श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी ? – एक निष्फळ वाद !

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत. यावर आव्हाडांनी आता खेदही व्यक्त केला; मात्र ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. त्यासाठी ते वाल्मीकि रामायणाचा दाखलाही देत आहेत. त्यांचे बोलणे संतापजनक आहेच, तसेच ते कधीही सयुक्तिक आणि मान्यही नाही.

जितेंद्र आव्हाड

१. ‘राम आमचा’ म्हणतांना आव्हाडांनी त्यांच्या पक्षप्रमुखांची अनुमती घेतली का ?

सध्या सगळीकडे होत असलेला ‘रामनामा’चा जल्लोष हा ‘राम शाकाहारी किंवा मांसाहारी होता’; म्हणून नाही, तर राम प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे; म्हणून चालू आहे. ‘राम काय खात होता ?’, या विषयावर कुणालाही काहीही फरक पडलेला नाही. जितेंद्र आव्हाड हे याआधीही अनेक वेळा विचित्र बरळलेले आहेत. हिंदु धर्म हा तर त्यांच्यासाठी कायमच टीकेचा विषय राहिला आहे. आज ‘राम हा आमचा आहे’, असे म्हणणारे आव्हाड याआधी ‘रावण काढून टाकला, तर रामाच्या चरित्राला काही अर्थ राहील का ?’, असेही म्हणाले होते. सगळ्यांत महत्त्वाचे, म्हणजे ‘राम आमचा आहे’, असे म्हणणार्‍या आव्हाडांनी बोलण्याआधी ‘देशाला रामायण- महाभारताची आवश्यकता नाही’, असे म्हणणार्‍या ‘त्यांच्या पक्षप्रमुखांची (शरद पवार यांची) अनुमती घेतली होती का ?’, हे पहाणे महत्त्वाचे ठरेल.

कु. अन्नदा मराठे

२. प्रभु श्रीराम हे केवळ एका समाजाचे कसे ?

जितेंद्र आव्हाड सगळ्यांत आधी म्हणाले, ‘‘राम बहुजनांचा आहे.’’ प्रभु श्रीराम हे परमेश्वर आहेत. ते कुठल्या एका समाजाचे कसे असतील ? ते बहुजनांचे किंवा अभिजनांचे नाहीत. ते सगळ्या सृष्टीचे आहेत. श्रीराम निषादराज गुहाकडे गेले, केवटकडून त्यांनी पाय धुऊन घेतले, शबरीची उष्टी बोरे खाल्ली, तसेच ते महर्षि अगस्ती, अत्री यांसारख्या ऋषींच्या आश्रमातही गेले. त्यांनी कुणाकडेही जायचे नाकारले नाही. जर त्यांनी तो भेद केला नाही, तर आपण का करायचा ?

३. रामरक्षेतील श्लोक ‘रघुवंशम्’ महाकाव्याचा आधार !

आव्हाड म्हणतात, ‘‘राम शिकार करून खायचा.’’ यासाठी आपण रामरक्षेतील श्लोकाचा आधार घेऊ शकतो. रामरक्षेत वर्णन येते –

पुत्रौ दशरथस्यावां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
प्रविष्टौ सीतया सार्धं दुश्चरं दण्डकावनम् ।।

फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
वसन्तौ दण्डकारण्ये किमर्थमुपहिंसथ ।।

– वाल्मीकि रामायण, काण्ड ३, सर्ग २०, श्लोक ७ आणि ८

अर्थ : आम्ही दोघे भाऊ राजा दशरथांचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहोत, तसेच सीतेसह या दुर्गम दंडकारण्यात येऊन फल-मूलाचा आहार करत इंद्रिय संयमपूर्वक तपस्येमध्ये संलग्न आहोत आणि ब्रह्मचर्याचे पालन करत आहोत. या प्रकारे दंडकवनात रहाणार्‍या आम्हा दोघा भावांची तुम्ही कशासाठी हिंसा करू इच्छित आहात ?

हा एकच श्लोक रामचंद्र वनात असतांना काय खायचे ? हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. तरीही आपण कालिदासाच्या ‘रघुवंशम्’ या महाकाव्याचा आधार घेऊया. या काव्यामध्ये कालिदासाने रामाच्या मागच्या अनेक पिढ्यांचे वर्णन केले आहे. यात कालिदास म्हणतात, ‘श्रीरामाच्या मागच्या ५४ पिढ्या या सात्त्विक आहार घेऊन जगणार्‍या होत्या.’ तसेच गोस्वामी तुलसीदास म्हणतात, ‘निषादराज गुहाकडे श्रीरामांनी फलाहार केलेला आहे.’ अशा अनेक ठिकाणी श्रीरामांनी वनवासात असतांना केवळ फळे आणि कंदमुळे सेवन केल्याचा उल्लेख येतो.

४. श्रीरामाचे वनवासातील व्रतस्थ जीवन !

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणतात, ‘‘राम १४ वर्षे वनात राहिल्यामुळे तो मांसाहार करत असे.’’ या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की, हत्ती, हरिण, ससा अशा अनेक प्राण्यांचे आयुष्य जंगलात असते; पण ते संपूर्णपणे शाकाहारी असतात. ‘जंगलात खायला मिळत नाही; म्हणून रामाने मांसाहार केला’, हे पूर्ण चूक आहे. याचे कारण राम फिरायला नव्हे, तर व्रतस्थ जीवन जगायला वनात गेलेला होता. त्यामुळे जे मिळेल ते खायचे अथवा उपाशी रहायचे, असा त्याचा नेम आहे. काही ठिकाणी असा उल्लेख येतो की, वनवासात असतांना श्रीराम ४ प्रहर उपवास करून ५ व्या प्रहरामध्ये शस्त्रे न लागलेली फळे खात असे.

५. आदर्शच घ्यायचा, तर श्रीरामाचा घ्या !

पुढे आव्हाड म्हणतात, ‘‘आम्ही रामाचा आदर्श घेऊन मांसाहार करतो.’’ आदर्शच घ्यायचा, तर मग तो जेवणाचा कशाला ? जीवनाचा घ्यायला हवा ! सनातन वैदिक धर्माचे पालन करणार्‍या रामाचा आदर्शही घ्यावा. तो जर असता, तर ‘सनातन धर्म ही भारताला लागलेली कीड आहे’, असेही त्यांना म्हणता आले नसते. महत्त्वाचे म्हणजे प्रभु श्रीराम वनवासात असतांना काय खात होते ? हा खरेतर चर्चेचा विषय नाही, तर त्यांनी त्या काळात कार्य काय केले, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य पाहिले, तर त्यांनी ‘काय खाल्ले’, हा विषय महत्त्वाचा ठरत नाही. श्रीरामाला स्वतःचे म्हणतांना ‘सनातन धर्माला देशाला लागलेली कीड’, असे म्हणणे योग्य ठरणार नाही; कारण श्रीरामाचा संपूर्ण प्रवास हा सनातन धर्माने घालून दिलेल्या वाटेवरच पुढे जाणारा आणि त्या वाटेला अधिक परिपूर्ण करणारा आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे प्रभु श्रीरामाचा अवमान झाला नाही आणि होणारही नाही. याचे कारण रामाचा अवमान करणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि यापुढेही येणार नाही; कारण प्रभु श्रीराम हे या संपूर्ण सृष्टीचे आहेत. ते काय खात होते ? कसे दिसत होते ? अशा छोट्या छोट्या गोष्टींवर नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण अशा दिव्य चरित्रावर हा संपूर्ण समाज प्रेम करतो. त्यांच्या मर्यादापूर्ण जीवनाला हा समाज आदर्श मानतो आणि म्हणूनच कुणी कितीही आरोप केले अथवा कुणी काहीही बोलले, तरी  रामचरित्राचा महिमा न्यून होणार नाही.

– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (७.१.२०२४)