रत्नागिरी – पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसर्या वर्षी सायकल दिंडी काढली. यामध्ये रत्नागिरीतून ३० सायकलस्वार सहभागी झाले. ‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत अनुमाने ३७ कि.मी.ची दिंडी काढण्यात आली.
७ जानेवारी या दिवशी ‘सुवर्णसूर्य फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित पहिल्या ‘कोकण कोस्टल मॅरेथॉन’ स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलस्वार स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे स्वामींच्या जयंतीपूर्वी सायकल दिंडी काढता आली नव्हती; परंतु मंगळवारी सकाळी ६ वाजता जयस्तंभ येथून सायकल दिंडीला प्रारंभ झाला. पहाटे पाऊस पडल्याने व्यत्यय आला असला, तरी सायकलस्वार वेळेत येऊन दिंडीला प्रारंभ झाला. सकाळी ७.१५ वाजता ही दिंडी पावस येथील समाधी मंदिरात पोचली. स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा सायकलस्वार रत्नागिरीत पोचले.
‘सायकल चालवूया’, ‘प्रदूषण टाळूया’, ‘पर्यावरण जपूया’, ‘तंदुरुस्त राहूया’, ‘मानसिक ताणतणावर घालवूया’, ‘प्रतिकारशक्ती वाढवूया’, असा संदेश आजच्या दिंडीतून देण्यात आला. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने सायकलस्वारांचे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले. ‘प्रतिवर्षी अशी दिंडी काढावी’, असेही आवाहन त्यांनी केले.