र परीक्षेत कोणताही घोटाळा झाला नाही. गुणवत्ता सूची नियमानुसारच लावलेली आहे, असा दावा प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यात १० लाख ४१ सहस्र ७१३ परीक्षार्थींनी अर्ज केले होते, त्यापैकी ८ लाख ६४ सहस्र ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. ‘या परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० हून अधिक सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून याची चौकशी करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असो कि सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असो या परीक्षांमधील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून कष्ट करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे’, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.