श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’ला आमदार टी. राजासिंह यांची सदिच्छा भेट !
अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली चालू केलेल्या महाप्रसादाच्या सेवेसमवेत विविध उपक्रम चालू आहेत. धाडसी नेतृत्व अन् प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा विस्तार होत आहे. न्यासाचा लौकिक देशात असून तो धार्मिक आणि सांस्कृतिकता यांचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन तेलंगाणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता ते बोलत होते.
या प्रसंगी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, तसेच श्रीफळ देऊन आमदार टी. राजासिंह यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मीलन कल्याणशेट्टी, योगेश पवार, ऋषि लोणारी, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, महांतेश स्वामी, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.