सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय १३ वर्षे) यासह मिरज येथील ‘केळकर स्मृती योगवर्गाच्या’ योगपटूंचे या स्पर्धेत दैदिप्यमान यश !
मिरज, ९ जानेवारी (वार्ता.) – बेंगळुरू येथे ३० डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या दिवशी झालेल्या ‘हिमालय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योग ऑलिंपियाड’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये येथील ‘केळकर स्मृती योगवर्गाच्या’ योगपटूंनी सांघिक कास्य पदक पटकावले आहे. येथील सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय १३ वर्षे) यासह मिरज येथील ‘केळकर स्मृती योगवर्गाच्या’ योगपटूंनी या स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवले आहे.
बालक (सब ज्युनिअर) मुले या गटात कु. श्रेयांश सावंत, कु. अनय चंद, कु. तन्मय पवार, कु. समर्थ मिरजे (सांघिक तृतीय क्रमांक), बालिका (सब ज्युनियर), तर मुलींच्या गटात कु. इशिता पाटील, कु. सई पाटील (सांघिक तृतीय क्रमांक), कनिष्ठ (ज्युनियर) मुलांच्या गटात कु. राजवर्धन मोरे, कु. अर्जुन पुजारी आणि कु. सर्वेश पाठक (सांघिक तृतीय क्रमांक) या सर्वांनी सांघिक कास्य पदक पटकावले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना डॉ. मुकुंद पाठक, सौ. अंजली केळकर, सौ. कोमल जगताप, श्री. मोहन जोशी यांचे मार्गदर्शन आणि सर्वश्री दीपक दुर्गाडे, कुणाल माने, अभिजित सावंत आणि कु. प्रतिष्ठा माने यांचे प्रशिक्षण मिळाले आहे.
‘सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय १३ वर्षे) याने ध्यान, तसेच अष्टांगयोग याविषयीच्या लेखी परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवून प्रशंसनीय कामगिरी करून कनिष्ठ गटातील सांघिक कास्य पदक पटकावले आहे’, असे त्याचे योगशिक्षक श्री. दीपक दुर्गाडे यांनी सांगितले. |
योगप्रसार करण्याचा वार्षिक उपक्रम निश्चितपणे आदर्श !
आजच्या या स्पर्धात्मक आणि व्यावसायिकतेच्या युगात योगशास्त्राचे पावित्र्य जपून बेंगळुरू येथील ‘स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थान’च्या एस्. व्यास कनिष्ठ विद्यापिठात (डीमड् टू.बी. युनिव्हर्सिटी) ‘अष्टांग योग’ यावर आधारित शास्त्रीय पद्धतीने योगस्पर्धा घेऊन योगप्रसार करण्याचा वार्षिक उपक्रम निश्चितपणे आदर्शच आहे, असे विविध स्पर्धक आणि योगशिक्षक यांनी सांगितले. ‘तीस मिनिटे ध्यान’, तसेच ‘अष्टांग योग’ यावर आधारित ‘लेखी परीक्षा’ घेऊन स्पर्धा आयोजित करून योगशास्त्राचा प्रसार अन् योगशिक्षण देणारी ही संस्था एकमेवाद्वितीय आहे, असे अनेकांनी सांगितले.