भारतियांनो, मालदीव पर्यटनावर बहिष्कार घाला !

मालदीवसारखे छोटे राष्ट्र भारतावर दादागिरी करत असेल, तर भारतियांनी त्यांचे सामर्थ्य दाखवून देशात हिंदु राष्ट्र स्थापावे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना देणार्‍या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरील लिखाणानंतर प्रसारमाध्यमांवर ‘मालदीवचे राजकारणी, सरकारी अधिकारी विरुद्ध भारतीय (समाजमाध्यमांचे वापरकर्ते)’ असे युद्ध चालू झाले. या आठवड्याचा प्रारंभच या वादाने झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘लक्षद्वीप’ या केंद्रशासित प्रदेशाच्या भेटीचा संदर्भ देत या प्रदेशाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारे एक लिखाण (पोस्ट) केले. या स्थळाविषयी कौतुक करतांना पंतप्रधान मोदी लिहितात, ‘ज्यांना स्वतःतील साहसाला गवसणी घालायची आहे, त्यांच्या सूचीत लक्षद्वीप असणे आवश्यकच आहे.’ असे असले, तरी त्यांच्या अधिकृत निवेदनात, पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही भारतीय सरकारी अधिकार्‍याने लक्षद्वीपचा प्रचार करतांना मालदीवचा किंवा पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेले इतर कोणतेही बेट असलेल्या राष्ट्राचा उल्लेख केलेला नाही. असे असतांनाही मालदीवच्या नागरिकांकडून मात्र समाजमाध्यमांवरुन अश्लाघ्य भाषेत टीका चालू झाली. याच पार्श्वभूमीवर मालदीव सरकारच्या भारताविषयीच्या भूमिकेशी त्याचा नेमका संबंध कसा आहे, हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

१. मालदीवमधून भारताविरोधात अपप्रचार का चालू झाला ?

पंतप्रधान मोदी यांच्या लिखाणानंतर लगेचच मालदीवच्या काही प्रमुख समाजमाध्यम वापरकर्त्यांनी आक्षेपार्ह, वर्णद्वेषी आणि विद्वेषपूर्ण भाषेत मोठ्या प्रमाणावर भारतियांना, तसेच पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला. यातील भाषा अपमानजनकच होती. ही टीका करणार्‍यांमध्ये मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शियुना याही होत्या. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘विदूषक आणि इस्रायलच्या हातातील कठपुतळी’, असे म्हणून हिणवले अन् त्या पुढे ‘#VisitMaldives #SunnySideOfLife’ असे ‘हॅशटॅग्स’ जोडले. हे लिखाण आता हटवले (डिलिट) असले, तरी त्या लिखाणामध्ये शियुना यांनी ‘भारताची तुलना गायीच्या शेणाशी’ केली आहे. मालदीवमधील शियुना यांच्या सहकारी मालशा शरीफ यांनीही भारत आणि लक्षद्वीपमधील पर्यटन मोहिम यांच्याविरुद्ध अशाच प्रकारची अवमानकारक टीका केली. मालदीवच्या सत्ताधारी ‘प्रोग्रेसिव्ह पक्षा’च्या एका सदस्यानेही फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा बेटांचे छायाचित्र प्रसारित केले आणि ‘हे छायाचित्र मालदीवमधील एका बेटावरील रिसॉर्टचे आहे’, असाही दावा केला. त्या खाली त्यांनी लिहिले, ‘मालदीवमधील सूर्यास्त’. तुम्हाला हे लक्षद्वीपमध्ये दिसणार नाही.’ या वेळी ‘प्रोग्रेसिव्ह पक्षा’चे आणखी एक राजकारणी जाहीद रमीझ ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर म्हणाले, ‘‘आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना हा केवळ भ्रम आहे. आम्ही जी सेवा देतो, तेवढी ते कशी देतील? तिथे एवढी स्वच्छता कशी असेल ? त्यांच्या खोल्यांमध्ये एक प्रकारच्या कायमच्या येणार्‍या वासामुळे त्यांची घसरण होईल.’’

२. मालदीवला धडा शिकवण्याची आवश्यकता !

मालदीवमध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये निवडून आलेले सरकार हे चीनधार्जिणे आहे. मालदीवच्या अध्यक्षांनी एक विधान केले होते, ‘भारतीय सैन्य आणि नौदल मालदीवमध्ये तैनात आहे. त्यांना भारताने त्वरित बाहेर काढावे.’ अर्थात् ही मागणी त्यांनी चीनच्या दबावात येऊन केलेली आहे. हे सरकार भारतविरोधी आहे, हे निश्चित आहे. मालदीव हे भारतातून जाणार्‍या पर्यटकांवर पूर्णपणे अवलंबून असते. पर्यटन हे तेथील उत्पन्नाचे सर्वांत मोठे साधन आहे. लक्षावधी भारतीय मालदीव येथे पर्यटक म्हणून भेट देतात. त्याचा त्यांना भरपूर लाभ होतो. त्यांना भारताचे एवढे साहाय्य होत असतांना, जर ते अशा प्रकारे दादागिरी करत असतील, तर त्यांना निश्चित धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.

या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, ‘भारताचे अंदमान निकोबार किंवा लक्षद्विप द्वीपसमूह अतिशय सुंदर आहेत. भारतियांनी पर्यटनासाठी तेथे जावे आणि मालदीवला जाऊ नये.’ मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अपशब्द उच्चारले. त्यानंतर तेथील लोकांनी मालदीवच्या राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.