स्वत:च्या ४ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करणार्या ३९ वर्षीय सूचना सेठ यांच्या प्रकरणामुळे सारा देश स्तब्ध आणि व्यथित आहे. जी भारतीय संस्कृती जागतिक स्तरावर अन्य राष्ट्रांसाठी आदर्श आहे, ज्या संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्या राजमाता जिजाऊ, पाठीवर मुलाला घेऊन इंग्रजांशी लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे आदर्श आहेत, त्या राष्ट्रातील एका उच्चशिक्षित आईने मुलाची हत्या करणारी घटना ‘निधर्मी प्रणालीत मनुष्याची मनोभूमी सुखाच्या हव्यासापोटी किती पालटत आहे’, हे दर्शवणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने विचार केल्यास आईचे प्रेम, स्नेह यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. मुलाला काही लागल्यास तिचा जीव तळमळतो. घरात अन्न अपुरे असल्यास प्रसंगी स्वत: उपाशी राहून ती मुलांना वाढवते, अशीच आई आपण नेहमी पहातो. याउलट ‘केवळ स्वत:चा पती मुलाला भेटू नये’, या रागातून जेव्हा एखादी आई स्वत:च्या मुलाची हत्या करते आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो बॅगेत भरते, तेव्हा या घटनेच्या मुळाशी जाण्याची नितांत आवश्यकता निर्माण होते.
अधिक पैशांचा हव्यास !
वेंकटरमन् नावाच्या व्यक्तीसमवेत वर्ष २०१० मध्ये सूचना सेठ यांचा प्रेमविवाह झाला. काही कालावधीनंतर वेंकटरमन् यांच्याशी न पटल्याने त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. सूचना सेठ यांनी ‘ए माइंडफुल एआय लॅब’ नावाच्या एका आस्थापनाची स्थापना केली होती. हे आस्थापन ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ क्षेत्रात कार्यरत आहे. वर्ष २०२१ मध्ये सूचना सेठ यांचा समावेश १०० प्रतिभाशाली महिलांमध्ये करण्यात आला होता. सूचना सेठ यशस्वी उद्योजिका होऊ शकल्या; मात्र त्या चांगल्या माता बनू शकल्या नाहीत. सध्या आपण ज्या माध्यमातून शिक्षण घेतो, ते शिक्षण आपल्याला उच्चशिक्षित बनवते; पण संस्कार देत नाही, हेच यातून समोर आले. जी शिक्षणप्रणाली तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायला शिकवत नाही, त्यागाची भावना निर्माण करू शकत नाही, मातृत्वाची किमान कर्तव्ये तुमच्यात रुजवू शकत नाही, त्या शिक्षणप्रणालीत आमूलाग्र पालट करण्याची वेळ आता आली आहे.
भारतीय संस्कृतीत मातेला सर्वाेच्च स्थान आहे आणि तिचा गौरव प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये ‘कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति ।’ म्हणजे ‘मुलगा वाईट असू शकतो; पण आई कधीच कुमाता असू शकत नाही’, असा श्लोक आहे. रामायणातही ‘जननी आणि जन्मभूमी’ला स्वर्गापेक्षा अधिक मोठा सन्मान आहे. मूल चांगले कि वाईट यात आईची भूमिका महत्त्वाची मानली जाते. प्रतिकूल परिस्थितीतही मातांनी त्यांच्या मुलांची कशा प्रकारे उत्तम जडणघडण केली, याची अनेक उदाहरणे भारतीय इतिहासात आढळतात. अशा आदर्श मातांपैकी राजमाता जिजाऊ यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या संस्कारांमुळे ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. भगवान श्रीकृष्णाची आई नसूनही यशोदामातेने श्रीकृष्णाचे स्वत:च्या मुलाप्रमाणेच पालन-पोषण करून मोठे केले. भारतीय संस्कृतीत त्याग हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत मुलांवर तसेच संस्कार केले जात असत. सध्या मात्र पाश्चिमात्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे त्याग, निरपेक्ष प्रेम या गोष्टी इतिहासजमा होत आहेत.
वर्ष १९९० ते १९९६ या ६ वर्षांत महाराष्ट्रातील काही भागांतून लहान मुले गायब होत होती. अंजनाबाई गावित आणि तिच्या २ मुली या कट रचून लहान मुलांना पळवायच्या आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडायच्यां. अंजनाबाईने १३ मुलांचे अपहरण केल्याचे सिद्ध झाले, ज्यांतील ९ मुलांना मायलेकींनी ठार मारले. ‘काही मुलांनी प्रश्न विचारले’ म्हणून, तर ‘कुणी आजारी पडले’, म्हणून या मुलांना ठार मारले. यांतील अंजनाबाई गावित मरण पावली, तर तिच्या २ मुलींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या अंजनाबाईने ९ लहान मुलांना ठार मारले, त्या क्रूर घटनेचे सूचना सेठच्या प्रकरणामुळे परत एकदा स्मरण झाले. सूचना सेठ प्रकरण हे प्रत्येक आई-वडील, काम करणारे पाल्य यांसह कुटुंबव्यवस्थेतील प्रत्येकाला चिंतन करण्यास भाग पाडणारी घटना आहे
कुटुंबव्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह ?
अलीकडच्या काळात घटस्फोटाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एकमेकांमधील विश्वासाचा अभाव, एकमेकांना वेळ देऊ न शकणे, जिव्हाळ्याच्या क्षणांसाठी वेळ न मिळणे यातून गुंतागुंत निर्माण होऊन त्याचा गंभीर परिणाम पाल्यांचे पालनपोषण नीट न होण्यावर किंवा जोडीदाराचा राग पाल्यावर काढण्यावर होत आहे.
सूचना आणि त्यांचे पती यांचा घटस्फोटासाठीचा खटला अंतिम टप्प्यात होता. शेवटच्या सुनावणीत मुलाचा ताबा सूचना यांना मिळाला होता. यात सूचना यांच्या पतीला मुलाला आठवड्यातून एकदा भेटण्याची अनुमती देण्यात आली होती, जे सूचना यांना आवडले नव्हते. पती-पत्नींमध्ये जेव्हा वाद होतात, तेव्हा त्याचे पर्यवसान मुलाच्या हत्येपर्यंत जात असेल, तर ‘माता-पित्यांचे नेमके दायित्व काय ?’, हे परत एकदा समजावून सांगण्याची वेळ आली आहे. सूचना यांनी केलेली हत्या ही कुटुंबव्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.
माता-पिता दोघेही आता व्यस्त झाल्याने ते एकमेकांना आणि कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाहीत. पती-पत्नी दोघेही चाकरी करत असतील, तर साहजिकच पाल्यांकडे दुर्लक्ष होते. ‘करिअर’च्या सर्वाेच्च शिखरावर पोचण्याच्या हव्यासापोटी आजचे तरुण-तरुणी यांना कशाचेच भान उरले नसून नात्यांमधील ओलावा संपत आहे. ‘हार्वर्ड विद्यापिठातून शिक्षण घेतलेल्या आणि एका आस्थापनाची मालकीण असलेल्या सूचनासारख्या महिला स्वतःच्या कोशात अडकून ‘मुलगाही नको’, या स्थितीत येतात, त्यावरून ‘आपली जीवनमूल्ये कुठे चालली आहेत ?’, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती आणि घरातील वडीलधारी लोकांच्या सहवासाने येणारे तणावाचे प्रसंग निवळले जात. ‘आता घरात आई-वडीलच नसल्याने पती-पत्नींमधील तक्रारी-अडचणी कुणासमोर मांडायच्या आणि सोडवायच्या ?’, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.
धर्म आणि अध्यात्म हेच असे घटक आहेत, की जे मनुष्याला सारासार विचार करायला शिकवतात आणि आदर्श मूल्यांवर आधारित आपण जीवन जगतो. त्यामुळे सूचना यांच्यासारख्या प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बालपणापासून हिंदु संस्कृतीचे शिक्षण देणे महत्त्वपूर्ण आहे. असे केल्यास पाल्यांना मोठे झाल्यावर त्यांचे दायित्व नेमके काय आहे, ते कळेल !
जीवनात त्यागाचे महत्त्व बिंबवणारे शिक्षण देणारी हिंदु शिक्षणपद्धत कार्यान्वित करणे, आजच्या काळात आवश्यक ! |