इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेने कालबद्ध उपाययोजना करण्याची मागणी !

इंद्रायणी नदीचे प्रदूषण

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरांतून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदींचे मोठ्या प्रमाणांमध्ये जलप्रदूषण वाढत आहे. हे जलप्रदूषण कायमचे रोखण्यासाठी महापालिका सर्व नद्यांच्या ८४ ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून त्याची पडताळणी करणार आहे. त्यावरून कोणत्या भागांमध्ये नदी किती प्रमाणामध्ये प्रदूषित होत आहे, हे स्पष्ट होईल. हे पाण्याचे नमुने पुण्यातील ‘सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’कडून पडताळण्यात येतील.

पवना नदीतील ५२ नमुने, इंद्रायणी नदीतील १६ नमुने आणि मुळा नदीचे १६ नमुने असे ८४ ठिकाणांचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यासाठी ११ लाख इतके शुल्क देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाण्याची पडताळणी केल्यानंतर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत होणारा पालट समजून येणार आहे. त्यानुसार नदीच्या आणि नदीस मिळणार्‍या सांडपाण्याची गुणवत्ता पडताळून त्याचा अहवाल महापालिकेस सादर करण्यात येणार आहे. त्या अहवालावरून महापालिका पुढील आराखडा सिद्ध करून त्यावर कार्यवाही करणार आहे.

जलप्रदूषण रोखण्यासाठी पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांतील ८४ ठिकाणांच्या पाण्याच्या नमुन्यांची पडताळणी होणार !

पिंपरी (पुणे) – महापालिका भवन येथे शहरातील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यात इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करावी, पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यांसह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कालबद्ध उपाययोजना कराव्यात; तसेच प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा सूचना करण्यात आल्या. महापालिकेतील या बैठकीस भाजपचे आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पाटील यांसह शहर अभियंता, सहशहर अभियंता आदी उपस्थित होते.

नदी प्रदूषणाची कारणे कोणती आहेत ? त्यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या ? या संदर्भातील माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळास द्यावी, अशा सूचनाही या वेळी करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड येथील प्रदूषित पाणी नदीमध्ये न मिसळण्यासाठी ९५ एम्.एल्.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू करणे प्रस्तावित असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. तर आयुक्त शेखर सिंह यांनी नदी प्रदूषणाच्या संदर्भात महापालिका करत असलेल्या उपायांची माहिती देऊन पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या नदी सुधारक आराखड्याची माहिती दिली.

संपादकीय भूमिका 

इंद्रायणी नदीचे आध्यात्मिक महत्त्व असतांनाही तिचे प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना न करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी !