सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे मिरज येथील बंधू कु. राम आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) आणि उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. कृष्ण आचार्य (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. राम आचार्य आणि कु. कृष्ण आचार्य हे या पिढीतील आहेत !

मिरज येथील कु. राम राघवेंद्र आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) आणि त्याचा बंधू कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय १५ वर्षे) या दोन भावांची त्यांच्या आत्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. राम आचार्य

१. राम आणि कृष्ण यांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये

कु. कृष्‍ण आचार्य

१ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘एकदा आम्ही रामनाथी आश्रमातून मिरज येथे परत येत असतांना वाटेत आमची गाडी बिघडली. जवळपास कुठेही वाहन दुरुस्ती तळ (गॅरेज) नव्हते. तेव्हा गाडी दुरुस्त करण्यासाठी नेल्यावर आम्हाला अर्धा किलोमीटर चालत जाऊन एका बस थांब्यावर बराच वेळ थांबावे लागले; पण राम आणि कृष्ण (रामचा भाऊ) दोघेही काहीही न बोलता शांत राहिले. त्यातून त्यांच्यातील ‘परिस्थिती स्वीकारणे’, हा गुण शिकायला मिळाला.

१ आ. राम आणि कृष्ण यांनी मिरज आश्रमात केलेल्या विविध सेवा

१. रामची दहावीची परीक्षा झाल्यानंतर राम आणि त्याचा लहान भाऊ कु. कृष्ण दोघेही दीड मास सेवेसाठी मिरज आश्रमात रहाण्यासाठी गेले होते. दायित्व असणारे साधक त्यांना जी सेवा सांगतील, ती सेवा परिपूर्ण करण्यासाठी दोघांचेही सतत चिंतन चालू असायचे.

२. एकदा त्यांना ध्यानमंदिरातील फार मोठा आणि जाड असा पडदा धुण्याची सेवा सांगितली होती. तेव्हा त्यांनी आधी ‘त्या पडद्याचे वजन केले आणि धुलाई यंत्राची तेवढी क्षमता आहे का ?’, हे पाहिले. त्यानंतर तो पडदा धुवायला घेतला.

३. एक दिवस त्यांनी रुग्णांना लागणारी पाण्याची गादी ‘वापरण्यास योग्य आहे का?’, हे पडताळून ती दुरुस्त केली. तेथे कपडे वाळत घालण्याची दोरी नीट नव्हती. तीही दुरुस्त केली.

४. आश्रमातील कपड्यांचा साठा चौथ्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर आणून ते कपडे धुऊन, वाळवून आणि उत्तम प्रकारे त्यांच्या घड्या घालून पुन्हा नीट जागेवर ठेवले.

५. याच कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या समारंभासाठी दोघांनीही श्री गुरुदेवांनी पूर्वी वापरलेली खोली, ध्यानमंदिराची स्वच्छता आणि सजावट इत्यादी सेवा अन्य सहसाधकांच्या समवेत पुष्कळ आनंदाने अन् उत्साहाने केल्या. त्या दिवशी रात्री २ वाजले, तरी ‘अजून काय करूया ?’, असे ते दोघे दायित्व असलेल्या साधकांना विचारत होते.

यावरून ‘प्रत्येक कृती करतांना चिंतनाची दिशा योग्य ठेवून गुरुसेवा परिपूर्ण आणि लक्षपूर्वक कशी करायची ?’, हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त सांगली येथे निघणार्‍या दिंडीत सहभागी होणे

१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त सांगली येथे निघणार्‍या दिंडीतील रथात मिरज आश्रमातील गुरुदेवांचे छायाचित्र ठेवणार होते. तेव्हा ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव दिंडीत उपस्थित असणार, तर तिथे आपल्याला सेवा मिळावी’, अशी दोघांचीही तळमळ होती.

२. त्या वेळी ‘रामला छत्र (अब्दागिरी) हातात घेऊन आणि कृष्ण याला लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत रथासह जायचे आहे’, असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी लगेच कृतज्ञता व्यक्त केली.

३. दिंडीसाठी सांगलीला नेलेला रथ मिरज येथे परत आणतांना तेथील साधक श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी रथातील श्री गुरुदेवांच्या छायाचित्राला धरून त्याच्या दोन बाजूला राम आणि कृष्ण यांना बसायला सांगितले. तेव्हा ‘प्रत्यक्ष श्री गुरुदेव रथातून आपल्याला मिरज आश्रमात घेऊन जात आहेत आणि आपण कृत्यकृत्य झालो आहोत’, असा भावानंद त्यांच्या तोंडवळ्यावर झळकत होता.

४. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या रथोत्सवात आपल्याला सेवा मिळाली’, या आनंदाने त्यांनी तहान-भूक विसरून भावपूर्ण सेवा केली आणि त्या रथोत्सवातील चैतन्य अनुभवले.

या सर्वांतून त्या दोघांमधील साधकत्व आणि श्री गुरूंप्रती असलेला भाव प्रकर्षाने आम्हा सर्वांच्या लक्षात आला.’

– सुश्री (कु.) माधवी कृष्णराव आचार्य, सुश्री (कु.) शशिकला आचार्य, सुश्री (कु.) मोहिनी आचार्य, सुश्री (कु.) वनिता आचार्य आणि सुश्री (कु.) सुरेखा कृष्णराव आचार्य (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६६ वर्षे) (कु. राम आणि कु. कृष्ण यांच्या आत्या), मिरज, सांगली. (३.८.२०२३)