पुणे येथील येरवडा कारागृहासमोर समूहगायन !
पुणे – स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी अंदमान येथील काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर काही काळ ते रत्नागिरी आणि नंतर पुणे येथील येरवडा कारागृहात होते. जवळजवळ १४ वर्षे कष्टप्रद शिक्षा भोगून ते ६ जानेवारी १९२४ या दिवशी येरवडा कारागृहातून मुक्त झाले. या ऐतिहासिक मुक्ततेची शताब्दी विद्यार्थ्यांनी येरवडा कारागृहासमोर ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ हे अजरामर गीत गाऊन साजरी केली. या वेळी ‘भारत माता की जय’ असा जयघोष करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना दिली. ‘इतिहासप्रेमी मंडळ’ आणि ‘सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प’ यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुक्ततेची शताब्दी साजरी करण्यात आली. या वेळी ‘समता बालक मंदिर प्रशाले’तील विद्यार्थ्यांनी समूहगायन केले.
‘‘सावरकरांची सुटका होणार हे कळल्यावर त्यांचे मावस बंधू डॉ. वि.म. भट त्यांना भेटायला आले. कारागृहातील एक लेखनिक म्हात्रे यांनी दिलेले धोतर, कोट आणि टोपी घालून सावरकर भट यांच्या घरी आले. त्यांच्या सुटकेची वार्ता कळताच न.चिं. केळकर, शि.म. परांजपे आणि शे-दीडशे लोक त्यांना भेटायला आले. ‘आपण श्रीरामाप्रमाणे १४ वर्षे वनवास भोगलात’ असे लोक म्हणाले.
तेव्हा सावरकर म्हणाले, ‘‘श्रीरामाने रावणाचा वध करून आपले ध्येय साध्य केले होते; पण भारताच्या स्वातंत्र्याचे माझे ध्येय अजून साकार झाले नाही.’’
आता पुन्हा एकदा ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ असा नारा सावरकर यांनी त्या वेळी दिला’’, असे स्मरण मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी करून दिले.